मुंबई : लॉकडाऊनदरम्यान बर्‍याच जणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. गेली अनेक महिने अनेक तरुण बेरोजगार आहेत. अशा परिस्थितीत बेरोजगार तरुण जॉबशी संबंधित वेबसाईट्सवर बायोडाटा अपलोड करुन नोकरी मिळवण्याच्या आशेवर आहेत. मात्र तरुणांच्या या स्थितीचा काही सायबर क्रिमिनल गैरफायदा घेताना दिसत आहेत. मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरीचं आमिष दाखवून फसवणुकीचे प्रकार मुंबईत समोर आले आहेत. मोठमोठ्या कंपन्यांची खोटी ऑफर लेटर बनवून तरुणांना फसवत आहेत.


मुंबईतील चेंबूर भागात राहणारा आणि गेल्या 8 महिन्यांपासून बेरोजगार असलेल्या फिर्यादी अयुब सय्यद याने एबीपी न्यूजशी बोलताना सांगितले की, कोका-कोला कंपनीकडून आपल्याला एक ईमेल आला होता. ज्यामध्ये नोकरीची गोष्ट नमूद करण्यात आली होती. काही मोजक्याच लोकांना कंपनीत नोकरी दिली जात आहे, ज्यात त्यांची नावे देखील दाखवण्यात आली आहेत. या तरुणांना नोकरी करण्यापूर्वी दिल्लीत प्रशिक्षण दिले जाईल. त्यांना विनामूल्य फ्लाइट तिकिट आणि प्रशिक्षण दिले जाईल, असं सांगितले गेलं होतं. परंतु त्यांना सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून आठ हजार रुपये द्यावे लागतील.


त्यानंतर सय्यदने काही विचार न करता त्यांच्या अकाउंट नंबरवर सुमारे 8730 रुपये पाठवले. सय्यदला सांगितलं की, दोन ते तीन दिवसात त्याला त्याच्या दिलेल्या पत्त्यावर विमानाचे तिकीट मिळेल. त्यानंतर त्याला तातडीने दिल्लीला जावे लागेल. दोन ते तीन दिवसानंतरही त्याला कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही किंवा विमानाचं तिकीटही मिळालं नाही. तिकीट न मिळाल्याने त्याने पुन्हा त्या व्यक्तीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण समोरच्या व्यक्तीने फोन उचलणे बंद केलं. त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचं सय्यदच्या लक्षात आलं आणि त्याबाबत त्याने पोलिसात तक्रार दिली.


Special Report on Cyber Crime | फेसबुक, इन्स्टाग्राम वापरताय? सावधान; तुमची फसवणूक होऊ शकते




मुंबई सायबर सेलच्या डीसीपी डॉ. रश्मी करंदीकर म्हणाल्या की, ही तक्रार मिळाल्यावर त्यांच्या पथकाने सय्यदने ज्या खात्यावर पैसे पाठवले होते ते खाते फ्रीज केलं आहे आणि वेळेत त्याचे पैसे वाचले. करंदीकर यांनी लोकांना सांगितले की, जर त्यांना असे कोणतेही ईमेल आले तर प्रथम कंपनीच्या मूळ संकेतस्थळावर जाऊन एकदा ते तपासा कारण प्रत्येक मोठी कंपनी त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर रिक्त जागांची जाहिरात दाखवते, ज्यामुळे अधिकाधिक लोक या माहितीवर पोहोचू शकतील.


सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी मुंबईत पाच नवे सायबर पोलीस स्टेशन, कोणत्या तक्रारी नोंदवल्या जाणार?


महत्वाचे बाब म्हणजे कोणतीही मोठी कंपनी कधीही सिक्युरिटी डिपॉझिटच्या रूपात पैसे मागणार नाही. जर कुणी तुमच्याकडून पैशाची मागणी केली तर त्यांच्या ऑफरची एकदा पडताळणी करा. करंदीकर यांनी सांगितले की, अशा बर्‍याच तक्रारी आहेत ज्यामध्ये त्यांना नोकरी शोधणाऱ्या तरूणांना सायबर क्रिमिनल फसवत आहेत. हे गुन्हेगार मोठ्या कंपन्यांच्या नावावर बनावट ऑफर लेटर बनवतात आणि लोकांना मेल्स करतात. जे लोक यावर विश्वास ठेवतात त्यांची फसवणूक होते. त्यामुळे फसवणूक टाळण्यासाठी पडताळणी करणे आवश्यक आहे.