मुंबई : भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थान असलेल्या अँटिलियापासून हाकेच्या अंतरावर चार दिवसांपूर्वी स्फोटक असलेली गाडी ठेवण्यात आली होती. मात्र यामागे कोण आहे? हे मात्र अद्याप कळू शकलेलं नाही. मुंबई पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश अंबानी यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षा रक्षकांचे जबाबही याप्रकरणी नोंदवण्यात आले आहेत. याप्रकरणी 700 पेक्षा अधिक सीसीटीव्हीची पाहणी करण्यात आली. 10 पोलीस पथकं तयार करण्यात आली आहेत.


पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आलेली स्कॉर्पिओ गाडी अंबानींच्या घराबाहेर पार्क करुन आरोपींनी ज्या गाडीतून पळ काढला होता, ती गाडी मुलुंड टोल नाका पार करताना टोल नाक्यावरील सीसीटीव्हीमध्ये दिसून आली. पण त्या पुढील टोल नाक्यावर ती गाडी सीसीटीव्हीमध्ये दिसली नाही. दरम्यान, मुलुंड टोलनाक्यापुढे पडघा टोल नाका येतो आणि इनोव्हा कार हाच टोलनाका पार करताना दिसत नाहीये. तपास यंत्रणांनी पडघा टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज पुन्हा पुन्हा तपासलं परंतु, ती गाडी सीसीटीव्हीमध्ये दिसली नाही.


सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आरोपींनी मुकेश अंबानी यांच्या बंगल्याबाहेर स्कॉर्पियो गाडी पार्क करून ज्या इनोव्हा गाडीतून पळ काढला होता, त्या गाडीची नंबर प्लेट बनावट होती, त्या नंबर प्लेटची कोणतीही गाडी अस्तित्वातच नाही. इनोव्हा गाडीवर जी नंबर प्लेट दिसत आहे, ती नंबर MH04AN सीरिज आहे. आणि ही सीरिज केवळ सरकारी गाड्यांसाठी दिली जाते. या सीरिजमध्ये आरटीओने 4500 च्या पुढे नंबर देणं बंद केलं आहे. अशातच या गाडीच्या नंबर प्लेटमध्ये 4500 च्या पुढील नंबरचा वापर करण्यात आला आहे. यामुळे ही गोष्ट स्पष्ट होते की, आरोपींनी याबाबत माहिती असू शकते. तसेच आरोपींनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मुद्दाम अशा नंबर प्लेटचा वापर केला आहे. तसेच पोलिसांनी आता मुलुंड टोल नाका आणि पडघा टोलनाक्या दरम्यान आपल्या तपास सुरु केला आहे.


पोलिसांच्या रेकॉर्डनुसार, 2013 नंतर आतापर्यंत अंबानी कुटुंबियांना एकही धमकी मिळाली नव्हती. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थाना बाहेर रस्त्यावर पार्क केलेल्या स्कॉर्पिओ कारमध्ये स्फोटकं सापडल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणात पहिला पुरावा पोलिसांच्या हाती लागला होता, तो म्हणजे स्कॉर्पिओ पार्क करतानाचं सीसीटीव्ही फुटेज. ज्या व्यक्तीने कार पार्क केली होती, तो सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आला होता. त्याने मास्क घातला होता, तर डोके हुडीने झाकलेले होते. त्यामुळे त्याची ओळख पटू शकलेली नाही. त्यामुळे अद्याप पोलिसांना या प्रकरणाचा छडा लागलेला नाही.


मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं सापडल्या प्रकरणी ह्यूमन इंटेलिजेंसच्या आधारावर पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपली ओळख लपवण्यासाठी सीसीटीव्ही, मोबाईल फोन किंवा दुसऱ्या टेक्निकल इक्विपमेंट्सचा वापर केला नव्हता. तसेच आतापर्यंत मुंबई पोलीस अनेक ठिकाणी तपास करत आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


मुकेश अंबानींच्या घराखाली स्फोटकं ठेवली कोणी? 4 दिवस उलटूनही आरोपी मोकाट