मुंबई : कोरोनाची सुरुवात होऊन आता एक वर्ष लोटलं. काही काळापूर्वी कोरोनाचा प्रसार राज्यात कमीदेखील झाला होता, मात्र आता या रोगानं महाराष्ट्रात पुन्हा डोकं वर काढलंय. सर्वत्र लॉकडाऊन नसला तरी नागरिकांनी नियमांचं, गाईडलाईन्सचं पालन करणं अजूनही अपेक्षित आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत असताना नागरिकांना कोरोनाचा विसर पडला आणि पुन्हा नागरिकांचा बेजबाबदारपणा सुरू झाला आहे. यावर उपाय म्हणजे कडक नियम, राज्यातील अनेक जिल्ह्यात आता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने निर्बंध घालण्याचा निर्णय अकोला, वर्धा, औरंगाबाद, नांदेड, बुलडाणा, वाशिम, भिवंडी, अमरावती, सांगली या जिल्हा प्रशासनांनी घेतला आहे.
दरम्यान याबाबत बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, अमरावती, अकोला, यवतमाळ जिल्ह्यामधील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. तिथली परिस्थिती गंभीर होत आहे. मी मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. आज 12.30 वाजता माहिती घेऊन बैठकीत या तीन शहरात काय निर्णय घ्यायचा ते ठरवलं जाईल. फक्त तीन शहरं की ग्रामीण भाग त्यात घ्यायचा, यावर निर्णय घेऊ, असं ते म्हणाले.
अजित पवार म्हणाले की, राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कठोर निर्णय घेण्याची गरज आहे. जानेवारी शेवटपर्यंत पॉझिटीव्ह संख्या कमी आणि डिस्चार्ज संख्या अधिक होती. 1 फेब्रुवारीपासून आता पॉझिटीव्ह संख्या आता वाढत आहे. अमरावती विभागात संख्या जास्त दिसत आहे, असंही ते म्हणाले.
सगळे जण कोरोना कमी झाला असल्यासारखे पूर्वीसारखं राहत आहेत. याने परिस्थिती गंभीर झाली आहे, असं अजित पवार म्हणाले.