Mumbai Accident : कफ परेड परिसरात बेदरकार चालकाने चौघांना उडवलं, पोलिसाचा मृत्यू
बेदरकारपणे गाडी चालवून चौघांना उडवणाऱ्या आणि एका पोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरलेल्या 28 वर्षीय चालकाला मुंबईतील कफ परेड पोलिसांनी अटक केली आहे.
मुंबई : बेदरकारपणे गाडी चालवून एका पोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरलेल्या 28 वर्षीय चालकाला मुंबईतील कफ परेड पोलिसांनी अटक केली आहे. या चालकाने आणखी तीन जणांना उडवलं असून यामध्ये दोन बँक अधिकारी आणि एका पादचाऱ्याचा समावेश आहे. या अपघातात जखमी झालेल्यांमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे असिस्टंट जनरल मॅनेजर (एजीएम) नितेश कुमार मंडल (वय 43 वर्षे) आणि एसबीआय कॅपिटलचे सहाय्यक उपाध्यक्ष सुजय कुमार विश्वास (वय 35 वर्षे) यांचा समावेश आहे.
दक्षिण मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या बाहेर मंगळवारी (12 एप्रिल) दुपारी दोनच्या सुमारास हा अपघात झाला. 28 वर्षीय तरुणाने बेदरकारपणे गाडी चालवत तीन ते चार जणांना उडवलं. मुकेश प्रदीप सिंह असं आरोपी चालकाचं नाव असून त्याला कफ परेड पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर निष्काळजीपणा आणि बेदरकारपणे वाहन चालवल्यामुळे मृत्यू झाल्याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी 1.50 च्या सुमारास ही घटना घडली. मुकेश प्रदीप सिंहने त्याच्या मालकाला मॉरिस गॅरेज (MG) इलेक्ट्रिक SUV मधील नरिमन पॉईंटच्या मेकर चेंबरमध्ये सोडलं आणि त्याच्या मालकाला न कळवता नातेवाईकांना भेटण्यासाठी जात होता. जुहूमधील रहिवासी असलेल्या मुकेश सिंह सोमवारी रात्री दारु प्यायला होता आणि घटनेच्या वेळी तो मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता, असा प्राथमिक अंदाज आहे.
"कफ परेड भागातील वर्ल्ड ट्रेड सेंटरजवळून जात असताना, गेट क्रमांक 4 आणि 6 नजिक पोहोचल्यावर मुकेश सिंहचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि गाडी थेट जेवणाच्या सुट्टीच्या वेळी बाहेर पडलेल्या लोकांवर जाऊन धडकली. सुरुवातीला मुकेश सिंहने बँक अधिकारी आणि एक पादचारी आसिफ शेख आणि नंतर थांबलेल्या टॅक्सीला धडक दिली. या धडकेमुळे, टॅक्सी पुढे सरकली आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात लिपिक असणारे प्रसेनजीत गौतम धाडसे (वय 36 वर्षे) यांच्यावर जाऊन आदळली आणि ते एका सिमेंट ब्लॉकवर आदळले," अशी माहिती कफ परेड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदेश रेवले यांनी दिली.
महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (MAT) न्यायालयात सुनावणीसाठी आलेले धाडसे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात जखमी झालेल्या इतरांना तातडीने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर मृत पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी जेजे रुग्णालयात पाठवण्यात आला.
घटनेच्या वेळी मुकेश सिंह दारुच्या नशेत होता की नाही हे तपासण्यासाठी पोलिसांनी त्याच्या रक्ताचे नमुने गोळा केले आहेत. दरम्यान, मुकेश सिंहच्या कोठडीसाठी त्याला कोर्टात हजर केले जाईल आणि त्याच्या वैद्यकीय अहवालाच्या आधारे पोलीस त्याच्यावर सदोष हत्येच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे.