तरुणीला धावत्या ट्रेनमधून ढकलून देत जीवे मारण्याचा प्रयत्न, बलात्कार झाल्याचं उघड
वाशीला येणाऱ्या तरुणीला धावत्या लोकल ट्रेनमधून ढकलून देत तिची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्याआधी या 25 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याचं समोर आलं आहे. सध्या तरुणीवर जे जे रुग्णालयात उपचार सुरु असून प्रकृती स्थिर आहे.
नवी मुंबई : धावत्या लोकल ट्रेनमधून वाशी खाडी पुलावर ढकलून देत तरुणीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना नवी मुंबईत उघडकीस आली आहे. संबंधित तरुणी मंगळवारी (22 डिसेंबर) सकाळी वाशी खाडी पुलावर रेल्वे रुळालगत जखमी अवस्थेत सापडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. प्राथमिक तपासात या तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे आढळून आले आहे. त्यानुसार वाशी रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तसेच बलात्काराचा गुन्हा दाखल करुन या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे.
या घटनेतील जखमी तरुणी टिटवाळा इथे राहत असून ती पवईला घरकाम करते. ती आठवड्यातून एकदा आपल्या घरी जाते. त्यानुसार मागील शनिवारी (19 डिसेंबर) संध्याकाळी आपल्या घरी टिटवाळा येथे गेली होती. त्यानंतर रविवारी (20 डिसेंबर) संध्याकाळी ती पवई इथे आपल्या कामावर येण्यासाठी रवाना झाली होती. परंतु त्यानंतर तिचा कुटुंबियांशीसंपर्क झाला नव्हता. मात्र मंगळवारी पहाटे सहाच्या सुमारास ही तरुणी वाशी खाडी पुलावर अप रेल्वे मार्गाच्या रुळालगत किलोमीटर नंबर 26/2 जवळ जखमी अवस्थेत मोटरमनच्या निदर्शनास आली होती. मोटरमनने याबाबतची माहिती स्टेशनमास्तरला दिल्यानंतर वाशी रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर रेल्वे पोलीस आणि आरपीएफच्या जवानाने जखमी तरुणीला तत्काळ वाशी येथील महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले.
महापालिका रुग्णालयातील डॉक्टरांनी तरुणीवर प्रथमोपचार करुन तिला पुढील उपचारासाठी मुंबईतील जे जे रुग्णालयात पाठवले. सध्या या तरुणीची प्रकृती स्थिर असून ती अद्याप बोलण्याच्या अवस्थेत नसल्याचे वाशी रेल्वे पोलिसांनी सांगितले. तरुणी बोलण्याच्या स्थितीत आल्यानंतर नक्की घटना काय घडली, हे स्पष्ट होईल . प्राथमिक तपासात तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे आढळून आले आहे. फॉरेन्सिकच्या अहवालानंतर तरुणीवर लैंगिक अत्याचार झाला की नाही हे स्पष्ट होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रकरणात अज्ञात व्यक्ती विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न करणे आणि बलात्कार या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले आहे.