मुंबई : दादर, घाटकोपरसह मुंबईतील अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून मुंबई मेट्रो ठप्प झाली आहे. काही ठिकाणी पत्रे उडून गेले तर वडाळा येथील पार्किंग टॉवर कोसळला आहे. तसेच मुलुंडजवळ ओव्हरहेड वायरवर खांब कोसळला तर विमानसेवेवर देखील परिणाम झाला आहे. या ढगाळ हवामानाचा फटका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना देखील बसला आहे.


आज लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) महाराष्ट्रात चौथ्या टप्प्याचे मतदान सुरु आहे. तसेच राज्यभर नेत्यांच्या सभा देखील सुरु आहे. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्र दौऱ्यावर होते. धुळे लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ त्यांनी सभा घेतली. त्यानंतर पालघर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार हेमंत सावरा यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभा घेतली. 


अमित शाह, एकनाथ शिंदे बाय रोड मुंबईकडे रवाना


ही सभा होत नाही तोच मुंबईत अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले. मुंबईत सोसाट्याचा वारा सुटून जोरदार पावसाला सुरुवात झाली. या खराब वातावरणाचा फटका केंद्रीय गृहमंत्री अमित अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बसला. अमित शाह आणि एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरद्वारे मुंबई विमानतळावर पोहोचणार होते. मात्र खराब वातावरणामुळे हेलिकॉप्टरचा प्रवास रद्द करून दोघेही रस्ते मार्गाने मुंबई विमानतळाकडे रवाना झाले आहेत. 


अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज


पुणे आणि रायगड जिल्ह्यात देखील पुढील 3-4 तास अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, आणि धुळ्यात पुढील 3 ते 4 तास वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तर मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा (50-60 किमी प्रतितास वेग), हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. बदलापूरमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे तर कल्याण, डोंबिवलीत धुळीसह जोरदार वारा वाहत असून काही ठिकाणी पावसाला सुरूवात झाली आहे. विक्रोळी, भांडूप, मुलुंड परिसरात ढगाळ वातावरण झालं असून जोरदार  वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला आहे.


आणखी वाचा 


मुंबईत सोसाट्याचा वारा, रस्ते, रेल्वे, मेट्रो, विमान, सगळी वाहतूक कोलमडली, मुलुंडजवळ ओव्हरहेड वायरवर खांब कोसळला!


वादळ वारं सुटलं गं.. रायगडमध्ये अवकाळी, नाशिक, पालघर, पुणे घाटात पुढील 3-4 तासांत पावसाच्या सरी