मुंबई : कोरोनाच्या सावटाखाली राज्यातील विधानपरिषद निवडणूक लांबणीवर पडल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रिपद धोक्यात आलं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपाल कोट्यातून उद्धव ठाकरे यांची विधानपरिषद सदस्य म्हणून नियुक्ती करावी, असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. मात्र हा निर्णय बेकायदेशीर असल्याचा दावा करत त्याला स्थगिती देण्यात यावी अशी, मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. मात्र या प्रकरणात सध्या हस्तक्षेप करण्यास नकार देत उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना तूर्तास कोणताही दिलासा देण्यास नकार दिला.


विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांचा सदस्य नसलेल्या कोणत्याही मंत्र्याला पदाची शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यांच्या आत विधानसभा अथवा विधानपरिषद यापैकी एका सभागृहात निवडून येणं बंधनकारक आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 2 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्रीपदाची शपश घेतली आहे. त्यामुळे त्यांची मुदत येत्या 27 मे रोजी संपुष्टात येणार आहे. एप्रिलमध्येच यंदाच्या विधानपरिषद निवडणुका पार पडणार होत्या. पण मार्चमध्ये राज्यात कोरोनाचे संकट आल्यानं या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपालांनी आमदार करावे, अशी शिफारस काही दिवसांपूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्यावतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना करण्यात आली आहे.


राजभवन फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये, संजय राऊतांचा राज्यपालांवर निशाणा


याविरोधात पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि भाजपाचे पदाधिकारी रामकृष्ण पिल्ले यांनी अॅड. अतुल दामले आणि अॅड. विजय किल्लेदार यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती शाहरुख काथावाला यांच्यासमोर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी पार पडली. तेव्हा, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीचे अध्यक्षपद हे मुख्यमंत्री बजावतात. मात्र, 9 एप्रिल रोजी पार पडलेल्या बैठकीत मुख्यमंत्री गैरहजर होते आणि त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बैठक घेण्याचे अध्यक्षपदाचे अधिकार सोपावले नव्हते. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या ही बैठकच बेकायदेशीर असल्याचा दावा याचिकाकर्त्यांकडून करण्यात आला आहे.


अशा अड्ड्यावर कोणी पत्ते पिसत असेल तर पिसावेत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच : संजय राऊत


त्यावर उत्तर देताना ही याचिका अर्थहीन असल्याचे राज्याचे महाधिवक्ता आशितोष कुंभकोणी यांनी राज्य सरकारची बाजू मांडताना सांगितले. दोन्ही बाजू ऐकून घेत राज्य मंत्रिमंडळाच्या या बैठकीवर राज्यपालांनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. राज्यपालांना त्याबाबत स्वतंत्र निर्णय घ्यायचा असल्यामुळे न्यायालयाला यामध्ये हस्तक्षेप करता येणार नाही, असं स्पष्ट करत उच्च न्यायालयाने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील या निर्णयावर स्थगिती देण्यास नकार देत याचिकाकर्त्यांना कोणताही दिलासा देण्यास नकार दिला.


Maharashtra Politics | ...अशा अड्ड्यावर कितीही पत्ते पिसा, मुख्यमंत्री ठाकरेच : संजय राऊत