मुंबई : मुंबईत सार्वजनिक कार्यक्रम आणि लग्न समारंभातूनच कोरोना वाढला असल्याची धक्कादायक माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे. मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बार, पब आणि रेस्टॉरंटसह मंगल कार्यालयांवर कारवाई केली जात आहे. सध्या मुंबईत 82 टक्के लोकांना कोरोनाची लक्षणं दिसत नाहीत. फक्त 18 टक्के लोकांनाच रुग्णालयात दाखल करावे लागत आहेत. बहुतांश रुग्ण हे उच्चभ्रू वस्तीतील आहेत, असंही सुरेश काकाणी यांनी सांगितलं. मात्र, कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी सध्यातरी मुंबईत संचारबंदी लागू करण्याचा विषय अजेंड्यावर नसल्याचंही काकाणी यांनी सांगितलं.


मुंबईकरांनी कोरोना नियमांची काटेकोर अमंलबजावणी केल्यास लॉकडाऊन करण्याची वेळ येणार नाही. मुंबईत सध्या नाईट कर्फ्यू लागू करण्यापेक्षा लोकांमध्ये कोरोना विषयक जागृती करण्यावर भर देण्यात येत आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. मुंबईकरांनी मास्क लावणं बंधनकारक आहे. मास्क न लावणाऱ्यांवर कारवाई केली जात असून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात येत आहे. प्रसंगी मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांचीही मदत घेतली जाईल. अशा लोकांकडून पोलीस जो दंड वसूल करतील त्यातील 50 टक्के रक्कम महापालिकेला मिळेल आणि उरलेली 50 टक्के रक्कम पोलीस कल्याण निधीला देण्यात येईल, असंही सुरेश काकणी यांनी बोलताना सांगितलं.


मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी मुंबईतील कोविड सेंटर आणि बेड्स पुरेसे आहेत. याआधी कोरोनाचा जो प्रोटोकॉल पाळण्यात आला. तोच आताही पाळण्यात येईल. तसे आदेशच आले असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. मुंबईत काल 921 नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 3 लाख 19 हजार 128 झाला आहे. सद्यस्थितीत मुंबईत एकूण 5859 अॅक्टिव्ह रुग्ण आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :