नवी मुंबई: नवी मुंबईत (Navi Mumbai) बेकायदेशीरपणे राहणाऱ्या आणि अंमली पदार्थांचे जाळे शहरात पसरू पाहणाऱ्या विदेशी आफ्रिकन नागरिकांवर नवी मुंबई पोलिसांनी सर्जिकल स्ट्राईक केला आहे. नवी मुंबईतील सहा ठिकाणी टाकलेल्या छाप्यात 14 आफ्रिकन नागरिकांकडून 5 कोटींचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
तरुणांना ड्रग्जच्या जाळ्यात ओढण्याचा आफ्रिकन नागरिकांचा प्रयत्न
नवी मुंबई परिसराला टार्गेट करत तेथे अंमली पदार्थांचं जाळं गेल्या काही वर्षांपासून पसरवलं जात होतं, यामध्ये मुख्यत्वे आफ्रिकन नागरिकांचा सहभाग असल्याचं अनेक वेळा दिसून आलं होतं. शांत शहर म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबईत अनेक मोठ्या शाळा, कॅालेज, उच्च शिक्षणाच्या संस्था कार्यरत आहेत. दुसरीकडे नवी मुंबईत आयटी हब देखील विस्तारत आहे. पुण्यानंतर नवी मुंबईला एज्यूकेशन हब आणि आयटी हब म्हणून पाहिलं जात असल्याने येथील तरूणांना ड्रग्जच्या जाळ्यात ओढण्यासाठी अफ्रिकन नागरिक कार्यरत होते.
पाच कोटींचे अंमली पदार्थ जप्त
ड्रग्जच्या जाळ्यातून नवी मुंबईला वाचवण्यासाठी पोलीस आयुक्त मिलींद भारांबे यांनी विशेष मोहीम हाती घेत ड्रग्जचा धंदा करणाऱ्यांवर सर्जिकल स्ट्राईक केला. सहा ठिकाणी टाकलेल्या छाप्यांत 75 आफ्रिकन नागरिकांना ताब्यात घेण्यात आलं होतं, यातील 14 जणांकडे ड्रग्ज सापडले आहेत. या मध्ये 898 ग्रॅम कोकेन, 300 ग्रॅमपेक्षा जास्त एमडी, ट्रायमॅाल हायड्रोक्लोराईडच्या 36 हजार 640 ट्रप्स असे 5 कोटींचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
आफ्रिकन नागरिकांना केलं भारतातून हद्दपार
ड्रग्ज विक्री करण्यासाठी वापरण्यात आलेले मोबाईल आणि वाहनंही पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या 9 जणांवर पासपोर्ट अॅक्टनुसार कारवाई करण्यात आली आहे, तर 31 जणांना लिव्ह इंडिया नोटीस देवून भारतातून हद्दपार करण्यात येणार आहे. सदर कारवाईसाठी अधिकारी, कर्मचारी मिळून 600 जणांचा स्टाफ वापरण्यात आला होता.
मुंबई पाठोपाठ पुण्यालाही केलं टार्गेट
पुणे शहराची वाटचाल स्मार्ट सिटीकडे होत आहे. शिक्षण, नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने परराज्यासह विदेशातील तरुण-तरुणी मोठ्या संख्येने पुण्यात वास्तव्यास आहेत. शहराच्या भोवती निर्माण झालेलं आयटी क्षेत्राचं वलय, गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या, त्यातूनच उदयास आलेली संस्कृती यामुळे मुंबईपाठोपाठ अंमली पदार्थ तस्करांचं पुणे हे लक्ष्य आहे. मात्र असं असतानाच अंमली पदार्थ तस्कारांना पुणे पोलीस कारवाईने चोख उत्तर देत आहेत.
2019 ते 2021 या तीन वर्षांत पुणे पोलिसांनी 8 कोटींचे अंमली पदार्थ जप्त केले होते. मागील दहा वर्षांच्या तुलनेत पाच महिन्यांत सर्वाधिक म्हणजे 7 कोटी 24 लाखांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. साडेपाच वर्षांत 22 कोटी 17 लाखांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. गोवा, मुंबई येथून कोकेन, ब्राऊन शुगरसारखे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. या सर्व प्रकारांत नायजेरियन गुन्हेगार आघाडीवर आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :