Pushkar Shrotri : पैशांची चणचण असताना पुष्कर श्रोत्री करायचा 'हे' काम; आजोबांच्या समोर गुपित उलगडलं अन्...
Pushkar Shrotri Sandeep Pathak : 'पटलं तर घ्या' या कार्यक्रमात पुष्कर श्रोत्री आणि संदीप पाठकने आयुष्यासंबंधित अनेक गोष्टींबाबत भाष्य केलं आहे.
Pushkar Shrotri Sandeep Pathak : अभिनेता पुष्कर श्रोत्री (Pushkar Shrotri) आणि संदीप पाठक (Sandeep Pathak) हे दोघेही हरहुन्नरी अभिनेते आहेत. आता 'पटलं तर घ्या' या कार्यक्रमादरम्यान त्यांनी आयुष्यासंबंधित अनेक गोष्टींवर भाष्य केलं आहे. पुष्कर श्रोत्री पैसे कमवण्यासाठी रिक्षा चालवायचा अशी चर्चा आहे. या चर्चांवर स्पष्टीकरण देत पुष्कर म्हणाला, "माझ्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली होती. पण कलेची आवड असल्यामुळे घरातून मिळणारा पॉकेट मनी पुरायचा नाही, त्यामुळे फावल्या वेळेत मी रिक्षा चालवायचो आणि त्यातून मिळणाऱ्या पैशांचा मी चांगला वापर करायचो".
पुष्कर श्रोत्री (Pushkar Shrotri) पुढे म्हणाला,"नाटकांची, सिनेमांची आवड असल्याने ते पाहण्यासाठी घरातून सारखं पैसे मागणं पटत नव्हतं. त्यामुळे घरातल्यांना न सांगता मी रिक्षा चालवायचो. पण एकेदिवशी माझे आजोबा रिक्षात बसले आणि त्यावेळी माझं गुपित उघड पडलं. त्यादिवसानंतर मी रिक्षा चालवणं बंद केलं. रिक्षा चालवण्यापासून ते निवडणुकींच्या दरम्यान भिंती रंगवण्यापर्यंत अनेक प्रकारची कामं मी केली आहेत".
दरम्यान 'पटलं तर घ्या' या कार्यक्रमादरम्यान संदीप पाठकने (Sandeep Pathak) मात्र राजकारणाबाबत (Politics) परखड मत व्यक्त केलं आहे. "आपल्या देशाचं कालचं, आजचं आणि उद्याचं राजकारणही रस्ते देऊ, पाणी देऊ आणि वीज देऊ याभोवतीच फिरणार आहे. यातून आपण कधी बाहेर पडणार आहोत, असा प्रश्न या कार्यक्रमादरम्यान संदीप पाठकने उपस्थित केला आहे". संदीपने काही दिवसांपूर्वी ट्वीट करत आपला संताप व्यक्त केला होता.
सर्व राजकीय नेते आपआपसात भांडत आहेत. परंतु एकही पक्ष किंवा एकही नेता सामान्य जनतेच्या समस्येबद्दल एक चकार शब्द बोलत नाही.महागाई, वीजटंचाई, पाणी समस्या………..
— Sandeep Pathak / संदीप पाठक (@mesandeeppathak) April 15, 2022
संदीप पाठकने वीस वर्षांनी पहिल्यांदा पाहिला समुद्र
संदीप पाठक हा मराठवाड्यातला कलाकार आहे. त्याच्या भागात आठवड्यातून एकदा पाणी येतं. नातेवाईकदेखील मराठवाड्यातील असल्याने त्याचा मुंबईशी कधी संबंध आला नव्हता. पण मनोरंजनसृष्टीत काम करण्याचा निर्णय घेतल्यानंतर संदीपने मुंबई गाठली. त्यावेळी तो 20 वर्षांचा होता. मुंबईत आल्यानंतर त्याने पहिल्यांदा समुद्र पाहिला होता. मुंबईत आल्यानंतर पाण्याची नासाडी होताना पाहिली आणि त्याचा त्याला खूप त्रास झाला होता. मुंबईत आल्यानंतर समुद्राच्या लाटांप्रमाणे संदीपला बाहेर फेकण्यात आलं होतं. पण त्याने प्रवास सुरुच ठेवला आणि मुंबईने त्याला कधी आपलसं केलं हे त्याला कळलचं नाही.
संबंधित बातम्या