NSE Scam Sanjay Pandey : एनएसई घोटाळ्यातील सहभागाप्रकरणी अटकेत असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना सूडबुद्धीने अटक करण्यात आली असल्याचा आरोप आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रीती शर्मा मेनन यांनी केला आहे. संजय पांडे हे प्रामाणिक पोलीस अधिकारी असून त्यांनी भाजपच्या चार नेत्यांवर गुन्हे दाखल केले म्हणून अटक करण्यात आली असल्याचे प्रीती मेनन यांनी म्हटले. 


माजी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांना एनएसई घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आली आहे. संजय पांडे यांच्या मालकीच्या सॉफ्टवेअर कंपनीने बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग करून आरोपींना मदत केली असल्याचा ठपका त्यांच्याविरोधात आहे. या प्रकरणाची सीबीआय आणि ईडीकडून चौकशी सुरू आहे. ईडीने केलेल्या चौकशीनंतर संजय पांडे यांना अटक करण्यात आली. आज मुंबईत आम आदमी पक्षाच्यावतीने (आप) पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी 'आप'च्या नेत्या प्रीती शर्मा मेनन यांनी सांगितले की, संजय पांडे यांना ईडीने अटक केलेली आहे. फोन टॅपिंग प्रकरणामध्ये त्यांना अटक केली असल्याचे सांगितलं जातं आहे. मात्र हे आरोप खोटे असून चुकीची कारवाई करण्यात आली आहे.  आयपीएस पांडे यांनी फोन टॅप केले असं मुद्दाम सांगितलं जातं असल्याचा दावा मेनन यांनी केला. 


आयपीएस अधिकारी परमबीर सिंह, देवेन भारती, रश्मी शुक्ला यांच्या बाबतीतही आरोप झाले होते. पण या अधिकाऱ्यांपेक्षा संजय पांडे हे वेगळे अधिकारी असून ते प्रामाणिक असल्याचे प्रीती शर्मा मेनन यांनी सांगितले. संजय पांडे यांनी आयपीएसचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी टीसीएसमध्ये नोकरी सुरू केली होती. पोलीस दलाच्या सेवेतून त्यांनी 'आयसेक सर्व्हिस' ही कंपनी सुरू केली होती.  यासाठी सेबीनेही त्यांना परवानगी दिली होती. त्यानंतर संजय पांडे हे 2012 मध्ये पुन्हा पोलीस दलात रुजू झाले. त्याआधीच्या कालावधीत वर्ष 2009 मध्ये राष्ट्रीय शेअर बाजाराने (NSE) संजय पांडे यांच्या कंपनीला, आयसेक सर्व्हिसला काही रेकोर्ड असलेले कॉल दिले आणि ऑडिट करून देण्यास सांगितले. आयसेक सर्व्हिसने कॉल रेकॉर्ड केले नाहीत. तर रेकॉर्ड केलेले कॉल्स एनएसईने आयसेक सर्व्हिसला दिले होते. हे सगळे प्रकरण घडले तेव्हा संजय पांडे हे कोणत्याही पदावर नव्हते अथवा आयसेक सर्व्हिसमध्येही सक्रिय नव्हते असा दावाही प्रीती शर्मा मेनन यांनी केला. 


संजय पांडे यांच्यावर कारवाई का?


संजय पांडे हे प्रामाणिक पोलीस अधिकारी असल्याचे प्रीती शर्मा मेनन यांनी सांगितले. संजय पांडे हे मुंबई पोलीस दलाचे आयुक्त असताना भाजपच्या चार नेत्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. संजय पांडे यांनी भाजपचे माजी खासदार, किरीट सोमय्या, विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर, मोहित कंबोज आणि आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर कारवाई केली. भाजप नेते मोहित कंबोज यांनी संजय पांडे यांना तुरुंगात धाडणार असल्याचे आव्हान दिले होते. त्यानुसार त्यांना या प्रकरणात अडकण्यात आले असल्याचा दावा प्रीती मेनन यांनी केला. 



संजय पांडे यांचा एनएसई घोटाळ्याशी संबंध काय?


संजय पांडे यांच्या विरोधात सीबीआयने तीन गुन्हे दाखल केले तर ईडीने सुद्धा 2 गुन्हे दाखल केले आहेत. एनएसई घोटाळ्यात फोन टॅपिंगसाठी वापरण्यात आलेले फोन टॅपिंग मशिन हे संजय पांडे  यांच्या आयटी कंपनीने इस्राएलमधून मागवले असल्याचा आरोप आहे.  या मशिनच्या माध्यमातून एनएसईचे अधिकारी कर्मचाऱ्यांचे फोन टॅंपिंग करत होते. फोन टॅपिंगच्या माध्यमातून इत्यंभूत गोपनीय माहिती ही या प्रकरणातील मुख्य आरोपी माजी NSE प्रमुख चित्रा रामकृष्णन यांना दिली जात असे. यासाठी कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाला असल्याचे महत्त्वाचे पुरावे सीबीआय आणि ईडीला मिळाले आहेत. NSE कर्मचाऱ्यांचे फोन टॅप करण्याच्या बदल्यात संजय पांडे यांच्या कंपनीला 4 कोटी 45 लाख मिळाल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे. विशेष म्हणजे फोन टॅपिंगसाठी NSE कर्मचाऱ्यांची परवानगी घेण्यात आली नव्हती अशीही माहिती समोर आली आहे.