मुंबई : संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात अडकलं आहे. कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अशातच देशाला कोरोनाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. काहींनी पैशांच्या स्वरूपात तर काहींनी वस्तू स्वरूपातील मदत जाहीर केली आहे. अशातच राज्यातील कोरोना फायटर्स म्हणजेच, वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या पीपीई किट्सचा राज्यात तुटवडा आहे. हिच गरज लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी 1000 पीपीई किट्स, तसेच मास्कची मदत 'मार्ड' या डॉक्टरांच्या संघटनेला केली आहे. त्यानंतर मार्डच्या वतीने अमित ठाकरे यांचे आभारही मानले आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्वीट करत अमित ठाकरे यांनी केलेल्या मदतीबाबत माहिती दिली आहे. राज ठाकरे ट्वीटमध्ये म्हणाले की, 'अमितने महाराष्ट्रातील डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी 1000 पीपीई किट्स आणि मास्क्स डॉक्टरांच्या 'मार्ड' संघटनेकडे सुपूर्द केले त्याबद्दल मार्डने अमितचे आभार मानले.पण हे डॉक्टर्स जसं जीवावर उदार होऊन महाराष्ट्राची सेवा करत आहेत त्याबद्दल माझं कुटुंबच ह्या डॉक्टरांचे आभार मानू इच्छितो.'
सध्या महाराष्ट्रासह देशात पीपीई किट्सचा तुटवडा असल्याचं वारंवार समोर येत आहे. तसेच कोरोनापासून बचावासाठी पीपीई किट्ससोबत आवश्यक असणाऱ्या मास्कचादेखील तुटवडा आहे. अशातच विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर व्यक्तींनी कोरोना विरोधात लढा देणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पीपीई किट्स आणि मास्कचा पुरवठा करत मदत केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांच्यासह अभिनेत्री विद्या बालन हिनेदेखील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पीपीई किट्स पुरवले आहेत. तर बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने भारतात कोविड-19शी लढा देणाऱ्या हेल्थ वर्कर्सना 10,000 जोडी पादत्राणं देणार असल्याचं जाहीर केलं आहे.
पाहा व्हिडीओ : दारुची दुकानं, हॉटेल्स किचन सेवा सुरु करा, राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
दरम्यान, राज्यात लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर बंद करण्यात आलेली दारुची दुकानं सुरू करण्याची मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राज्यामध्ये महसुलाचा ओघ सुरू करण्याच्या दृष्टीने राज्यातील वाईन शॉप्स सुरू करायला काय हरकत आहे? असा सवाल केला होता. तसेच केंद्राची मदत येईल तेव्हा येईल पण त्या मदतीची वाट न पाहता आपणच आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याचे मार्ग शोधण्याची गरज आहे, असंही राज ठाकरे यांनी पत्रामध्ये म्हटलं आहे.
संबंधित बातम्या :
दारुची दुकानं, हॉटेल्स किचन सेवा सुरु करा, राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
कोरोनाशी झुंजताना मृत्यूमुखी पडलेल्या पोलिसांच्या कुटुंबांना 50 लाख अन् सरकारी नोकरी : गृहमंत्री
ऑफिसमध्ये जेवण पोहचवणाऱ्या मुंबईच्या डब्बेवाल्यांवर उपासमारीची वेळ; आर्थिक मदतीची मागणी