Ambarnath News : अंबरनाथमध्ये पोलीस उपनिरीक्षकाला बेदम मारहाण; दोघांना अटक
Ambarnath Crime News : पोलीस उपनिरीक्षक जगदीश गीते यांना मारहाण करणाऱ्या दोघांवरही अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणणे, शासकीय कर्मचाऱ्यांना मारहाण करणे, असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Ambarnath Crime News : रस्त्यात लावलेली गाडी बाजूला करायला सांगितली म्हणून पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण करण्यात आल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आसा आहे. मारहाण करणार्यांना पोलिसांनी बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात जगदीश गीते हे पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारी दुपारी अंबरनाथच्या कोहोजगाव दर्गा परिसरात त्यांची बंदोबस्तासाठी ड्युटी लागली होती. तेथील बंदोबस्त संपवून ते पुन्हा पोलीस ठाण्याकडे परतत असताना वांद्रापाडा परिसरात सुरेश उर्फ नटवर जाधव याने भररस्त्यात दुचाकी आडवी लावल्याचं गीते यांना दिसलं. त्यामुळे गीते यांनी जाधव याला दुचाकी बाजूला करण्यास सांगितले. परंतु, नटवर जाधव याने गीते यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की करत मारहाण केली. यावेळी श्रीकांत जाधव नावाचा नटवर याचा आणखी एक साथीदार सुद्धा पोलीस उपनिरीक्षक गीते यांच्या अंगावर धावून गेला.
बंदोबस्त संपवून आणखी काही पोलीस कर्मचारी परत येत होते. त्यांना गीते यांना मारहाण सुरू असल्याचे लक्षात आले. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत गीते यांची सुटका केली. यावेळी नटवर आणि श्रीकांत जाधव हे दोघेही तेथून पळून गेले. मात्र, काही वेळातच पोलिसांनी नटवर याला शोधून बेड्या ठोकल्या.
पोलीस उपनिरीक्षक गीते यांना मारहाण करणाऱ्या दोघांवरही अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणणे, शासकीय कर्मचाऱ्यांना मारहाण करणे, असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी नटवर याच्यावर यापूर्वीचे तब्बल दहा गुन्हे दाखल असून चार वेळा चॅप्टर केस, तर एकदा तडीपारीची कारवाई करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त जगदीश सातव यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या