मुंबई : मुंबईकरांची लाईफलाईन म्हणजे लोकल. लोकल रोज लाखो प्रवाशी प्रवास करतात. त्यात सकाळी आणि संध्याकाळच्या सुमाराला तर खूप गर्दी असते. 15 वर्षांपूर्वी सायंकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान ही लाईफलाईन अशीच धावत होती. त्यावेळी अचानक एका पाठोपाठ एक असे सात बॉम्बस्फोट झाले आणि मुंबईची लाईफलाईन हादरुन गेली. पश्चिम उपनगरीय रेल्वेच्या सात स्थानकांवर झालेल्या या बॉम्बस्फोटाने मुंबईसह देशभरात एकच खळबळ उडाली. या बॉम्बस्फोटात दोनशेहून अधिक निष्पाप मुंबईकरांचा बळी गेला तर सातशेहून अधिक लोक जखमी झाले.
भारताची आर्थिक राजधानी समजल्या जाणार्या मुंबईमध्ये 11 जुलै 2006 या दिवशी एकापाठोपाठ एक असे सात साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले. हे सगळे स्फोट मुंबईमधील पश्चिम रेल्वेच्या स्थानकांवर अथवा ट्रेनमध्ये झाले. खार रोड, जोगेश्वरी, माहिम, मीरा रोड, माटुंगा रोड, बोरीवली, वांद्रे या ठिकाणी हे स्फोट झाले आणि मुंबईसह देश हादरुन गेला.
Special Report | साखळी बॉम्बस्फोटांना 28 वर्षे पूर्ण; मुंबईसाठी धावूनही राजेंद्र जाधव यांची उपेक्षा
सरकारी आकडेवारीनुसार या हल्ल्यात 209 निष्पाप मुंबईकरांचा बळी गेला आणि 714 जण जखमी झाले. या हल्ल्यानंतर पश्चिम रेल्वेची वाहतूक बंद करण्यात आली होती. हजारो प्रवासी रेल्वे स्थानकांवर अडकून पडले होते. प्रशासनाने शाळा-कॉलेजांमध्ये तात्पुरती व्यवस्था केली होती. बेस्टनेही प्रसंगाचे गांभीर्य ओळखून प्रवाशांची गैरसोय टाळण्याच्या दृष्टीने आपल्या सर्व बसेस रस्त्यावर आणल्या होत्या.
महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख ह्यांनी मृतांच्या नातेवाईकांना 1लाख व जखमींना 50 हजार रुपये नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली. तर तत्कालीन रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांनी रेल्वेतर्फे मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपये व जवळच्या नातेवाईकाला नोकरी देण्याची घोषणा केली.
बॉम्बस्फोटाचा योजनाबद्ध कट
या बॉम्बस्फोटासाठी ‘सिमी’ आणि ‘लष्कर’ या अतिरेकी संघटनांनी योजनाबद्धरीत्या तयारी करुन हे स्फोट घडवून आणले. घटनेनंतर एटीएसनं 13 जणांना अटक केली. एटीएसकडून अटकेतल्या 13 आणि फरार 15 आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आलं. 11 सप्टेंबर 2015 रोजी खास न्यायालयाने 13 आरोपींना दोषी ठरवले आणि 30 सप्टेंबर 2015 रोजी न्यायालयाने कमाल अहमद अन्सारी, मोहंमद फैजल शेख, एहत्तेशाम सिद्दिकी, नावेद हुसेन खान,असिफ खान या पाच आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली, तर तन्वीर अहमद अन्सारी, मोहंमद माजिद शफी, शेख आलम शेख, मोहंमद साजिद अन्सारी, मुझ्झमील शेख,सोहेल मेहमूद शेख, जमीर अहमद शेख या सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा दिली.