मुंबई : 'ज्या गोष्टीं तुमच्या मनात असतात त्या गोष्टी पूर्णत्वाला जातातच', असं गायक सुखविंदर सिंग (Sukhwinder Singh) यांनी 'माझा कट्ट्या'वर (Majha Katta) त्यांचा सुरेल प्रवास उलगडताना म्हटलं. मुळात पंजाबी असलेल्या सुखविंदर यांनी वयाच्या पाचव्या वर्षी त्यांच्या गायनाच्या प्रवासाला सुरुवात केली. तर यावेळी सुखविंदर सिंग यांनी त्यांनी लतादीदींसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. सुखविंदर यांनी त्यांच्या लहानपणीच्या अनेक आठवणी यावेळी माझा कट्ट्यावर सांगितल्या. तर पंजाबी आणि मराठी सोडून इतर भाषांमध्ये अगदी सहज रित्या सुखविंदर गाणी गातात. तर त्यांनी यावेळी ए.आर रेहमान यांच्यासोबतच्या देखील आठवणी सांगितल्या. 


कसा होता छय्या छय्याचा प्रवास?


छय्या छय्या हे गाणं आजही तितकचं प्रसिद्ध आहे. त्या गाण्यामुळे सुखविंदर यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, '1998 मध्ये माझी आणि रेहमान यांची मुलाखत झाली. तेव्हाच मी त्यांना छय्या छय्या हे गाणं ऐकवलं होतं. पण मी त्यांना पंजाबीमध्ये ते गाणं ऐकवलं. ते रेहमान यांना ते खूप आवडलं आणि छय्या छय्याचा जन्म झाला. त्यानंतर मी रेहमान यांच्यासाठी 57 गाणं गायली. '


'तुम्हाला आयुष्यात आनंद हवाय की सुख हवयं हे तुम्हाला ठरवावं लागेल. सुखविंदर सिंग यांना लोकांपर्यंत पोहचण्यसाठी बराच संघर्ष करावा लागला होता. पण संगीताने त्यांना त्यांचा प्रत्येक संघर्षावर मात करण्यास मदत केली. कारण संगीतामध्ये आईची माया असते, जी तुम्हाला लढण्यासाठी बळ देते,' असं सुखविंदर सिंग यांनी माझा कट्ट्यावर म्हटलं. 


'आणि "जय हो" हे गाणं जगभर गाजलं...'


जय हो गाण्याला जेव्हा ऑस्कर मिळालं तेव्हाच्या भावना देखील त्यांनी यावेळी सांगितल्या. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, 'मला हे गाणं खूप चांगलं व्हावं हीच अपेक्षा होती. या गाण्याच्या रेकॉर्डिंगवेळी फक्त मी आणि गुलजारजी त्यावेळी उपस्थित होतो. पण सुरुवातीला रेहमान यांना हे गाणं पटलं नव्हतं. त्यामुळे त्यांनी हे गाणं नाकारलं होतं. तेव्हा गुलजार यांना खूप दु:ख झालं. पण मी तेव्हा मी ते गाणं रेकॉर्ड केलं आणि गुलजार यांना सांगितलं की तुम्ही हे तुमच्या घरी जाऊन ऐका. त्यानंतर दोन दिवसांनी रेहमान यांचा मला फोन आला आणि गाण्याला होकार दिला. पण मला हा विश्वास होता की, हे गाणं चांगलं होणार आणि तो विश्वास सार्थकी ठरला.' 


सुखविंदर यांनी त्यांच्या अनेक किस्से आठवणी यावेळी माझा कट्ट्यावर सांगितल्या आणि दिलखुलास संवाद देखील साधला. तर अनेक गाणी त्यांनी कट्ट्यावर गायली देखील. 


हेही वाचा : 


Majha Katta : 'मला जन्म माझ्या आईवडिलांनी दिला पण जितेंद्रला जन्म व्ही.शांतारामांनी दिला', 'माझा कट्ट्या'वर जितेंद्र यांनी दिला आठवणींना उजाळा