मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी वादळी पावसाला सुरूवात झाली असून मुंबई आणि नवी मुंबईतही जोरदार वाऱ्यासह पाऊस (Mumbai Rain Update) पडत आहे. मुंबई उपनगरातील विक्रोळी, भांडूप आणि मुलुंडूमध्ये मोठा पाऊस पडत असून रस्त्यांच्या कडेला पाण्याचा लोट असल्याचं दिसतंय. तर अचानक आलेल्या या पावसामुळे वाहतूक व्यवस्था काहीशी मंदगतीने सुरू आहे. तर घाटकोपर ते वर्सोवाची मेट्रो व्यवस्थाही ठप्प झाल्याची माहिती आहे. 


गेल्या काही दिवसांपासून उष्णतेमुळे मुंबईकर हैराण झाले होते. आजच्या पावसामुळे त्यांना काहीसा दिलासा मिळाल्याचं दिसतंय. मुंबईतील पूर्व आणि पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. पूर्व उपनगरात, विक्रोळी, भांडूप मुलुंडमध्ये मोठा पाऊस सुरू असल्याने वाहनं ही हळूहळू पुढे सरकत आहेत. घाटकोपरमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅम झालं आहे. इतरही अनेक ठिकाणी हीच स्थिती असल्याची माहिती आहे. 


दादर भागामध्ये धुळीचं वादळ


दादर परिसरात धुळीचं वादळ आल्याने वातावर काहीसं धुरकट झाल्याचं दिसतंय. या ठिकाणी वाऱ्याचा वेग वाढल्याने पावसालाही सुरूवात सुरू आहे. पुढच्या तीन ते चार तासांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


मुंबई विमानतळाचं रनवे बंद


पाऊस, वादळी वारे यामुळे मुंबई विमानतळाचा रनवे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक फ्लाईट्स दुसरीकडे वळवण्यात आल्या आहेत. 


पूर्व द्रुतगती मार्गावर झाडं कोसळली


जोरदार पावसामुळे पूर्व द्रुतगती मार्गावर झाडं कोसळली.  जोरदार पाऊस, वादळी वाऱ्याचा मुंबईला मोठा फटका बसल्याचं दिसतंय. जागोजागी झाडं कोसळल्यामुळे वाहतूक व्यवस्था खोळंबल्याचं दिसून आलंय. 


कोस्टल रोडवर मुसळधार पाऊस


मुंबईतील कोस्टल रोडवर मुसळधार पावसाला सुरूवात झाल्याची माहिती आहे. ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण निर्माण झालं असून डोंबिवली, बदलापूरसह इतर ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह रिमझिम पावसाच्या सरी बरसत आहेत. 


 






डोंबिवली, बदलापूरमध्ये जोरदार पाऊस 


डोंबिवली, बदलापुरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू आहे. पालघरमध्ये गारांचा पाऊस पडतोय. बदलापूर, कल्याण भागात वादळी वारे  धडकले. तर वांगणी, बदलापूरमध्ये वाऱ्यांचा वेग ताशी 107 किमी इतका आहे. 


मेट्रो खोळंबली


मुसळधार पाऊस, वादळी वारे यामुळे मुंबईकरांचा खोळंबा झाल्याचं दिसतंय. अचानक आलेल्या पावसामुळे अंधेरी घाटकोपर मेट्रो खोळंबली तर अनेक रस्त्यावर झाडं कोसळल्यामुळे ट्रॅफीक जॅम झाल्याचं दिसतंय. पावसाचा परिणाम आता लोकल सेवा विस्कळीत झाली आहे, तर दृष्यमानता घटल्यामुळे मुंबई विमानतळाचा रन वे बंद करण्यात आला आहे.


ओव्हरहेड खांब कोसळल्याने मध्य रेल्वे ठप्प


मुंबईसह उपनगरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अचानक झालेल्या पावसामुळे मेट्रो आणि लोकलसेवा ठप्प झाली. तर अनेक ठिकाणी ट्राफिक जाम झाल्याचं पहायला मिळालंय. ओव्हरहेड वायरवर बॅनर कोसळल्यामुळे वर्सोवा घाटकोपर मेट्रो सेवा ठप्प झाली होती. ती आता हळूहळू सुरळीत होतेय. तर मुलुंड ते ठाणे दरम्यान ओव्हरहेड खांब कोसळल्याने मध्य रेल्वे ठप्प झाली आहे. त्यामुळे अनेकांनी रस्त्याने प्रवास करण्याला पसंती दिली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी ट्राफिक जाम झालंय. वेस्टन एक्स्प्रेस हायवेवर ट्राफिक जाम झालंय.


घाटकोपरमध्ये होर्डिंगखाली अडकेल्या सात जखमींनी बाहेर काढलं


घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळला असून त्याखाली अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या ठिकाणी बचावकार्य सुरू झालं असून आतापर्यंत सात जखमींनी यातून बाहेर काढण्यात आलं आहे. या होर्डिंगखाली आतापर्यंत 80 वाहनं अडकल्याची माहिती आहे. 


वडाळ्यात पार्किंग स्ट्रक्चर खाली कोसळलं


मुंबईत झालेल्या वादळी पावसामुळे वडाळा पूर्व या ठिकाणी असलेल्या श्रीजी टॉवर्स इथे पार्किंग स्ट्रक्चर खाली कोसळल्याची घटना घडली. बरकत आली नाक्याजवळ रस्त्यावर  हे स्ट्रक्चर कोसळलं आहे. या ठिकाणी बचाव कार्य सुरू असून आतापर्यंत दोन ते तीन जणांना बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. 


ही बातमी वाचा: 



Centra Railway Unseasonal Rain : मुलुंड ते ठाणे दरम्यान ओव्हरलोड खांब कोसळला ; मध्य रेल्वे विस्कळीत