ठाणे : अद्यापही रेल्वेला राज्य सरकारकडून जमीन आणि निधी हस्तांतरित करण्यात आलेला नाही त्यामुळे मुलुंड (Mulund) आणि ठाणे (Thane) दरम्यान नव्या स्थानकाचे काम देखील सुरु होऊ शकले नाही, अशी माहिती मध्य रेल्वेकडून (Central Railway) देण्यात आलीये. मध्ये रेल्वेचे मुंबई विभागीय व्यवस्थापक रजनीश गोयल यांनी ही स्पष्टोक्ती दिली आहे. ठाणे आणि मुलुंड दरम्यान नवं स्थानक उभारण्यात यावं हा मुख्यमंत्री शिंदे यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता, असं सांगण्यात आलं होतं. पण राज्य सरकारकडूनच विलंब होत असल्याची माहिती समोर आलीये.
पालिका निवडणुकीपासूनच म्हणजेच 2017 साली ठाणे ते मुलुंड दरम्यान नवे स्थानक उभारण्यात येण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर ठाणे मनोरूग्णालयाच्या जागेवर नविन स्थानक बांधले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने ठाणे मनोरूग्णालयाच्या जागेच्या हस्तांतरणावर लावलेली स्थगिती देखील उठवण्याचा आदेश देखील दिला. त्यामुळे राज्याच्या आरोग्य विभागाकडून मध्य रेल्वला जागा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता. पण अद्यापही ही जागा मध्य रेल्वेला हस्तांतरित करण्यात आली नसल्याचं सांगण्यात येत आहे.
गर्दी कमी करण्यासाठी नव्या स्थानकाची निर्मिती
मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाणे महानगर पालिकेच्या स्मार्ट सिटी योजनेंतर्गत या नव्या स्थानकासाठी 289 कोटींचा निधी मंजूर केला होता. त्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ठाणे मनोरुग्णालयाच्या एकूण 72 एकर जागेपैकी 14 एकराहून अधिक जागा रेल्वेला मंजूर करण्यात आली होती. या नव्या रेल्वे स्थानकासाठी 14.83 एकर जागा वापरली जाणार आहे.नविन रेल्वे स्थानकाच्या उभारणीनंतर ठाणे रेल्वे स्थानकाचे प्रवासी 31 टक्क्यांनी तर मुलुंड स्थानकातील प्रवासी 21 टक्क्यांनी घटणार असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं होतं. आताच्या स्थितीला ठाणे स्थानकावरुन सुमारे 7.50 प्रवासी प्रवास करत असतात.
कायमच गर्दी असणाऱ्या ठाणे रेल्वे स्थानकावरील ताण कमी व्हावा यासाठी ठाणे आणि मुलुंड स्थानकादरम्यान नवे स्थानक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. या स्थानकाच्या आराखड्यास रेल्वे विभागाने यापूर्वीच मंजुरी देण्यात आलीये. तसेच रेल्वे आणि ठाणे महानगरपालिकेकडून इतर कामे करण्यात येणार आहेत.या संपूर्ण प्रकल्पाचे काम ठाणे स्मार्ट सिटी योजनेतून करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली होती. पण आता या कामाचा मुहूर्त कधी लागणार याकडे लक्ष लागून राहिलं आहे.