मुंबई : सध्या सायबर गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी मुंबईत पाच सायबर पोलीस स्टेशन उभारण्यात आले आहेत. या नवीन सायबर पोलीस स्टेशनमध्ये दोन लाखांपासून ते 50 लाखांपर्यंतच्या फसवणुकीचे गुन्हे दाखल केले जाणार आहेत. विशेष म्हणजे या पोलीस ठाण्यांमध्ये 50 टक्के मनुष्यबळ हे महिलांचे असणार आहे. सायबर कायद्याचे ज्ञान, गुन्हे उघडकीस आणण्यात असलेला अनुभव आणि सायबरचे प्रशिक्षण घेतलेल्या पोलिसांना प्राधान्य देण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या सर्व पोलिस स्टेशनचे उद्घाटन करण्यात आलं.


देशाची आर्थिक राजधानी मुंबईत सायबर गुन्ह्यांची संख्या तुलनेने अधिक आहे. सायबर गुन्ह्यांच्या तपासकरता, तांत्रिक मदतीसाठी पोलिसांना तसेच तक्रारदारांना गुन्हे शाखेच्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स इथल्या सायबर पोलीस ठाण्यावर अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे नवीन सायबर पोलीस स्टेशन सुरु करण्यात आली आहेत. स्थानिक पोलीस उपायुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या देखरेखीखाली पोलीस ठाण्याचे काम चालणार आहे. सायबर विभागात कामाचा अनुभव असलेले आणि सध्या प्रतिबंधक विभागाचे उपायुक्त बाळसिंग रजपूत यांची तांत्रिक कामकाजासाठी मदत घेण्यात येणार आहे.


आता डोळ्यांना न दिसणाऱ्या शत्रू संगे आपलं युद्ध सुरु झालंय : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


हे सायबर पोलीस ठाणे कुठे आहेत?

1. पूर्व विभाग - शिवाजीनगर पोलीस ठाणे, गोवंडी


2. पश्चिम विभाग - पश्चिम प्रादेशिक विभाग कार्यालय, वांद्रे


3. उत्तर विभाग - समता नगर पोलीस ठाणे


4. मध्य विभाग - वरळी पोलीस ठाणे


5. दक्षिण विभाग - दादासाहेब भडकमकर मार्ग पोलीस ठाणे


तर या सायबर पोलीस ठाण्यांमध्ये मनुष्यबळ कसा आणि किती असेल आणि कशाप्रकारच्या तक्रारी नोंदवण्यात येणार आहेत ते सुद्धा जाणून घेऊया.


असे असेल मनुष्यबळ


- वरिष्ठ पोलीस निरीक्षक - 5


- पोलीस निरीक्षक - 20


- सहाय्यक निरीक्षक - 30


- उपनिरीक्षक - 50


- कॉन्स्टेबल - 200





अशाप्रकारच्या तक्रारी घेतल्या जाणार

1. हॅकिंग - वेबसाईट, ईमेल आयडी, मोबाईल फोन, सिमकार्ड क्लोनिंग, स्फुपिंग, दुसऱ्याच्या आयपी अॅड्रेसचा वापर


2. फिशिंग - नायजेरिन फ्रॉड, जॉब रॅकेटिंग, लॉटरी फ्रॉड, नेटवर्किंगने मनी ट्रान्सफर


3. डेबिट/क्रेडिट कार्ड - ऑनलाईन खरेदी, ऑनलाईन बिल पेमेंट, रेल्वे तिकीट/ चित्रपट तिकीट बुकिंग, कार्ड क्लोनिंग, क्रेडिट कार्ड लिमिट


4. अश्लीलता - ईमेल/संकेतस्थळावर खोटे प्रोफाईल, अश्लील संदेश/ एमएमएस, पॉर्नोग्राफिक फिल्म्स


5. सायबर दहशतवाद - दहशतवादी कारवायांसाठी इंटरनेटचा वापर


6. खंडणी - सायबर पाठलाग, धमकी, बदनामी, पैशाचा, इंटरनेटचा वापर सॉफ्टवेअर पायरसी - पायरसी तसेच काळानुसार बदलणारे गुन्हे


त्यामुळे आता ज्या गतीने सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे, त्याच गतीने या सायबर गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी या सायबर पोलीस स्टेशनची सुरुवात केली आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात सायबर गुन्हेगारी आणि गुन्हेगार या दोघांनाही चांगला चाप बसेल अशी सकारात्मक अपेक्षा बाळगूया.