Traffic Updates : यंदा आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे राष्ट्रीय महामार्गासह मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर मोठी वाहतूक कोंडी (Traffic Jam on Mumbai Expressway) दिसून आली.  शनिवार, रविवारनंतर सोमवार आणि मंगळवारीदेखील सुट्टी जोडून (Holidays) आल्याने अनेकांनी पर्यटनस्थळी, गावाकडे जाण्यास पसंती दिली आहे. आज सकाळपासून मुंबई बाहेर जाणाऱ्या मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या. सकाळी वाशी टोल नाक्यावर मोठी वाहतूक कोंडी दिसून आली.


मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर वाहतूक कोंडी


सकाळी खालापूर टोलनजीक सुमारे दोन ते अडीच किलोमीटर वाहनांची रांग दिसून आली. त्याशिवाय. वाशी टोल नाक्यावर ही मुंबई बाहेर जाण्यासाठी वाहनांच्या रांगा दिसून आल्या. पावसाळी वातावरण आणि सलग चार दिवस सुट्ट्या आल्याने लोणावळा, पुणे, साताऱ्यातील पर्यटनस्थळावर जाण्यासाठी अनेकांनी पसंती दिली. त्यामुळे सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास लोणावळा घाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी दिसून आली.


पुण्याला जाणाऱ्या मार्गिकेवर वाहतूक कोंडी झाल्याने पोलिसांनी लोणावळा बोगद्यातून मुंबईला जाणाऱ्या मार्गिकेवरून काही वेळेसाठी वाहतूक वळवली. काही वेळेसाठी मुंबईला जाणारी वाहने थांबवण्यात येत असल्याने या मार्गिकेवरही वाहतूक कोंडी दिसून येत आहे. लोणावळ्या जवळ वाहतूक धीम्यागतीने सुरू आहे. 


मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी 


सलग सुट्ट्यांमुळे मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग़ावर  वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. सलग चार दिवस सुट्ट्यांमुळे पालघर, वसई-विरार, मुंबई ठाणे येथून पर्यटनासाठी लोक मोठ्या संख्येने बाहेर पडले आहेत, याचा थेट परिणाम महामार्गावरील वाहतुकीवर झाल्याचे दिसून आले. 


वसईहून ठाणे मुंबईकडे जाणारी वाहतूक, मुंबईहून गुजरात, ठाणेकडे जाणाऱ्या मार्गिकेवर सुमारे दोन ते अडीच किलोमिटर लांब वाहानांची रांग लागल्याचे चित्र सकाळी दिसून आले.
 
शनिवार-रविवारची सुट्टी आणि त्यानंतर स्वातंत्र्यदिन आणि पारशी नवीन वर्ष अशा चार सुट्ट्या लागून आल्याने मोठ्या संख्येने लोक घराबाहेर पडले आहेत. त्यामुळे पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.