एक्स्प्लोर
Advertisement
मराठी साहित्य संमेलनात वाचलं न जाणारं नयनतारा सहगल यांचं 'ते' भाषण
ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांचं निमंत्रण मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी रद्द केलं. त्यामुळे संमेलनात होऊ न शकणार त्यांचं संपूर्ण भाषण 'एबीपी माझा'च्या वाचक-प्रेक्षकांसाठी जसंच्या तसं
नवी दिल्ली : ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांचं निमंत्रण मराठी साहित्य संमेलन आयोजकांनी रद्द केल्यानंतर साहित्य विश्वात त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. नयनतारा सहगल यांना साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून निमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र त्यांच्या निमंत्रणाला शेतकरी न्याय हक्क समिती आणि मनसेने विरोध केल्यानंतर आयोजकांनी त्यांचं निमंत्रण रद्द केलं. आयोजकांनी घेतलेल्या निर्णयाचा विरोध करत अनेक मान्यवरांनी संमेलनावर बहिष्कार टाकला आहे.
नयनतारा सहगल यांचं संपूर्ण भाषण 'एबीपी माझा'च्या वाचक-प्रेक्षकांसाठी जसेच्या तसे
माझ्याकरता हा एक भावनिक क्षण आहे. मला असे वाटते आहे की, ज्यांचे नाव आपल्या देशाच्या आधुनिक इतिहासामध्ये नोंदवले गेलेले आहे ते मराठी साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ रोवणारे महादेव गोविंद रानडे (माझे चुलत आजोबा शंकर पांडुरंग पंडित हे त्यांचे जवळचे स्नेही आणि सहकारी होते), या संमेलनाचे अध्यक्षपद भूषवलेले सर्व थोर मराठी साहित्यिक आणि ज्यांच्या लेखनामुळे भारतीय साहित्य नावाचे महान सृजनात्मक कार्य समृद्ध झालेले आहे, असे सर्व संमेलनांमध्ये सहभागी झालेले सगळेच लेखक, या सर्वांच्या छायेत मी आज उभी आहे.
माझ्याकरता हा क्षण भावनिक असण्याचे आणखी एक कारण म्हणजे माझे वडील रणजीत सीताराम पंडित यांच्याकडून माझे स्वतःचे महाराष्ट्राशी असलेले नाते. त्यांच्याबद्दल थोडक्यात तुम्हाला सांगू इच्छिते.
संस्कृत विद्वानांच्या एका नामांकित कुटुंबातले माझे वडील स्वतःही संस्कृतचे विद्वान होते. त्यांनी 'मुद्राराक्षस', कालिदासाचे 'ऋतुसंहार' आणि 'राजतरंगिणी' या तीन अभिजात संस्कृत ग्रंथांचे इंग्रजीमध्ये भाषांतर केले होते. त्यांपैकी 'राजतरंगिणी' हा ग्रंथ म्हणजे कल्हण पंडिताने बाराव्या शतकामध्ये लिहिलेला काश्मिरी राजांचा इतिहास आहे. माझ्या वडिलांना या ग्रंथाचे विशेष आकर्षण होते, कारण संस्कृत आणि काश्मीर हे दोन विषय त्यांच्या अगदी जिव्हाळ्याचे होते.
ब्रिटिश अंमल असताना त्यांना ज्या अनेकवेळा तुरुंगात जावे लागले होते, त्यांपैकी दोन तुरुंगवाऱ्यांमध्ये मिळून त्यांनी हे भाषांतर केले आणि ते आपले काश्मिरी श्वशुर पंडित मोतीलाल नेहरू यांना अर्पण केले. हे भाषांतर प्रकाशित झाले, तेव्हा त्यांचे मेव्हणे, जवाहरलाल नेहरू यांनी त्याची प्रस्तावना लिहिली.
देशभक्तीचा वारसा
माझ्या आई आणि वडिलांनी महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याच्या राष्ट्रीय चळवळीमध्ये भाग घेतला होता. या काळात माझी आई विजयालक्ष्मी पंडित हिला तीन वेळा, तर माझ्या वडिलांना चार वेळा तुरुंगवास घडला होता. वडिलांच्या चौथ्या तुरुंगवासाच्या वेळी बरेलीतल्या तुरुंगामध्ये माझे वडील गंभीर आजारी पडले. त्या तुरुंगातले एकूण वातावरण आणि तिथली सर्व व्यवस्था केवळ भयानक होती.
