मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) माजी मुख्यमंत्री उद्धव  ठाकरेंवर (Uddhav Thackeray) केलेल्या तिखट हल्ल्यांमुळे हिवाळी अधिवेशनाचा (Assembly Winter Session 2023) शेवटचा दिवस गाजला. मुख्यमंत्री शिंदे यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना उद्धव ठाकरेंच्या काळातील कोविड भ्रष्टाचारावर हल्लाबोल केला. त्यामुळे आता ठाकरे सरकार आणि  भ्रष्टाचाराचे आरोप  यांच्यामधील दुवा असलेली दोन प्रमुख नावं चर्चेत आली आहेत. भ्रष्टाचार प्रकरणातील दुवे म्हणून चर्चेत असलेली  ती नावं आहेत रोमिल छेडा (Romil Cheda) आणि पुण्य पारेख (Punya Parekh). पण या दोन्ही नावांचा कोविड काळातील भ्रष्टाचार आणि तत्कालीन सरकार यांच्याशी नेमका संबंध काय हा प्रश्न सध्या संपूर्ण महाराष्ट्राला पडलाय. 


मुख्यमंत्री शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनाचा शेवटच्या दिवशी ठाकरे गटावर कोविड काळातील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन तोफ डागली. कोविड काळामध्ये झालेलं कंत्राटांचं वाटप , त्यातील गैरव्यव्हार , आर्थिक घोटाळे आणि तत्कालिन ठाकरे सरकार यांच्यातील दुवा म्हणून काम करणारे रोमिल छेडा आणि पुण्य पारेख यांची ठाकरेंशी जवळक असल्याचा आरोप देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी केलाय. कोविड काळातील भ्रष्टाचार आणि तत्कालिन सरकार यांच्यातील दुवा म्हणून रोमिल छेडा, पुण्य पारेखला का बघितलं जातं? रोमिल छेडा आणि मातोश्री यांच्यातील नातं काय? कोविड मधील बहुतांश कंत्राट रोमिल छेडाच्याच कंपनीला का देण्यात आले? अश्या असंख्य प्रश्नांचं मोहोळ सध्या रोमिल छेडा आणि ठाकरे या नावांभोवती उठलंय.


कोण आहे रोमिल छेडा?


रोमिल छेडा हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीचा मालक आहे. रोमिल छेडा हा आदित्य ठाकरे यांचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जातो.कोविड काळात मुंबई महापालिकेत ऑक्सिजन प्लँट घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलाय. या घोटाळ्यात रोमिल छेडाचे नाव समोर आले. रोमिल छेडा याचे बोरिवलीत परिहार डिपार्टमेंटल हे कपड्याचं दुकान आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सभागृहात सांगितल्यानुसार, हायवे आणि ब्रिज बनवणाऱ्या कंपनीला पेंग्विनसाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीचे काम देण्यात आले. आतापर्यंत रोमिल छेडाला जवळपास 53 कंत्राटे दिल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.


रोमिल छेडावर आरोप काय?


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य ठाकरेंचा निकटवर्तीय म्हणून मुंबई महापालिकेच्या कंत्राटदारांच्या यादीत रोमिल छेडाचा बोलबाला होता.कोविड काळातील ऑक्सिजन प्लांट उभारणीच्या कंत्राटामुळे रोमिल छेडाचे नाव उघडपणे चर्चेत यायला लागले. रोमिल छेडाच्या कंपनीला ऑक्सिजन प्लँट उभारणीचे कंत्राट ऐन कोरोनात देण्यात आले. हे काम जुलैमध्ये पूर्ण होणे अपेक्षित असताना तीन महिने उशिरा – ऑक्टोबरमध्ये पूर्ण झाले, मात्र ते ऑगस्टमध्येच पूर्ण झाल्याचे कागदोपत्री दाखवण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. यासाठी त्या कंपनीला तीन कोटी रुपये दंड करण्यात आला होता. रोमिल छेडाच्या कंपनीला कंत्राट देण्याला तत्कालिन मंत्री तथा काँग्रेस आमदार अस्लम शेख यांनी विरोध केला होता. तो डावलून ठाकरे सरकारने हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीला कंत्राट दिले होते. विशेष म्हणजे, मुंबई महापालिका आणि राजस्थान सरकारने या कंपनीला ब्लॅकलिस्ट केले होते.


