मुंबई छ भाजपने ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांना उत्तर मध्य मुंबईतून (North Central Mumbai) उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघाच्या विद्यमान खासदार पूनम महाजन (Poonam Mahajan) यांचे तिकीट कापून भाजपने हा मोठा निर्णय घेतला आहे. दरम्यान, तिकीट मिळताच त्यांनी कामाला सुरुवात केली आहे. त्यांनी आज (28 एप्रिल) मुंबादेवीचे दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडला. उज्ज्वल निकम यांना या निवडणुकीत किती यश मिळणार, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.


उज्ज्वल निकम यांना फोडला प्रचाराचा नारळ


उज्ज्वल निकम यांनी मुंबादेवीचे दर्शन घेतले आहे. त्यांनंतर त्यांनी चौत्यभूमीला जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडक यांच्या स्मृतींनाही अभिवादन केले. यासह त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज मैदानात असलेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीसही वंदन केले. दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात जाऊन त्यांनी सावरकरांना अभिवादन केले. म्हणजेच भाजपने उमेदवारी दिल्यानंतर मी एक सर्वसमावेशक आणि योग्य उमेदवार असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न निकम यांच्याकडून करण्यात आला आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे. आता ते  उत्तर मध्य मुंबईत हा मतदारसंघ पिंजून काढणार आहेत.


...म्हणून मुंबादेवीचे दर्शन घेतले


भाजपने तिकीट दिल्यानंतर निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातील लोकांचे प्रश्न लोकसभेत मांडण्यासाठी माझी निवड करण्यात आली. माझ्या आयुष्यातील दुसरी राजकीय इनिंग सुरू करण्याआधी मी मुंबादेवीचे दर्शन घेतले. लोकांचे प्रश्न संसदेत मांडण्याची ताकद, भाजपच्या नेत्यानुसार पदाधिकाऱ्यांनुसार लोकांचे प्रश्न संसदेत मांडण्याची ताकद मला मिळो यासाठी मी दर्शन घेतले, असे निकम म्हणाले.


पूनम महाजन यांना नवी जबाबदारी- उज्ज्वल निकम 


तसेच बाबासाहेब आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे आणि वीर सावरकर यांना अभिवादन करून मी माझ्या प्रचाराची सुरुवात करत आहे. प्रत्येक गोष्टीतून वाईट अर्थ काढू नये. पूनम महाजन यांना पक्ष कदाचित नवी जबाबदारी देईल. याबाबत मी आताच काही सांगू शकत नाही. प्रचारादरम्यान मला मतदान का करावे, माझा पक्ष कसा चांगला आहे, हे मी जनतेला सांगणार आहे, असे उज्ज्वल निकम म्हणाले. 


अंतर्गत आव्हान पेलणार का 


उत्तर मध्य मुंबई मतदारसंघाच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांचं तिकीट कापून भाजपने उज्ज्वल निकम यांना तिकीट दिलं आहे. त्यामुळे पूनम महाजन यांचे समर्थक नाराज होण्याची शक्यता आहे.  निकम हे याआधी भाजपत सक्रिय नव्हते. त्यामुळे भाजपात प्रवेश मिळताच त्यांना थेट उमेदवारी देण्यात आली आहे. याच कारणामुळे त्यांना अंतर्गत आव्हानांना तोंड द्यावं लागू शकतं तसेच सर्वांना सोबत घेऊन प्रचार करण्याच आव्हान त्यांच्यापुढे असणार आहे.


वर्षा गायकवाड यांच्याविरोधात लढाई


दुसरीकडे उज्ज्वल निकम यांच्याविरोधात काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना तिकीट दिले आहे. त्या एक अनुभवी राजकारणी आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्या मुंबईत काम करत आहेत. त्यामुळे त्यांचा जनसंपर्क मोठा आहे. विशेष म्हणेज महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या शिवसेना (ठाकरे गट) या पक्षानेदेखील वर्षा गायकडवाड यांच्यासाठी प्रचार करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आगामी काळात गायकवाड यांना तोंड देणं हेदेखील निकम यांच्यापुढील महत्त्वाचे आणि मोठे आव्हान आहे. त्यामुळे निकम यांना उमेदवारी मिळाली असली तरी त्यांच्या अंगाला विजयाचा गुलाल लागणार का? असे विचारले जात आहे. येत्या चार जून रोजी मतमोजणी झाल्यानंतरच हे स्पष्ट होईल.  


हेही वाचा :


तीच तारीख, शहरही तेच! रत्नागिरीत मनसे-शिवसेनेची एकाचवेळी सभा; राजकीय वातावरण तापणार!


शेतकऱ्यांनो 'या' तीन योजनांचा घ्या फायदा, आर्थिक अडचण हमखास होईल दूर!