मुंबई : कोरोनाची तिसरी लाट आल्यास मुलांमध्ये कोरोना संसर्गाची सर्वाधिक लागण होण्याची शक्यता सातत्याने व्यक्त होत आहे. या लाटेत मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारने विविध पातळ्यांवर तयारी सुरू केली आहे. महापालिकेच्या नायर रुग्णालयाने 12 ते 18  वयोगटातील मुलांच्या वैद्यकीय चाचण्या करण्याच्या दृष्टीने 
'झायडस कॅडिला कंपनी'ने विचारणा केली आहे. 


 मुंबई : मुंबई कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या विळख्यातून हळूहळू बाहेर पडत असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेची टांगती तलवार कायम आहे. यासाठी पालिकेची आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. तिसऱ्या लाटेतील लहान मुलांना असलेल्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या नायर रुग्णालयाने लहान मुलांना  ‘झायडस कॅडिला’ कंपनीला झायकोवि-डी  लस देण्यासाठी  संपर्क साधला आहे. 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा पायलट प्रोजेक्ट नायर रुग्णालयात राबवला जाणार आहे. यासाठी पालिकेला झायडस कॅडिला कंपनीनं ‘झायकोव-डी’ ही लस देण्यासंदर्भात तोंडी विचारणा केल्याची माहिती नायर रुग्णालय प्रशासनानं दिली आहे.


 संभाव्य तिसऱ्या लाटेत सर्वाधिक धोका लहान मुलांना असल्याचं बोललं जातं आहे. अशातच झायडस कॅडिलाने आपल्या 12 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांसाठी ‘झायकोव-डी’ लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी ड्रग कंट्रोलर जनरल आॅफ इंडियाकडे मागितली आहे. या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी पूर्ण झाली असून 27 हजार जणांवर ही चाचणी पार पडल्याची माहिती झायडस कॅडिलाने काढलेल्या आपल्या परिपत्रकात म्हंटलंय. काही जणांवर आधीच चाचण्या पार पडल्या आहेत. त्यामुळे प्रायोगिक तत्वावर नायर रुग्णालयामध्ये 50 मुलांना लस देण्यासाठी नियोजन करण्यात येणार आहे. आठवड्याभरात यासंदर्भातली परवानगी मिळण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.


 वर्षांला 12 कोटी डोस उत्पादन करण्याचे लक्ष झायडस कॅडिलाने ठेवले आहे. झायडस कॅडिला चाचणीत लस यशस्वी ठरली तर ती लहान मुलांसाठी येत्या सप्टेंबर महिन्यापासून लस उपलब्ध होऊ शकते. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलांवर परिणाम होण्याची शक्यता काही तज्ज्ञांनी फेटाळूनही लावली आहे. परंतु, याबाबतीत कोणताही हलगर्जीपणा महागात पडू शकतो, याची जाणीव सरकारला आहे. त्यामुळेच महापालिका आणि  सरकार कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी आणि लहान मुलांना धोक्यापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.