रोमिल छेडाच्या कंपनीला ऑक्सिजन प्लँट उभारणीसाठी 138 कोटींचा पुरवठा करण्यात आला होता. मात्र फक्त 38 कोटींचेच प्लँट त्याने उभे केले. 102 कोटी रुपये कुठे गेले, असा सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने प्राथमिक चौकशी करुन गुन्हा दाखल केला, तसेच तीन आठवड्यांपूर्वी रोमिल छेडाला अटक करण्यात आली आहे.ऑक्सिजन प्लांट व्यतिरिक्त रोमिल छेडाला कोविड काळात अनेक कंत्राटं मिळाली आहेत. 


कोविड काळात रोमिल छेडाला कोणती कंत्राटे मिळाली?


1) ऑक्सिजन प्लांट -- 


2) राणी बागेतील पेंग्विन कक्ष मेंन्टेनन्स 


3) कोविड सेंटरसाठीचे इन्फ्रास्ट्रक्चर अर्थात, खुर्ची, पलंग, इतर वस्तू पुरवण्याचे कंत्राट देण्यात आले होते.


 या वस्तू पुरवताना कोट्यवधींचे आकडे फुगवून बिले देण्यात आल्याचा आरोप आहे.


4) रोमिल छेडाला ऑक्सिजन प्लँटपासून रोबोटिक झू पर्यंतची सर्व कंत्राटे देण्यात आल्याचा विरोधकांचा आरोप आहे. 


5) मुंबई महापालिकेतील वॉटर प्यूरिफायरचेही काम त्याच्याच कंपनीला दिले गेले.  



मुंबईच्या राणीबागेतील पेंग्विनपासून सुरु झालेला रोमिल छेडाच्या कंत्राटांचा प्रवास  कोविड काळातील कोट्यावधीच्या ऑक्सिजन प्लांटपर्यंत येऊन थांबलाय. रोमिल छेडा सोबतच आणखीही कोविड भ्रष्टाचारातील दुवे असलेल्यांची नावे समोर येतायेत. 


पुण्य पारेख कोण?


पुण्य पारीख याचं नाव देखील एक नाव भ्रष्टाचारातील दुवा म्हणून रोमिल छेडासोबतच समोर येत आहे. रेमडेसिवीर खरेदी घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने पुण्यशाली उर्फ पुण्य पारेख यांची चौकशी केलीय. कोविड काळात रेमडेसिवीर इन्जेक्शनचं कंत्राट  ज्या कंपनीला देण्यात आलं ते पुण्य पारीख यांच्या मध्यस्तीनं मिळाल्याचा आरोप करण्यात आलाय. पारेख हे ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे निटवर्तीय मानले जातात.


करोना काळात  रेमडेसिविर 650  रुपये प्रति वायल दर होता. पण महापालिकेच्या मध्यवर्ती खरेदी विभागाने 1568 रुपये प्रति वायल्स दराने रेमडेसिविरची खरेदी करण्यात आली.  या काळात महापालिकेने 65 हजार रेमडिसिविर इंजेक्शन चढ्या भावाने खरेदी केल्याचा आरोप आहे. त्यामुळे महापालिकेचे पाच कोटी 70 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप देखील करण्यात आलाय. 


रोमिल छेडा आणि पुण्य पारेख यांच्या नावाचं कनेक्शन ठाकरेंशी जोडलं गेल्यानं आता पुन्हा एकदा कोविड काळातील भ्रष्टाचारावरुन  राजकारणाचं मैदान तापायला सुरुवात झालीय. त्यामुळे आता या प्रकरणाला कोणतं नवं वळण मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 


हेही वाचा : 


CM Eknath Shinde On Thackeray :आदित्य राजाच्या कृपेने वरुण राजाच्या टेंडरचा पाऊस; मुख्यमंत्र्यांनी ठाकरे सरकारच्या घोटाळ्यांची यादीच काढली