कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कार्यकाळात राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कपात करण्यात आली आहे. रविवारी रात्रीपासून हे नवे दर लागू करण्यात येणार आहेत. पश्चिम बंगालचे अर्थमंत्री अमित मित्रा यांनी याबाबतची माहिती दिली.


पश्चिम बंगालमध्ये घेण्यात आलेल्या या निर्णयाच्या धर्तीवर महाराष्ट्रात असा कोणता निर्णय होतो का, हे पाहण्यासाठी राज्य सरकारच्या भूमिकेकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे.


ममता बॅनर्जी सरकारनं प. बंगालमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये 1 रुपयानं कपात केली. परिणामी आता रविवारी रात्रीपासून या नव्या दरानं वाहनधारकांना पेट्रोल – डिझेल घेता येणार आहे. करामधील 1 रुपया कमी करत प. बंगालचे अर्थमंत्री अमित मित्रा म्हणाले, ‘केंद्र सरकार कराच्या माध्यमातून एक लीटर पेट्रोलमागं 32.90 रुपये आकारत आहे. राज्यांना यामध्ये फक्त 18.46 रुपयेच मिळतात. डिझेलवर केंद्र सरकार 31.80 रुपये आकारतं, तर राज्यांना 12.77 रुपये मिळतात’.


सध्याच्या घडीला प.बंगालची राजधानी असणाऱ्या कोलकाता येथे 1 लीटर पेट्रोलसाठी वाहनधारकांना 91.78 रुपये इतकी किंमत मोजावे लागत आहेत. तर, डिझेसाठी 84.56 रुपये मोजावे लागत आहेत. आता सरकारच्या निर्णयामुळं या दरांत एका रुपयाची कपात होणार आहे.


पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींवर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची प्रतिक्रिया; म्हणाल्या...


मागील 12 दिवस सातत्त्यानं वाढणाऱ्या इंधनाचे दर रविवारी मात्र बदलले नाहीत. ज्यामुळं जनतेला काहीसा दिसाला मिळाला. दिल्लीमध्ये आज पेट्रोल 90.58 रुपये प्रती लीटर, डिझेल 80.97 रुपये प्रती लीटर या दरानं विकलं जात आहे.


दर दिवशी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात. सकाळी 6 वाजल्यापासून हे नवे नियम लागू करण्यात येतात. एक्साईज ड्यूटी, डीलर कमिशन आणि इतरह काही गोष्टींसाठीची किंमत जोडून इंधनाचे दर दुपटीनं वाढतात. परदेशी चलनाच्या तुलनेत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर काय आहेत याच आधारे पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये बदल केले जातात.