Yavatmal News: आजवर तुम्ही अनेक पालिका अधिकारी रस्त्याच्या कडेला उभे राहून, कर्मचाऱ्यांना आदेश देत काम करून घेताना पाहिलं असेल. मात्र स्वतः नाल्यात उतरून नालेसफाई करताना तुम्ही कोणत्या अधिकाऱ्याला पाहिलं आहे का? नाही ना. मात्र नगर पालिकेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक माधुरी मडावी यांनी स्वतः नाल्यात उतरत शहरात सफाई अभियानाला सुरुवात केली आहे.


मडावी यांनी शहरात मान्सूनपूर्व कामाचा धडाका सुरू केला आहे. त्यात सांडपाणी नाल्यात वाहून नेणाऱ्या मोठ्या व मुख्य नाल्यांचे सफाई अभियान सुरू केले. शनी मंदिर ते मच्छी पुल या नाल्याची छोटी गुजरी परिसरात स्वच्छता करण्यात आली. यावेळी नाला स्वच्छ करणाऱ्या 40 कामगारांसमवेत स्वतः मुख्याधिकारी यांनी नाल्यात उतरुन हातात फावडे घेतले. मुख्याधिकारी प्रत्यक्ष नाला साफ करीत असल्याचे पाहुन अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी स्वतः काम करीत कामगारांना निर्देश दिले.


शहरातील आझाद मैदान मधून जाणारा आणि हनुमान आखाडा परिसरातून येणारा नाला याशिवाय इतर नाल्याची देखील साफसफाई सुरू झालेली आहे. शहरातील सर्व नाले मे महिन्यापूर्वी स्वच्छ करणे, तसेच शहरात रस्त्यावर कोठेही डबके साचणार नाही, याची खबरदारी घेणे. यासाठी देखील मुख्याधिकारी यांनी आपल्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून काम सुरू केले आहे. मुख्याधिकारी म्हणून त्यांच्या या समर्पित कर्तव्य निष्ठेचे जनतेकडून कौतुक केले जात आहे.


जेव्हा नगरसेवकही नालेसफाईसाठी उतरले नाल्यात  


यवतमाळ नगर पालिकेच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी यांच्या आधी सोलापूर येथील शिवसेनेचे नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांनी देखील स्वतः नाल्यात उतरून नालेसफाई केली होती. तर दिल्लीतील आम आदमी पक्षाचे आमदार हसीब उल हसन हे देखील शास्त्री पार्क भागातल्या एका नाल्यात सफाईसाठी उतरले होते. यासोबतच मुंबईतील मुलुंडमध्ये रेल्वे रुळालगत असलेल्या नाल्यांची सफाई करण्यासाठी नगरसेवक प्रशांत गंगाधर यांनी पुढाकार घेत स्वतः नालेसफाई केली होती.   


संबंधित बातम्या: 


मुलुंडच्या नगरसेवकावर नालेसफाई करण्याची वेळ 
आम आदमी पार्टीचा आमदार नाल्यात उतरला, सफाई करत तुंबलेला कचरा काढला बाहेर
स्वत: गटारीत उतरुन सफाई करणारा शिवसेना नगरसेवक!