Mumbai Kurla News: मुंबई : देव तारी त्याला कोण मारी... असं बोललं जातं... तुम्हाला याचा प्रत्यय यापूर्वी अनेकदा आला असेलच. पण, मुंबईत (Mumbai News) घडलेल्या घडनेनं तुमचे डोळे नक्कीच विस्फारतील. मुंबईतील कुर्ला (Kurla News) म्हणजे, तसा गजबजलेला परिसर. याच कुर्ला परिसरात असणाऱ्या एका गगनचुंबी इमारतीतून एक 13 वर्षांची मुलगी चौदाव्या मजल्यावरुन खाली कोसळली. ऐकूनच अंगावर काटा येतोय ना?


पुढचा विचार करुन तर तुमच्या काळजाचा ठोकाच चुकला असेल. पण थांबा, या घटनेतील सुदैवाची बाब म्हणजे, या मुलीला काहीच झालेलं नाही. तिच्या हाताला फक्त किरकोळ दुखापत झाली आहे. हो... हो... तुम्ही बरोबर ऐकताय, एक उंच टॉवरच्या चौदाव्या मजल्यावरुन ही मुलगी खाली कोसळली, पण तिला काहीच झालेलं नाही. ती सुखरूप आहे. पाहुयात नेमकं काय घडलंय? 


मुंबईतल्या कुर्ल्यात 13 वर्षीय मुलगी थेट चौदाव्या मजल्यावरून खाली कोसळली. परंतु तिच्या हाताला किरकोळ दुखापत वगळता तिला इतर कोणतीही मोठी इजा झालेली नाही. सखीरा शेख असं या मुलीचं नाव आहे. सखीरा तिच्या कुटुंबासोबत कुर्ल्यातील नेहरू नगर येथील मिडासभूमी हार्मोनी या सतरा मजली इमारतीतील चौदाव्या मजल्यावर राहते.


काय घडलं नेमकं त्या दिवशी? 


ज्या दिवशी हा प्रसंग घडला, त्याच दिवशी सखीराचा वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त घरात जंगी सोहळा पार पडला. पाहुण्या रावळ्यांची रेलचेल होती. त्यानंतर वाढदिवसाला आलेल्या भेटवस्तू घेऊन एका कोपऱ्यात खिडकीजवळ गेली. भेटवस्तू उघडत ती त्यांच्यासोबत खेळत होती. खेळता खेळता ती खिडकीजवळ गेली आणि तिचा तोल गेला. सखीरा चौदाव्या मजल्यावरच्या खिडकीतून खाली कोसळली. 


खिडकीतून सखीरा कोसळली हे कळताच कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली, त्यांच्या सर्वांच्या काळजात धस्स झालं. सर्वांनी इमारतीच्या खाली धाव घेतली. कुटुंब इमारतीच्या खाली पोहोचताच त्यांना जे दिसलं ते पाहुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. सखीरा चौदाव्या मजल्यावरुन खाली कोसळली खरी, मात्र झाडांच्या फांद्या आणि इमारचीच्या खाली असलेल्या शेडच्या पत्र्यावर ती धडकली. सखीराला थोडीफार दुखापत झालेली, मात्र ती सुखरुप होती. कुटुंबानं तात्काळ सखीराला घेऊन सायनच्या टिळक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. तिथे तिच्यावर उपचार करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी केलेल्या सर्व तापसण्यांचे रिपोर्ट्स नॉर्मल आले. सखीराला किरकोळ दुखापत झाली असून ती पूर्णपणे सुखरुप असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आणि कुटुंबान सुटकेचा निश्वास सोडला. 


पाहा व्हिडीओ : Kurla Accident : कुर्ल्यात 14 व्या मजल्यावरून मुलगी पडली अन् जीव वाचला