वडील आजारी पडल्यावर ना तर त्यांना कुठलेही वैद्यकीय उपचार देण्यात आले, ना त्यांच्या आजाराच्या नेमक्या स्वरुपाची आणि तीव्रतेची माझ्या आईला कल्पना देण्यात आली. पण असे असूनही माझ्या वडिलांनी सुटकेची याचना करण्यास नकार दिला. अखेर जेव्हा माझ्या आईला त्यांच्या अवस्थेबद्दल कळवण्यात आले, तेव्हाही तिला त्यांच्याशी फक्त वीस मिनिटांची भेट मंजूर करण्यात आली. ही भेटही नियमाप्रमाणे तुरुंग अधीक्षकांच्या कार्यालयामध्ये, त्यांच्या नजरेखाली झाली. या नियमांमध्ये राजकीय बंद्यांना त्यांना भेटायला आलेल्या व्यक्तीसोबत एकांत मिळण्याची तरतूद नव्हती. भेटीसाठी म्हणून माझ्या वडिलांना जेव्हा तिथे स्ट्रेचरवर आणण्यात आले, तेव्हा माझ्या आईला प्रचंड धक्का बसला.
डोक्याचा संपूर्ण गोटा केलेला आणि शरीरावर मांस जणू नाहीच, अशी त्यांची अवस्था होती. त्यांना पाहताच आईला रडू फुटले, पण तुरुंगाधिकाऱ्यासमोर तिने अश्रू ढाळलेले वडिलांना अजिबात आवडले नसते हे ठाऊक असल्याने तिने महत्प्रयासाने स्वतःच्या अश्रुंना बांध घातला. सुटकेची याचना करून सरकारचे उपकार शिरावर न घेण्यामागची त्यांची भूमिका त्यांनी तिच्याजवळ स्पष्ट केली.
ते म्हणाले, "गांधी आणि नेहरू या सिंहांच्या साथीने मी लढलो आहे. मग आता मी (भित्र्या) कोल्ह्याप्रमाणे वागावे असे तुला वाटते का?" त्यांच्या निर्धारामध्ये बदल होणार नाही हे ठाऊक असल्यामुळे तिने स्वतःच्या भावनांना आवर घातला आणि त्यांचा हात हातात घेऊन ती त्यांच्या स्ट्रेचरजवळ बसून राहिली. मग तिने त्यांना घरची, मुलांची खबरबात सांगितली आणि त्यांच्या आवडत्या बागेत सध्या काय-काय फुलले आहे तेही सांगितले.
अंतिमतः सरकारने त्यांची सुटका केली, पण ती जणू मरण्यासाठीच, कारण जेमतेम तीनच आठवड्यांनी त्यांचा मृत्यू झाला. नंतर अनेक वर्षांनी, स्वातंत्र्य मिळाल्यावर, माझी आई भारताची ब्रिटनमधील उच्चायुक्त असताना एकदा पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांच्यासोबत भोजन घेत असताना चर्चिल तिला म्हणाले, "तुमच्या पतीचा जीव आम्हीच घेतला, नाही?" त्यांचे हे कबुलीजबाबासम उद्गार ऐकून तिला खूप आश्चर्य वाटले होते.
1940 च्या दशकात तुमच्यापैकी बहुतेकांचा जन्मदेखील झालेला नसेल. तुम्ही सगळे एका स्वतंत्र देशात जन्मले आणि मोठे झालेले आहात, म्हणून मी तुम्हाला ही व्यक्तिगत कहाणी सांगितली. त्यावरून तुम्हाला त्या काळातल्या धैर्य आणि शिस्त यांची, तसेच देशाच्या स्वातंत्र्याकरता जे स्त्री-पुरुष लढले, त्यांच्या निर्धाराची कल्पना यावी. त्या महान लढ्यामध्ये ज्यांनी आपले आयुष्य पणाला लावले आणि स्वातंत्र्याची तीव्र आस असल्यामुळे सर्व प्रकारे प्रचंड दुःखही भोगले, अशा ज्ञात-अज्ञात, आबालवृद्ध, हजारो, लाखो भारतीयांमध्ये माझे आईवडील होते. मला तुम्हाला विचारायचे आहे, आज आपल्यामध्ये स्वातंत्र्याची तीच आस आहे का? आपल्या आधी होऊन गेलेल्या, भारताच्या भावी पिढ्या स्वातंत्र्यात जगाव्या म्हणून लढत मृत्यू पत्करलेल्या स्त्री-पुरुषांचे नाव सांगण्यास आपण पात्र आहोत का?
धार्मिक-सांस्कृतिक विविधता संपवण्याचा प्रयत्न
मी हा प्रश्न उपस्थित करण्याचे कारण म्हणजे आपली विविध प्रकारची स्वातंत्र्ये आज धोक्यात आहेत. या स्वातंत्र्यांना असलेल्या धोक्यांनी माझ्या मनात एवढे वादळ उठवले आहे, की आज इथे तुमच्यासमोर काय बोलायचे याचा विचार करत असताना, सध्या भारतामध्ये जे काही चालले आहे त्याबद्दलच तुमच्याशी बोलायला हवे हे माझ्या लक्षात आले. याचे कारण म्हणजे, या गोष्टी आपल्या जीवनाच्या प्रत्येक बाबीवर वाईटरित्या परिणाम करत आहेत; आपण काय खातो, कुणाशी विवाह करतो, काय विचार करतो, काय लिहितो आणि अर्थातच, आपण ईश्वराची प्रार्थना कशी करतो. आज अशी परिस्थिती आहे, जिच्यात वेगळेपण आणि सत्तारुढ विचारप्रणालीला विरोध या गोष्टींवर भयंकर हल्ले होत आहेत.
वैविध्य हे आपल्या सामाजिक व्यवस्थेचे मूळ आहे. आपल्याकडे विविध भाषांमधले प्राचीन साहित्य आहे. आपण वेगवेगळ्या प्रकारचे अन्न खातो, आपली वेशभूषा वेगवेगळी आहे, आपले सण वेगवेगळे आहेत आणि आपण वेगवेगळ्या धर्मांचे आचरण करतो. सर्वसमावेशकता हा आपल्या जीवनाचा एक भाग राहिलेला आहे आणि ही प्राचीन, बहुसांस्कृतिक सामाजिक व्यवस्था, जिचे नाव भारत आहे, ती म्हणजे आपले सर्वात मोठे, विलक्षण असे यश आहे, जे अन्य कुठल्याही देशाला माहितदेखील नाही.
आज मात्र धार्मिक विविधता निपटून टाकून आपल्याला एकाच धार्मिक आणि सांस्कृतिक ओळखीमध्ये कोंबू पाहणाऱ्या धोरणामुळे आपली हीच गोष्ट धोक्यात आली आहे. हे धोरण एका फटक्यात, हिंदू नसलेल्या आपल्या कोट्यवधी देशबंधूंचे आणि स्त्रियांचे घटनात्मक अधिकार काढून घेऊन त्यांना आक्रमक, बाहेरचे आणि शत्रू ठरवू पाहते आहे.
स्वातंत्र्य मिळाल्यावर देशाची जडणघडण करणाऱ्या आपल्या पूर्वसूरींनी देशाकरता धार्मिक ओळख नाकारली होती आणि भारताला एक निधर्मी लोकशाही प्रजासत्ताक देश घोषित करण्याचा सूज्ञपणा दाखवला होता. याचा अर्थ ते धर्मविरोधी होते असे नव्हे, तर आपल्यासारख्या विविध धर्म असलेल्या आणि धार्मिक प्रवृत्तीच्या देशाला, केवळ निधर्मी राज्यव्यवस्थाच एक सर्वसमावेशक, तटस्थ छत्रछाया देऊ शकेल आणि तिच्यात प्रत्येक भारतीयाला त्याच्या वा तिच्या श्रद्धेनुसार जगण्याचा व ईश्वरभक्ती करण्याचा अधिकार असेल, हे त्यांनी जाणले होते.
