Aryan Khan Case : होय, गांजाचे सेवन करतो..आर्यन खानने NCB ला दिलेल्या जबाबात आणखी काय म्हटले?
Aryan Khan Case : गांजाचे सेवन करत असल्याची कबुली आर्यन खानने एनसीबीला दिली आहे. आर्यन खानचा जबाब एनसीबीने आपल्या आरोपपत्रात नमूद केला आहे.
Aryan Khan Case : क्रूज ड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने क्लिन चीट दिली असली तरी त्याचा जबाब या प्रकरणातील आरोपपत्रात नमूद करण्यात आला आहे. आर्यन खानने एनसीबी अधिकारी आशिष रंजन यांच्याकडे आपला जबाब नोंदवला आहे. आर्यन खानने त्याच्याकडे दोन फोन क्रमांक असल्याचे जबाबात म्हटले आहे. त्यातील एका क्रमांक भारतातील असून फोनवर बोलण्यासाठी त्याचा वापर करतो. तर, दुसरा मोबाइल क्रमांक हा अमेरिकेतील असून या क्रमांकाचा वापर हा व्हॉट्सअॅपसाठी केला जातो.
गांजा सेवनाची दिली कबुली
आर्यन खानने एनसीबी अधिकारी आशिष रंजन यांच्यासमोर दिलेल्या जबाबानुसार, त्याने गांजा सेवन केला असल्याची कबुली दिली. आर्यनने 2018 मध्ये पहिल्यांदा गांजा सेवन केाला असल्याची कबुली एनसीबीकडे दिली. तेव्हापासून तो गांजा सेवन करत आहे. आर्यन खान हा 2018 मध्ये अमेरिकेत पदवीचे शिक्षण घेत होता. त्यावेळी त्याला झोप न येण्याची समस्या जाणवत होती. त्यातून त्याने इंटरनेटवर माहिती मिळवली. गांजाचे सेवन केल्यास झोप न येण्याच्या त्रासातून सुटका होऊ शकते, असे त्या माहितीत म्हटले होते. त्यानंतर आर्यनने गांजा सेवन करण्यास सुरुवात केली असल्याचे आपल्या जबाबात त्याने म्हटले.
अरबाज मर्चंटला मागील सात-आठ वर्षांपासून आपण ओळखत असल्याची कबुलीदेखील आर्यनने दिली. अरबाज हा गांजा आणि चरसचे सेवन करतो. मात्र, मला चरस सेवन करण्यास आवडत नसल्याचे आर्यनने एनसीबीला सांगितले.
त्या दिवशी काय झाले?
आर्यन आपला मित्र प्रतिक, मानव, अरबाजसह एका मर्सिडिज कारमध्ये बसून बॅलार्ड पिअर येथील ग्रीन गेटजवळ पोहचले. त्यावेळी ही कार मिश्रा नावाचा चालक चालवत होता.
आर्यनने आपल्या जबाबात सांगितले की, आम्ही जवळपास दीड वाजण्याच्या सुमारास ग्रुप पार्टीसाठी क्रूज टर्मिनलवर पोहचलो. अरबाजने क्रूजवर चरस आणणार असल्याचे सांगितले. 2 ऑक्टोबर 2021 च्या दिवशी आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनलच्या चेकिंग पॉईंटवर एनसीबीचे अधिकारी आशिष रंजन प्रसाद यांनी आर्यन खानला रोखले होते. त्यावेळी आर्यन खानची ओळख तत्कालीन एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्याशी करून देण्यात आली. समीर वानखेडे हे राजपत्रित अधिकारी असल्याचे सांगण्यात आले. आर्यन खानला ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्याला एनडीपीएस कायद्यानुसार त्याला असणारे अधिकार सांगण्यात आले. त्याशिवाय आर्यनने स्वत: हून आपला मोबाइल फोन एनसीबी अधिकाऱ्यांकडे सोपवला. आर्यनला ताब्यात घेतले तेव्हा त्याच्याकडून कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थ आढळून आले नाहीत.
आर्यनच्या मोबाइलमधील काही मेसेजची तपासणी केल्यानंतर एनसीबी अधिकाऱ्यांनी अरबाजला ओळखतोस का असा प्रश्न आर्यनला विचारला. त्यावक त्याने होकारार्थी उत्तर दिले. अंमली पदार्थाचे सेवन करतो का या प्रश्नालाही आर्यनने होकारार्थी उत्तर देत गांजा आणि चरसचे सेवन करत असल्याचे सांगितले. अरबाज मर्चेंटने त्याच्या जवळील चरसच्या दोन लहान पुड्या एनसीबी अधिकारी आशिष रंजन यांच्याकडे सोपवल्याचे ही आर्यनने आपल्या जबाबात म्हटले. तपासणीनंतर एनसीबी अधिकाऱ्यांनी या पुड्या सील केल्या.
ताब्यात घेतल्यानंतर काय झाले?
आर्यन खानने आपल्या जबाबात म्हटले की, त्याला आणि त्याच्या मित्रांना ताब्यात घेतल्यानंतर एका केबिनमध्ये त्यांना बसवण्यात आले. त्यानंतर त्यांना एनडीपीएस कायद्यातील कलम 67 नुसार नोटीस बजावण्यात आली आणि स्वत: च्या मर्जीने जबाब नोंदवण्यास सांगितले. व्हॉट्स अॅपमधील चॅट स्वत: चे असल्याची कबुली आर्यनने दिली. हे चॅट त्याचा मित्र अचित कुमारसोबतचे होते. हे चॅट पोकर गेम आणि अंमली पदार्थाशी संबंधित असल्याचे त्याने सांगितले. अचित कुमारकडे आर्यन खानचे 80 हजार रुपये थकित आहेत. ही रक्कम देण्यास अचित कुमार असमर्थ होता. थकित पैशांऐवजी त्या प्रमाणात गांजाची मागणी आयर्नने केली होती. अचित कुमार हा वांद्रे आणि पवईतील अंमली पदार्थ पुरवणाऱ्यांना ओळखत होता. त्यामुळेच तो आर्यनला अंमली पदार्थ उपलब्ध करून देऊ शकत होता.
अटकेची कारवाई
आर्यन खानचे व्हॉट्स अॅप चॅट, दिलेला कबुली जबाब आणि अरबाज मर्चंट जवळून मिळालेल्या अंमली पदार्थाच्या आधारे एनसीबीने 3 ऑक्टोबर 2021 रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आर्यनला अटक करण्यात आली. अटकेच्या कारवाईची आर्यनला माहिती देण्यात आली. आपल्याला अटक झाल्याची माहिती आर्यनने आपल्या कुटुंबाला दिली.