मुंबई : मुकेश अंबानी यांच्यासारखे उद्योजक सुरक्षित नाहीत. त्यांच्या घराबाहेर आढळलेली जिलेटिनने भरलेली गाडी आणि संपूर्ण घटनाक्रम संशय निर्माण करणारा आहे. त्यामुळे तपास एनआयएकडे सोपवावा अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. सोबतच या प्रकरणात त्यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले. विधानसभेत बोलताना त्यांनी मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेल्या स्फोटकांचा घटनाक्रमासह अनेक मुद्द्यांवरुन सरकारवर आरोप केले.


मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी आणि सचिन वझे
देवेंद्र फडणवीस यांनी मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर पार्क केलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या प्रकरणावर अनेक प्रश्न उपस्थित केले. यावेळी ते म्हणाले की, "मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर रात्री एक वाजता गाडी पार्क झाली. तीन वाजता ड्रायव्हर मागच्या गाडीतून पळून गेला. एकच गाडी नव्हती, स्कॉर्पिओपाठोपाठ आणखी एक गाडी आली. दोन्ही गाड्या ठाण्यातून आल्या. ही गाडी तिथे पार्क होती, तिची ओळख पटल्यानंतर सर्वात आधी मुंबई पोलिसांचे सचिन वाझे तिथे पोहोचले. कोणीही पोहोचण्याच्याआधी ते आले, क्राईमचे पोलीस आहे, मग स्थानिक पोलीस आले. मग सचिन वाझेंना आयओ म्हणून अपॉईंट केलं. तीन दिवसांपूर्वी त्यांच्याऐवजी एका एसीपींना आयओ म्हणून नेमलं. सचिन वाझेंना का काढलं? हे मला समजलं नाही. पण यात योगायोग आहे. माझ्याकडे सीडीआर आहे, गाडीमालकाने गाडी चोरी झाल्याची तक्रार केली, ती गाडी अंबानींच्या घराबाहेर उभी होती. त्यांनी आपल्या जबाबात एक टेलिफोन नंबर सांगितला आहे. या नंबरचा एका नंबरशी संवाद 8 जून 2020, 25 जुलै 2020 त्यानंतर अनेक वेळा दिसतोय. हा नंबर आहे, सचिन हिंदुराव वाझे. ज्या दिवशी ही गाडी ठाण्याला बंद पडल्यानंतर गाडी मालक ओला घेऊन क्रॉफर्ड मार्केटला गेला. तिथे पोलीस आयुक्तांचं ऑफिस आहे. तिथे तो एका व्यक्तीला भेटला. ती व्यक्ती कोण? हा माझा प्रश्न आहे. हे जर काढलं तर सोपं आहे. ओलामध्ये बसून गेला त्याचा रेकॉर्ड आहे. ओलाच्या ड्रायव्हरने त्याला पाहिलंय, तो कोणाला भेटला हे पाहिलं आहे. अशा परिस्थितीत एवढे योगायोग कसे हे समजत नाही. वझे ठाण्यात राहणारे, ज्याची गाडी घरासमोर पार्क केली तोही ठाण्यात राहणारा, घटनेच्या कितीतरी दिवसांपूर्वी त्यांचं फोनवरुन संभाषण झालं आहे. म्हणजे ते एकमेकांना ओळखतात. खूप मोठे प्रश्न निर्माण झाले. ती गाडी दिसल्यावर पहिल्यांदा तिथे वाझे पोहोचले. स्थानिक पोलीस नाही, क्राईम पोलीस नाही तर ते पोहोचले. हे धमकीचं पत्र वाझेंनाच मिळालं, त्यांनीच तिथे डिलिव्हर केलं. मग त्यानंतर योगायोग पाहा. टेलिग्राम चॅनल तयार होतं. जैश-उल-हिंद नावाने पत्र दाखवलं जातं, जणू खंडणी मागण्याकरता हे करण्यात आलं. मात्र जैश-उल-हिंद म्हणतं हे आमचं पत्रच नाही. खूप मोठी शंका या प्रकरणात तयार झाली आहे. म्हणून माझी मागणी आहे, हे पुरावे शंकेला वाव देणारे आहेत. ही टेरर अॅक्टिव्हिटी आहे, कारण जिलेटिन होतं. जैश-उल-हिंदचं नावं आलेलं आहे, उडवून देण्याची धमकी आहे. या संपूर्ण घटनेची चौकशी एनआयएकडे द्यावी. हे योगायोग काय आहेत, याची चौकशी एनआयएने करावी, अशी माझी मागणी आहे."


मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्याने खळबळ
26 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी दक्षिण मुंबईतील पेडर रोड परिसरात जिलेटिनच्या कांड्यांनी भरलेली स्कॉर्पिओ कार सापडली होती. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक मुकेश अंबानी यांचा बंगला अँटिलियापासून अवघ्या 600 मीटर अंतरावर ही कार पार्क केली होती. जिलेटिनच्या कांड्यांनी भरलेली स्कॉर्पिओ कार उभी करणारे लोक कोण होते, याचा तपास मुंबई पोलीस करत आहेत.


अंबानी कुटुंबाला पत्राद्वारे धमकी
मुकेश अंबानींच्या घराबाहेर पार्क केलेल्या स्कॉर्पिओमध्ये स्फोटकं आणि धमकीचं पत्र आढळून आल्यानं खळबळ उडाली. चिठ्ठीत लिहिलं की, "नीता भाभी आणि मुकेश भैया ही तर झलक आहे. पुढच्या वेळी हे सामान पूर्ण होऊन येईल. संपूर्ण कुटुंबाला उडण्याची व्यवस्था केली गेली आहे. काळजी घ्या." घटनास्थळी सापडलेली स्कॉर्पियो कार ही काही दिवसांपूर्वीच चोरीला गेली होती. याबाबत पोलिसातही तक्रार करण्यात आली होती.


संबंधित बातम्या