मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबईसह राज्यभरात रुग्णांच्या उपचारासाठी बेड्सची मोठ्या प्रमाणावर कमतरता भासत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. यापुढे काही खाजगी रुग्णालयांतील बेड्सही कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवले जाणार आहेत. तसेच ज्या रुग्णांना आयसीयू बेड्सची गरज नाही, त्यांना शुल्क आकारून हॉटेल्समध्ये ठेवण्यात येणार आहे. या स्टेप डाऊन फॅसिलिटीसाठी दिवसाला 4 ते 6 हजारांचं शुल्क आकारण्यात येईल अशी माहिती मिळत आहे. 


कोरोनाचा उद्रेक महाराष्ट्रात वाढत असताना मुंबईत कोरोना आणीबाणीची वेळ आली आहे. त्यासाठी मुंबई महापालिका आयुक्तांमार्फत महापालिकेचा अॅक्शन प्लॉन तयार करण्यात आला आहे. मुंबईत आरोग्य सुविधेवर मोठा ताण येत आहे. त्यातच काही खासगी रुग्णालयांमध्ये सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांनीही बेड अडवून ठेवले आहेत. यावर उपाय म्हणून मुंबई महापालिकेनं अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता केवळ गरज असणाऱ्या रुग्णांनाच आयसीयू बेड उपलब्ध करुन दिला जाणार आहे. तर ज्या रुग्णांना आयसीयू बेड्सची गरज नाही, त्यांना शुल्क आकारून हॉटेल्समध्ये ठेवण्यात येणार आहे. यासाठी खाजगी हॉस्पिटल्सची मदत घेतली जाणार आहे. 


अनेकदा त्रास होऊ लागल्यावर खाजगी रुग्णालयात उपचार घेतात. काही रुग्ण गरज नसतानाही बेड अडवून बसतात. त्यासाठी महापालिकेनं खाजगी रुग्णालयांचं टायअप खाजगी हॉटेल्सशी करुन दिलं आहे. आता स्टेप डाऊन नावाची एक सुविधा रुग्णांना उपलब्ध करुन दिली जाणार आहे. ज्या रुग्णांना आयसीयू बेडची गरज नाही, त्या रुग्णांसाठी ही सुविधा वापरली जाणार आहे. 


मुंबई महापालिकेच्या प्रत्येक वॉर्डात नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती


कोरोना रुग्णांमध्ये ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्यास त्यांना तातडीनं उपचाराची गरज लागते. मात्र, अनेकदा बेड मिळत नाही. रात्रीच्या वेळेस बेड मिळवताना रुग्णांना प्रचंड त्रास होतो. लोकांना होणारा हा त्रास कमी व्हावा म्हणून नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यानुसार, मुंबई महापालिकेच्या 24 वॉर्डातील 'वॉर रूम' व जम्बो फिल्ड हॉस्पिटलसाठी हे नोडल अधिकारी काम करतील. विशेषत: रात्री 11 ते सकाळी 7 या वेळेत रुग्णांना लवकरात लवकर बेड कसा मिळेल हे पाहण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांवर असणार आहे. हे अधिकारी दुपारी 3 ते रात्री 11 आणि रात्री 11 ते सकाळी 7 अशा दोन शिफ्टमध्ये काम करतील. 'हे नोडल अधिकारी सातत्यानं एकमेकांच्या संपर्कात राहून रुग्णांच्या बेडची व्यवस्था करतील,' असं महापालिकेनं स्पष्ट केलं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :