मुंबई : सचिन वाझे प्रकरणात एक मोठा गौप्यस्फोट झाला आहे. एनआयएच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन वाझे यांनी पीपीई किट घातलेलं नव्हतं. एनआयएला तपासात मिळालेल्या माहितीनुसार, तो पीपीई किट नव्हता, तर तो पांढरा कुर्ता होता. याप्रकरणात समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केल्यावर एनआयएच्या निदर्शनास ही बाब आली. 


एनआयएच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन वाझे यांनी पीपीई किट घातलेलं नसून पांढरा कुर्ता पायजामा घातला होता. सचिन वाझे यांनी त्यादिवशी पांढरा कुर्ता आणि पायजामा घातला होता. सीसीटीव्हीमध्ये काही कळू नये यासाठी त्यांनी पांढरा कुर्ता आणि पायजामा घातला होता. तसेच डोक्याला रूमाल बांधला होता. एवढंच नाहीतर त्यांनी तोंडावर मास्कही लावला होता, त्यामुळे त्यांचे केवळ डोळेच उघडे दिसत होते. त्यांच्या या पेहरावामुळेच ओळख पटण्यात अडचणी येत होत्या. सचिन वाझे यांना माहिती होतं की, जर ते पीपीई किट घालून फिरले तर कोण्याच्या तरी नजरेत ते आले असते. त्यामुळेच सचिन वाझे यांनी ढगळा कुर्ता, पायजामा, रुमाल आणि मोठ्या मास्कचा वापर करुन चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला होता. 


Sachin Vaze | अंबानींच्या घराबाहेर पीपीई किटमध्ये सचिन वाझेच असल्याची एनआयएला शंका


मुंबई पोलीसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने एबीपी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, विक्रोळी पोलीस स्टेशनने मनसुख यांची स्कॉर्पिओ चोरी झाल्याचा गुन्हा नोंदवला होता. त्या प्रकरणात पोलिसांनीही काही गडबड केली होती. पोलिसांनी गाडीच्या मालकांशिवाय गाडी चोरी झाल्याचा एफआयआर रजिस्टर केली होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांना शंका आहे की, कोणीतरी त्यांना फोन करुन नियम न पाळता एफआयआर दाखल करण्यास सांगितलं होतं. याप्रकरणी अंतर्गत चौकशीचे आदेश दिले आहेत. जर या प्रकरणी कोणताही अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई केली जाईल, असं संबंधित अधिकाऱ्यानं सांगितलं.


सचिन वाझे वापरत असलेली मर्सिडीज कार एनआयएच्या ताब्यात; कारमधून बॅग, डायरी, शर्ट आणि काही रक्कम जप्त


'ती' व्यक्ती वाझेच!
मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर जी व्यक्ती दिसून आल्याचं एका फूटेजमध्ये आढळून आलं होतं, ती व्यक्ती सचिन वाझेच असल्याची शक्यता एनआयएकडून वर्तवण्यात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सचिन वाझे यांच्या ड्रायव्हरनंच याबाबतची माहिती एनायएला दिलेल्या जबाबात नोंदवल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे सचिन वाझे यांच्याविरोधात सापडणारे हे सबळ पुरावे पाहता त्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.  दरम्यान, सचिन वाझे वापरत असलेली मर्सिडीज कार एनआयएच्या अधिकाऱ्यांनी तपासादरम्यान ताब्यात घेतली आहे. या मर्सिडीज कारमधून बॅग, डायरी, शर्ट आणि काही रक्कम जप्त करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. तसेच एनआयए अधिकाऱ्यांकडून या मर्सिडीज कारची कसून चौकशी सुरु आहे. मुख्य म्हणजे जे कपडे मिळाले आहेत, त्यामध्ये एक शर्टही आहे. हे शर्ट वाझेंनी 24 तारखेला घातलं होतं. त्यामुळे आता संशयाची सर्व दिशा ही वाझेंकडेच पोहोचली आहे.