मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची आज (27 एप्रिल) संध्याकाळी बैठक होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे 9 एप्रिलप्रमाणे आजची बैठकही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून शिफारस करण्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सुधारित प्रस्ताव पाठवण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.


याशिवाय राज्यातील कोरोनाची परिस्थिती, राज्यासमोरील आर्थिक आव्हान, पंतप्रधान आणि सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची व्हिडीओ कॉन्फरन्स हे मुद्दे या बैठकीच्या केंद्रस्थानी असतील.


राजभवन फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये, संजय राऊतांचा राज्यपालांवर निशाणा


मात्र आज होणारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक महत्त्वाची का आहे हे जाणून घेऊया.


- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत राज्य सरकारने आधी पाठवलेल्या प्रस्तावाबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना जे आक्षेप आहेत ते दूर करुन मंत्रिमंडळ सुधारित प्रस्ताव पाठवणार आहे.
- 9 एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याच अध्यक्षतेखाली बैठक झाली होती.
- पण उपमुख्यमंत्रीपद हे घटनात्मक पद नाही, त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील ठराव वैध नसल्याचा आक्षेप होता.
- ही तांत्रिक चूक टाळण्यासाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्याबाबत मुख्यमंत्री अधिकृत पत्र देणार आहेत
- मुख्यमंत्र्याच्या अनुपस्थितीत कुणाच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक घ्यायची हे ठरवण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांनाच आहे.
- मुख्यमंत्र्यांनी तशा आशयाचं पत्र दिलं की मंत्रिमंडळ बैठक अधिकृत ठरते.
- त्यामुळे आजच्या अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार्‍या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्याबाबत मंजूर केल्या जाणार्‍या प्रस्तावाला आक्षेप घेता येणार नाही.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राज्यपाल कोट्यातून आमदारकी देण्याविरोधात हायकोर्टात याचिका


मुख्यमंत्र्यांची विधानपरिषदेसाठी शिफारस
विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांचा सदस्य नसलेल्या कोणत्याही मंत्र्याला पदाची शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यांच्या आत विधानसभा अथवा विधानपरिषद यापैकी एका सभागृहात निवडून येणं बंधनकारक आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 2 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्रीपदाची शपश घेतली. त्यामुळे त्यांची मुदत येत्या 27 मे रोजी संपुष्टात येणार आहे. एप्रिलमध्येच यंदाच्या विधानपरिषद निवडणुका पार पडणार होत्या. पण मार्चमध्ये राज्यात कोरोनाचे संकट आल्याने या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपालांनी विधानपरिषदेवर आमदार करावे, अशी शिफारस काही दिवसांपूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्यावतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना करण्यात आली. परंतु त्यावर राज्यपालांनी अद्याप स्वाक्षरी केलेली नाही. त्यामुळे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राजभवन फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये, असं म्हणत राज्यपालांवर निशाणा साधला होता.


Sanjay Raut Twit On Governor | राजभवन फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये, खासदार संजय राऊतांचं ट्वीट