Mumbai Entry Point Toll : आदित्य ठाकरेंच्या टोल बंद मागणीत मनसेची उडी; दोन नाहीतर पाचही एन्ट्री पॉईंट टोल बंद करा
Mumbai Entry Point Toll : मुंबईतील फक्त दोनच नव्हे तर पाचही टोलनाके बंद करण्याची मागणी मनसेने केली आहे.
Mumbai Entry Point Toll : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुंबईतील पश्चिम आणि पूर्व द्रुतगतीमार्गावरचे टोल बंद करण्याची मागणी केल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) उडी घेतली आहे. मुंबईतील फक्त दोनच नाही तर पाचही एन्ट्री पॉईंटवरील टोल माफ (Mumbai Entry Point Toll) करावे अशी मागणी मनसेचे प्रवक्ते संजय शिरोडकर यांनी केली आहे. या टोलनाक्यावरील वाहतूक कोंडीमुळे इंधन आणि वेळेचा अपव्यय होत असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईत प्रवेश करण्यासाठी अथवा बाहेर पडताना पाच एन्ट्री पॉईंट आहेत. या पाच एन्ट्री पॉईंटवर टोल माफी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मनसे प्रवक्ते संजय शिरोडकर यांनी म्हटले की, नितीन गडकरी हे 1995 मध्ये सत्तेवर आलेल्या युती सरकारच्या काळात आलेल्या सरकारमध्ये राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. त्यांच्या कार्यकाळात 55 उड्डाणपूले मुंबईत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. उड्डाणपूलांचा बांधकाम खर्च काढण्यासाठी मुंबईतील एन्ट्री पॉईंटवरून टोल वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही टोल वसुली 2002 मध्ये सुरू करण्यात आली. सध्या दहिसर आणि आनंद नगर येथील टोलनाके बंद करा अशी मागणी होत आहे.
6000 कोटींचा फटका
दोन नव्हे पाचही टोल नाके बंद करावे अशी मागणी मनसेने केली. जुलै 2015 मध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) पाहणी केली होती. त्यावेळी अहवाल तयार करण्यात आला होता. यावेळी अहवालात टोल नाक्यावरील वाहतूक कोंडीमुळे इंधन, वेळेचा अपव्यय, कामाच्या तासाचे होणारे नुकसान यामुळे साधारणपणे 6000 कोटींचे नुकसान होते. याचा फटका राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही बसत असल्याकडे संजय शिरोडकर यांनी म्हटले.
एमएसआरडीसीचा असा अहवाल असताना अजूनही टोल कसे सुरू आहेत, हे एक गौडबंगल असल्याचे त्यांनी म्हटले. गलथान कारभार आणि लोकांना किती मनस्ताप होतो, हे सगळ्यांना माहीत आहे. वर्षाला 6000 कोटींचे नुकसान करणारे टोल नाके बंद झाले पाहिजे. अशी मागणीदेखील शिरोडकर यांनी केली.
मुंबईतील कोणत्या एन्ट्री पॉईंटवर टोल
मुंबईत सायन-पनवेल महामार्ग, पश्चिम द्रुतगती महामार्ग, पूर्व द्रुतगती महामार्ग, एलबीएस मार्ग आणि ऐरोली उड्डाणपूल कॉरिडोअर या पाच एन्ट्री पॉईंटवर टोल वसूल केला जातो. या पाचही टोल नाक्यांवर वाहतूक कोंडी असते. वाहनांच्या रांगांमुळे वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागतो.
आदित्य ठाकरे यांनी काय म्हटले?
मुंबई पश्चिम - पूर्व द्रुतगतीमार्गावरचे टोल बंद करण्याची मागणी शिवसेना नेते युवा सेना अध्यक्ष आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray ) यांनी केली आहे. मुंबईतील रस्त्याची दुरुस्ती आणि देखभाल मुंबई पालिकेकडे, मग टोलचे पैसे एमएसआरडीसी (MSRDC) कडे का, असा सवाल शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. एमएमआरडीएने (MMRDA) मुंबई महानगरपालिकेला वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे (WEH) आणि इस्टर्न एक्स्प्रेस हायवे (EEH) मेंटन्सनसाठी दिले आहेत. मग तिथे टोल वसुली का केली जाते? हा टोल एमएसआरडीसी का घेत आहे? जर हे दोन महत्वाचे रस्ते बीएमसीकडे हस्तांतरित केले आहेत तर, मग टोलचे पैसे एमएसआरडीसीकडे का जात आहेत? असे विविध सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केले आहेत.