मुंबई : उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर ज्या रात्री स्फोटकं ठेवण्यात आली. त्या रात्री आरोपींनी पळ काढलेली संशयास्पद इनोव्हा गाडी मुलुंड टोलनाक्यावरच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याद कैद झाली आहे. ही गाडी स्वतः सचिन वाझे चालवत असल्याचा संशय एनआयएला आहे. तसेच 25 फेब्रुवारी रोजीचं रात्री एक वाजून 20 मिनिटांचं मुलुंड टोलनाक्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. त्यामध्ये आरोपींनी पळ काढलेली संशयास्पद इनोव्हा गाडी दिसत आहे. 


याप्रकरणाची चौकशी करताना पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आलेली स्कॉर्पिओ गाडी अंबानींच्या घराबाहेर पार्क करुन आरोपींनी ज्या गाडीतून पळ काढला होता, ती गाडी मुलुंड टोल नाका पार करताना टोल नाक्यावरील सीसीटीव्हीमध्ये दिसून आली. पण त्या पुढील टोल नाक्यावर ती गाडी सीसीटीव्हीमध्ये दिसली नाही. दरम्यान, मुलुंड टोलनाक्यापुढे पडघा टोल नाका येतो आणि इनोव्हा गाडी हाच टोलनाका पार करताना दिसत नाहीये. तपास यंत्रणांनी पडघा टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज पुन्हा पुन्हा तपासलं परंतु, ती गाडी सीसीटीव्हीमध्ये दिसली नव्हती. 


मनसुख हिरण संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयए करणार : सूत्र 


मनसुख हिरण संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयए करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. कोणत्याही क्षणी दिल्लीहून यासंबंधात आदेश येण्याची शक्यता आहे. मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर काही दिवसांपूर्वी स्फोटकं असलेली स्कॉर्पिओ गाडी आढळून आली होती. ही गाडी मनसुख हिरण यांच्या मालकीची होती. परंतु, या घटनेच्या काही दिवसांपूर्वीच आपली गाडी चोरी झाल्याची तक्रार मनसुख हिरण यांनी दिली होती. त्यानंतर या प्रकरणी अनेक महत्त्वाचे खुलासे झाले. सध्या या प्रकरणी एनआयए तपास करत असून सचिन वाझे यांना एनआयएनं ताब्यात घेतलं आहे. त्यांची कसून चौकशी सुरु आहे. अशातच आता स्फोटकं आढळलेल्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरण यांच्या संशयास्पद मृत्यूचा तपासही एनआयए करणार असल्याची माहिती मिळत आहे. 


मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सापडली!


भारतातील श्रीमंत उद्योजक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली जीप आढळल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानाजवळ जिलेटिनचा साठा सापडला. मुंबई पोलीस, फॉरेन्सिक टीम, आणि श्वानपथकं घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे. या स्फोटकांसह एक चिठ्ठीही सापडली असून त्यामधून घातपाताची धमकी दिल्याचं समजतं. पोलीस आणि तपास यंत्रणांकडून सीसीटीव्ही फूटेज तपासण्याचं काम सुरु आहे. मुकेश अंबानी यांचं अँटिलिया हे निवासस्थान हे पेडर रोडवर आहे. हा उच्चभ्रू परिसर आहे. दरम्यान काल मध्यरात्री एक वाजता अँटिलियाजवळ ही स्कॉर्पिओ कार पार्क केल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फूटेजमधून समोर आलं आहे. तर आज दुपारी तीन वाजता या कारसंदर्भातील फोन आल्याचं कळतं.


महत्त्वाच्या इतर बातम्या :