Akola News : गोपीकिशन बाजोरियांसह युवासेनेचे जिल्हाप्रमुख आणि महापालिकेतील दोन नगरसेवक शिंदे गटात
शिवसेनेचे अकोल्याचे माजी जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर यांनी अनेकदा विद्यमान शिवसेना जिल्हाप्रमुख तथा बाळापुर मतदारसंघाचे शिवसेना आमदार नितिन देशमुख यांच्यावर आरोप केले होते.
अकोला : आज अकोला शिवसेनेत ही फुटीची ठिणगी पडली आहे. आज अकोल्यातील शिवसेनेचे माजी आमदार गोपीकिशन बाजोरियांनी आपल्या आमदार मुलासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेचे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. तर त्यांचे पुत्र आणि विधान परिषद आमदार विप्लव बाजोरियाही हे शिंदे गटाच्या मार्गावर आहेत. आज माजी आमदार गोपीकिशन बाजोरियांसोबत युवा सेनेचे जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप, महापालिका नगरसेवक आश्विन नवले, शशी चोपडेही शिंदे गटात गेले आहेत. दरम्यान, गोपीकिशन बाजोरियांसह शिंदे गटात जायचं की नाही यासंदर्भात शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर आणि कार्यकर्ते उद्या निर्णय घेणार आहेत. या संदर्भात अकोल्यात शिवसेनेतील असंतुष्टांची लवकरचं बैठक घेण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल. असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
आज बाजोरिया पिता-पुत्रांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट :
आज बाजोरिया पिता-पुत्रांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या भेटीदरम्यान गोपीकिशन बाजोरिया यांच्यासह पुत्र तथा शिवसेनेचे विधान परिषद आमदार विप्लव बाजोरीया, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख विठ्ठल सरफ, माजी नगरसेवक उपस्थित होते. आता यांच्या भेटीनंतर अकोल्यात उद्या शिवसेनेची बैठक बोलविण्यात आल्याचं कळते. या बैठकीत अकोल्यातील शिवसेनेचा मोठा गट शिंदे गटात सामील होण्याच्या तयारीत आहे. यात अनेक माजी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकारी असल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, येत्या महापालिका निवडणुकीत शिंदे गट आणि भाजपची युती करून निवडणूक लढवणार असल्याचे समजते आहे.
अकोला शिवसेनेत नितीन देशमुख-बाजोरिया गटाच्या वादाची किनार :
शिवसेनेचे अकोल्याचे माजी जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर यांनी अनेकदा विद्यमान शिवसेना जिल्हाप्रमुख तथा बाळापुर मतदारसंघाचे शिवसेना आमदार नितिन देशमुख यांच्यावर आरोप केले होते. अकोल्यात शिवसेना संपवण्यासाठी देशमुख हे भाजपला नेहमीचं मदत करतात, याबाबत अनेक तक्रारी पक्ष प्रमुखांकडे केल्या. मात्र त्यावर अद्याप तोडगा निघाला नसल्याचे त्यांनी म्हटलं होतं. अकोला शिवसेनेतील वादाला विधान परिषद निवडणुकीतील पक्षाच्या लाजिरवाण्या पराभवाची किनार आहे, आमदार नितीन देशमुखांच्या दगाफटक्यांनीच तीनदा आमदार राहिलेल्या गोपीकिशन बाजोरियांचा पराभव झाल्याचा बाजोरिया गटाचा आरोप होता. आमदार देशमुख भाजपशी संधान सांधत जिल्ह्यात शिवसेना पक्ष संपविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा बाजोरिया गटाचा आरोप होता. माजी सहसंपर्कप्रमुख श्रीरंग पिंजरकर यांनी थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना पत्र दिलं होतं. यात हे आरोप करण्यात आले होते. अन् या पत्रात थेट पक्षाचे आमदार आणि माजी जिल्हाप्रमुख नितीन देशमुखांवर गंभीर आरोप लावले होते. पत्रात पिंजरकरांनी आमदार देशमुखांवर खंडणीखोरीचे गंभीर आरोप लावले होते. मात्र, आमदार नितीन देशमुखांनी सहसंपर्कप्रमुखांचे आरोप फेटाळलून लावले होते. अकोल्यातील शिवसेनेतील हे आरोप-प्रत्यारोप फार गंभीर होते. दरम्यांन, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने अकोला जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर झाल्या. विशेष बाब म्हणजे थेट शिवसेना पक्षप्रमुखांना पत्र लिहून आमदार नितीन देशमुखांवर गंभीर आरोप करणारे श्रीरंग पिंजरकर यांना सहसंपर्क प्रमुख पदावरून हटवले होते. यामुळेच तेव्हापासून बाजोरिया गटांमध्ये पक्ष प्रमुख ठाकरेंवर नाराजी असल्याचे बोलले जाते.