मुंबई : अंतराळाची व डिजिटल इंटरॅक्टिव क्लासरुम या प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा आज शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आला. आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या 'विज्ञान विद्यार्थ्यांच्या दारी' या अंतराळ व डिजिटल इंटरॅक्टिव क्लासरुम या प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली होती. कर्जत जामखेड या तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधन या विषयात रुची निर्माण व्हावी यादृष्टीने "सफर अंतराळाची"तसेच शालेय विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण मिळावे यासाठी डिजिटल इंटरॅक्टिव क्लासरुम तयार करण्यात आले.
आता त्यानुसार,कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेद्वारे हे फिरते तारांगण व टेलिस्कोप प्रत्येक शाळेमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. तारांगणमध्ये विद्यार्थ्यांना नेहरू तारांगण प्रमाणे अवकाशाबद्दल रंजक माहिती मिळेल तसेच टेलिस्कोप द्वारे प्रत्यक्ष ग्रह, तारे बघायला मिळतील. आपल्या आकाशगंगा , ग्रह , तारे, अंतराळ या सगळ्या गोष्टींबद्दल उत्कंठा निर्माण होईल आणि भविष्यात या क्षेत्रात आपले करियर घडवतील, या अपेक्षेने आपण सदर प्रकल्प सुरू केलेला आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना तसेच इतर मुलांना आपल्या घरीच किंवा शाळेत बसून आकाशगंगा पाहावयास मिळणार आहे. या मुळे विद्यार्थ्यांत चिकित्सक दृष्टीकोन व वैज्ञानिक जिज्ञासीवृत्ती जोपासली जाईल. शिक्षणात रुची निर्माण व्हावी यादृष्टीने रोहित पवार यांनी योजलेल्या या अनोख्या प्रकल्पाचे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रशंसा केली.आज नव्या आधुनिक कल्पना येत आहेत व ग्रामीण भागातील खेड्या-पाड्यांतील, वस्तीशाळातील विद्यार्थी शिक्षण प्रवाहात कसा राहील याचा विचार करत आहेत ही खरी शैक्षणिक क्रांती करण्याचे काम आजचे युवा नेतृत्व करत आहे याबद्दल शालेय शिक्षण मंत्री वर्षा मंत्री यांनी रोहित पवार यांचे कौतुक केले.
शिक्षण क्षेत्रात काम करत असताना विद्यार्थी व समाज हित लक्षात घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे असे करत असताना राजकीय दृष्टीकोन न ठेवता विद्यार्थी व शैक्षणिक गुणवत्ता साधली पाहिजे असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने अभ्यासक्रम समजावा आणि त्यांनी डिजिटल शिक्षण आत्मसात करावे यासाठी डिजिटल इंटरॅक्टिव पॅनल प्रत्येक जिल्हा परिषद शाळेत देण्यात आहे. यापूर्वी 200 शाळांमध्ये सदर पॅनल देण्यात आले असून उर्वरित 200 शाळांमध्ये आता देण्यात येईल. याप्रसंगी कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.