मुंबई : 'मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय लाठीचार्ज होऊच शकत नाही', अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी दिली आहे. जालन्यामध्ये (Jalna) मराठा आंदोलकांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जमुळे संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. तर यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी देखील या घटनेवर भाष्य केलं आहे. यावर बोलताना त्यांनी म्हटलं आहे की, "जो लाठीचार्ज झाला आहे तो अत्यंत भयानक आहे. असं कोणी शत्रूसोबत देखील वागत नाही." तर यावेळी आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री आणि सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. 


सरकारला राजीनामा देण्याची गरज : आदित्य ठाकरे 


आदित्य ठाकरे यांनी तीव्र शब्दांत सरकारचा निषेध केला आहे. आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे की, "मी दोन ते अडीच वर्ष मुख्यमंत्र्यांचं कार्यलय जवळून पाहिलं आहे. इतकी संवदेनशील घटना घडते आणि त्याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना कल्पना नाही असं होऊ शकत नाही. त्यांना माहिती नसल्याशिवाय पोलीस लाठीचार्ज करणार नाही. त्यामुळे या खोके सरकारला राजीनामा देण्याची गरज आहे. सरकारला थोडी जरी लाज उरली असेल तर सरकार राजीनामा देईल." 


हे महाराष्ट्राचं दुर्दैव : आदित्य ठाकरे


आदित्य ठाकरे यांनी यावेळी बोलताना बारसू आणि खारघरच्या घटनेचा देखील उल्लेख केला आहे. यावर बोलताना आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे की, "बारसूमध्येही महिलांवर असाच लाठीचार्ज करण्यात आला. खारघरच्या घटनेची फक्त चौकशी करण्यात आली. आता जालन्यामध्ये मराठा समाजाच्या तरुणांवर लाठीचार्ज करण्यात आला आहे आणि हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे." शांततेत सर्व सुरु होतं मग एवढा लाठीचार्ज करण्याची गरज होती का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. 


हे सरकार नक्की कोणाचं?


हे सरकार नक्की महाराष्ट्राचंच आहे? हाच प्रश्न सध्या पडतोय, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, "ही लोकं महाराष्ट्राशी गद्दारी करत आहेत. त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. लाठीकाठी घेऊन शासन आपल्या दारी करायची गरज काय."  शासन नक्की काम कोणासाठी करतंय? असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी उपस्थित केलाय. 


"शेतकऱ्यांना कोणतीही मदत नाही"


"शेतकऱ्यांना सध्या मदतीची गरज आहे. पण आम्ही सरकारकडून अपेक्षा सोडल्या आहेत. प्रशासनानं त्यांचं काम केलं असेल, पंचानामे केले असतील. पण शेतकऱ्यांना सरकारकडून कोणतीही मदत झाली नाही. तसंही आता शेतकऱ्यांनाही सरकारकडून कोणतीही अपेक्षा राहिली नाही", असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Bhandara News : फडणवीसांवर कारवाई करण्याची दादांमध्ये हिंमत आहे? नाना पटोलेंचा अजित पवारांना सवाल