NSE Scam And Sanjay Pandey : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांच्या घरावर आणि कार्यालयावर सीबीआयकडून आज छापेमारी करण्यात आली. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे हे अचानक केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर का आले, त्यांचा आणि एनएसई घोटाळ्याचा संबंध काय, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. 


एनएसई घोटाळाप्रकरणी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानंतर सीबीआय चौकशी सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वीच संजय पांडे यांची ईडीने चौकशी केली होती. त्यानंतर सीबीआयने संजय पांडे यांच्या मुंबई आणि चंदीगडमधल्या घरी छापेमारी केली. मुंबईत जवळपास नऊ ठिकाणी ही छापेमारी सुरु आहे. एनएसई घोटाळ्यातील आरोपी चित्रा रामकृष्णन यांनी संजय पांडे यांना एनएसईशी संबंधित लोकांचे फोन रेकॉर्ड करण्यात सांगितलं असा आरोप होत आहे. एनएसई घोटाळा प्रकरणी एनएसईच्या माजी कार्यकारी संचालिका चित्रा रामकृष्ण, रवी नारायण व इतर सात जणांना आरोपी करत गुन्हा दाखल केले आहेत. 


संजय पांडे यांचा या प्रकरणाशी संबंध काय?


एनएसई घोटाळ्यामध्ये संजय पांडे यांचे नाव आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. सीबीआयच्या दाव्यानुसार, एनएसईमध्ये 2010 ते 2015 या कालावधीत अनियमितता आढळून आली होती. एनएसईची सुरक्षा ऑडिट आणि लीगल कन्सल्टन्सीसाठी एका आयटी कंपनीला काम देण्यात आले होते. ही कंपनी संजय पांडे यांच्या पत्नीच्या मालकीची आहे. संजय पांडे यांनी याआधी भारतीय पोलीस सेवेतून राजीनामा दिला होता. त्या दरम्यानच्या काळात त्यांनी ही कंपनी सुरू केली होती. त्यांचा राजीनामा मंजूर न झाल्याने संजय पांडे हे पुन्हा भारतीय पोलीस सेवेत दाखल झाले. त्यानंतर या कंपनीची सूत्रे पांडे यांच्या कुटुंबीयांकडे होती. याच कंपनीद्वारे चित्रा रामकृष्ण यांच्या सांगण्यावरून एनएसईमधील मोठ्या अधिकाऱ्यांचे फोन टॅपिंग केल्याची माहिती तपासात समोर आली. 


संजय पांडे तपास यंत्रणांच्या रडारवर का?


संजय पांडे यांच्या विरोधात सीबीआयने तीन गुन्हे दाखल केले तर ईडीने सुद्धा 2 गुन्हे दाखल केले आहेत. एनएसई घोटाळ्यात फोन टॅपिंगसाठी वापरण्यात आलेले फोन टॅपिंग मशिन हे संजय पांडे  यांच्या आयटी कंपनीने इस्राएलमधून मागवले असल्याचा आरोप आहे.  या मशिनच्या माध्यमातून एनएसईचे अधिकारी कर्मचाऱ्यांचे फोन टॅंपिंग करत होते. फोन टॅपिंगच्या माध्यमातून इत्यंभूत गोपनीय माहिती ही या प्रकरणातील मुख्य आरोपी माजी NSE प्रमुख चित्रा रामकृष्णन यांना दिली जात असे. यासाठी कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाला असल्याचे महत्त्वाचे पुरावे सीबीआय आणि ईडीला मिळाले आहेत. NSE कर्मचाऱ्यांचे फोन टॅप करण्याच्या बदल्यात संजय पांडे यांच्या कंपनीला 4 कोटी 45 लाख मिळाल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे. विशेष म्हणजे फोन टॅपिंगसाठी NSE कर्मचाऱ्यांची परवानगी घेण्यात आली नव्हती अशीही माहिती समोर आली आहे.


मुंबई पोलीस आयुक्त पदावरून निवृत्त झाल्यानंतर संजय पांडे यांना ईडी चौकशी आणि सीबीआयच्या छापेमारीला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे आगामी काळात संजय पांडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.