नवी मुंबई : गेल्या काही महिन्यात डिझेल आणि पेट्रोलच्या किंमती गगनाला भिडल्याने मालवाहतूक दारांचे कंबरडे मोडले आहे. डिझेलच्या किंमती 90 रूपयांच्या घरात गेल्याने 15 टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय मुंबई मालवाहतूक टेम्पों महासंघाने घेतला आहे. 1 मार्चपासून भाडेवाढ होणार असल्याने भाजीपाला, फळे, कांदा, बटाटा महाग होण्याची शक्यता आहे.
नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये महाराष्ट्र आणि देशभरातून येणारा भाजीपाला मुंबई आणि संपुर्ण उपनगरांना पुरवला जातो. एपीएमसीमधून दिवसाला 2 हजार गाड्या मुंबई, उपनगर, वसई-विरार, कल्याण डोंबिवली, पनवेल भागात पुरवला जातो. मात्र आता या मालवाहतूक दारांनी दरवाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सध्या डिझेल 87 रूपयांवर पोहोचल्याने दरवाढ केल्याशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्टीकरण मालवाहतूक दार संघटनेने दिले आहेत. डिझेल 61 रूपये होते तेव्हा ठरवण्यात आलेले टेम्पोभाडे आजही आहे तेच आहे. मुंबई मालवाहतूक टेम्पो महासंघाने येत्या 1 मार्चपासून मालवाहतूक भांड्यात 15 टक्के वाढ करण्याची घोषणा केली आहे. डिझेल बरोबर टायर, टोल, इन्शुरन्स, स्पेअरपार्ट, पार्किंग इत्यादी गोष्टीतही गेल्या काही वर्षांत वाढ झाल्याने ड्रायव्हर लोकांचा पगार देणे आणि गाड्यांचे बॅंक हप्ते भरणे मुश्किल झाले असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नाईलाजास्तव भाडेवाढ करावी लागत असल्याने येत्या गुरूवारी होणाऱ्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होणार आहे.
सध्या असलेले मालवाहतूक दर :
3 ते 4 टनाची टेम्पो गाडी :
एपीएमसी - दहिसर - 3500 रूपये
एपीएमसी - बोरिवली - 3500 रूपये
एपीएमसी - गोरेगांव - 3000 रूपये
एपीएमसी - अंधेरी - 2500 रूपये
एपीएमसी - मुंबई विमानतळ - 2500 रूपये
एपीएमसी - भायखळा - 2500 रूपये
एपीएमसी - कल्याण - 2500 रूपये
एपीएमसी - चेंबूर - 1700 रूपये
एपीएमसी - क्राॅफर मार्केट - 3000 रूपये
एपीएमसी - वसईविरार - 4000 रूपये
एपीएमसी - पनवेल - 2000 रूपये
15 टक्क्यांची दरवाढ केल्यानंतर
एपीएमसी - दहिसर - 4100 रूपये
एपीएमसी - बोरिवली - 4100 रूपये
एपीएमसी - गोरेगांव - 3450 रूपये
एपीएमसी - अंधेरी - 2875 रूपये
एपीएमसी - मुंबई विमानतळ - 2875 रूपये
एपीएमसी - भायखळा - 2875 रूपये
एपीएमसी - कल्याण - 2875 रूपये
एपीएमसी - चेंबूर - 1955 रूपये
एपीएमसी - क्राॅफर मार्केट - 3450 रूपये
एपीएमसी - वसईविरार - 4600 रूपये
एपीएमसी - पनवेल - 2300 रूपये
एपीएमसीमधून जीवनावश्यक वस्तू असलेल्या भाजीपाला, कांदा बटाटा, फळांच्या मालवाहतूक भाड्यात वाढ होणार असल्याने याचा परिणाम किंमती वर होणार आहे. भाडेवाढ झाल्यास साहजिकच त्याचा भुर्दंड ग्राहकांवर बसणार आहे. किरकोळ व्यापाऱ्यांकडून चढ्या दरात भाजीपाला, कांदा बटाटा, फळे विकली जाणार असल्याने महागाई आपोआपच वाढणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Petrol Disel Prices | प. बंगालमध्ये पेट्रोल- डिझेलच्या दरात कपात; महाराष्ट्र सरकार असा निर्णय घेणार का?
- 'पेट्रोल-डिझेल की मार, क्या यहीं अच्छे दिन है यार?' युवासेनेचा केंद्र सरकारला पोस्टर्समधून सवाल
- मुंबईत विनामास्क फिरल्यास 1000 रुपये दंड शुद्ध अफवा, मुंबई पोलीस आयुक्तांचं स्पष्टीकरण
- मुंबईत सार्वजनिक कार्यक्रम अन् लग्न समारंभातूनच कोरोना वाढला; बीएमसीचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांची माहिती