मुंबई : मुंबईत (Mumbai) अनेक सण सर्वधर्मसमभाव या भावनेतून एकत्रितपणे साजरे केले जातात. पण अनेकदा सर्व समाजाचे सण-उत्सव हे एकाच वेळेस येतात. त्यावेळी काही गालबोल लागणाऱ्या घटना अनेकदा घडल्या आहेत. यंदा गणेशोत्सव (Ganeshostav) आणि ईद-ए-मिलाद (Eid-E-Milad) हे सण एकत्रच 28 सप्टेंबरला आले आहेत. यामुळे पोलीस प्रशासनावर बराच ताण येण्याची शक्यता वर्तवली जात होती. हाच ताण कमी करण्यासाठी मुस्लिम बांधवांकडून ईद- ए- मिलाद च्या दिवशी काढण्यात येणारा जुलूस किंवा मिरवणूक ही सप्टेंबर 29 म्हणजे एक दिवस नंतर काढण्यात येणार आहे.


मुंबईतील गणेशोत्सव हा जगविख्यात आहे. त्यामुळे अनंतचतुर्दशीच्या दिवशी मुंबईनगरी अगदी गजबजून गेल्याचं पाहायला मिळतं. पण यंदाच्या वर्षी ईद-ए-मिलाद देखील त्याच दिवशी आली आहे. त्यामुळे त्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस प्रशासनावर बराच ताण आला असता. काही दिवसांपूर्वी  भायखळा येथील खिलाफत हाऊस येथे अनेक मुस्लिम प्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 


ज्येष्ठ मौलवी मौलाना मोईन अश्रफ कादरी (मोईन मियाँ) यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली. ईद-ए-मिलाद 28 सप्टेंबरला असली तरीही शांतता आणि सुव्यवस्थेच्या हितासाठी जुलूस किंवा मिरवणूक हि एक दिवस पुढे ढकलल्यास कोणतीही अडचण येणार नाही, असा निर्णय घेण्यात आला.या बैठकीला माजी मंत्री आणि काँग्रेस नेते आरिफ नसीम खान, समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नसीम सिद्दीकी उपस्थित होते.


बैठकीत काय घडलं?


गणेशोत्सव हा सण मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यामुळे अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर मुंबई नगरी गजबजून गेलेली असते. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी विसर्जनाला मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याचं पाहायला मिळतं. त्याचबरोबर ईद-ए-मिलाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात मुस्लिम भाविक सुद्धा रस्त्यावर उतरून मिरवणुका काढतात. त्यामुळे यावेळी देखील मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याच चित्र असतं. हाच मुद्दा या बैठकीमध्ये मांडण्यात आला. पण यावर उपाय म्हणून काहीतरी मार्ग काढणं हे जास्त गरजेचं होतं. त्यामुळे ईदचा जुलूस हा अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी काढण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला 90 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांनी समंती दिली. त्यामुळे पोलिसांना विश्वासात घेऊन ईदची मिरवणूक एक दिवस पुढे ढकललण्यात आली. 


मुबंई पोलिसांनी मानले आभार


मुस्लिम बांधवांकडून घेण्यात आलेल्या या निर्णयाचं पोलिसांनी देखील कौतुक केलं आहे.  मुंबई पोलिसांना या दोन्ही दिवशी पोलीस बंदोबस्त तैनात करायचा आहे.शिवाय शहराच्या सुरक्षेची काळजी घेणाऱ्या मुंबई पोलिसांवरचा ताणही यामुळे थोडा कमी झालाय. तर मुस्लिम बांधवांनी घेतलेल्या या निर्णयाचं देखील कौतुक केलं जात असल्याचं सांगण्यात येत आहे. 


याआधी नाशिक, धाराशिव, मालेगाव यांसारख्या शहरांमध्ये मुस्लिम बांधवांकडून हा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे यंदा हे दोन्ही सण अगदी उत्साहात पार पडणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. 


हेही वाचा : 


Nashik News : नाशिकमध्ये यंदा गणपती विसर्जन गुरुवारी तर ईद ए मिलादचा जुलूस शुक्रवारी, नाशिक पोलिसांचा निर्णय