हा निर्णय ज्यात घेतला गेला, त्या विधीमंडळामध्ये बहुसंख्य सदस्य हिंदू होते आणि तरीही त्यांनी अशी एक राज्यघटना तयार केली, जिच्या प्रस्तावनेमध्ये सर्व भारतीयांना स्वातंत्र्य, समता आणि बंधुभावयुक्त जीवनाची हमी देण्यात आली होती. हा उच्च आदर्श घटनेचे शिल्पकार आणि ज्यांच्या अखिल मानवजात समान आहे अशा आग्रहातून जातिव्यवस्थेविरूद्ध एक क्रांती सुरू झाली, ते थोर मराठी विभूती डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यांच्या प्रेरणेतून निर्माण झाला होता. आज तोच उच्च आदर्श बाजूला सारण्यात आलेला आहे. अल्पसंख्यांक आणि हिंदूराष्ट्राच्या उद्दिष्टाला पाठिंबा न देणारे लोक रस्त्यांवरून मोकाट फिरणाऱ्या दुराग्रही लोकांचे लक्ष्य ठरत आहेत.
कायदा हातात घेऊन जीवे मारणारे जमाव गोहत्या आणि गाईचे मांस खाण्यासंबंधीच्या कृत्रिम अफवांच्या आधारे उघडपणे मुस्लिमांवर हल्ले करत आहेत, त्यांना ठार मारत आहेत. आपण सगळे ही झुंडशाही टीव्हीवर पाहात आहोत. उत्तर प्रदेशात गोहत्येच्या नावाखाली या जमावांचे हल्ले सर्रास सुरू आहेत आणि सरकारी यंत्रणा बाजूला उभ्या राहून ते पाहात आहेत. या प्रकारचा दहशतवाद जेव्हा अधिकृत ठरतो, जसे उत्तर प्रदेशात घडते आहे, तेव्हा आपण न्यायाकरता कुणाच्या तोंडाकडे पाहायचे?
जमावाच्या हिंसाचारामुळे भीतीचं वातावरण
सरकारचा पाठिंबा असलेला जमावाचा हा हिंसाचार बचावहीन लोकांविरूद्ध अनेक ठिकाणी सुरू आहे आणि त्यातल्या दोषींना शिक्षा होत नाहीत. काही प्रसंगांमध्ये उलट बळी पडलेल्या लोकांवरच गुन्हे दाखल झाले आहेत आणि काही ठिकाणी गुन्हेगारांचे कौतुक झाले आहे. या दुःखदायक परिस्थितीची मोजावी लागणारी मानवी किंमत म्हणजे, सुरक्षित राहू शकण्याच्या, आपल्या पद्धतीने ईशप्रार्थना करू शकण्याच्या आपल्या हक्काची ज्यांना शाश्वती वाटत नाही अशा अनेक भारतीयांच्या मनामध्ये भीती आणि दुःख दाटण्याचा काळ आता आला आहे. त्यांच्यापैकी जे गरीब आणि असहाय्य आहेत - ज्यांना त्यांच्या गावांतून, घरांतून आणि नोकऱ्यांमधून हाकलून देण्यात आले आहे - ते लोक कामधंदा, मदत, आशा किंवा भवितव्याविना जगत आहेत.
मी कादंबऱ्या लिहिते आणि माझ्या कथांचे वस्तुविषय राजकीय असत आले आहेत. लेखक म्हणून आपण सर्व जाणतो की आपण आपले विषय निवडत नाही. आपल्या सभोवताली असलेल्या विषय आणि वातावरणातून आपण कथांना जन्म देत असतो.
माझा जन्म स्वातंत्र्यलढ्याच्या काळात झालेला असल्यामुळे त्या काळाची आणि त्याने जन्म दिलेल्या देशाची मूल्ये हीच माझ्या काल्पनिक आणि वास्तविक विषयांवरच्या लेखनाचा विषय होती. माझ्या कादंबऱ्या आधुनिक भारताच्या घडण्यासंबधी आहेत असे मला वाटत असे. पण माझ्या शेवटच्या दोन कादंबऱ्या आजच्या काळावर बेतलेल्या असल्याने त्या मात्र आधुनिक भारताच्या बिघडण्यासंबंधी आहेत.
कलेवर नियंत्रण हे हुकूमशाहीचं लक्षण
आपण सर्व लेखक असल्यामुळे, सध्याच्या राजकीय वातावरणामध्ये आपल्या लेखक आणि कलावंत भाईबंदांच्या बाबतीत काय घडते आहे त्याकडे लक्ष देऊ या. प्रश्न विचारणारे मन, सृजनात्मक कल्पनाशक्ती आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्य यांना सध्याच्या राजकीय वातावरणामध्ये काहीही स्थान नाही हे आपण पाहतोच आहोत आणि जिथे विचारस्वातंत्र्य किंवा लोकशाही हक्कांप्रती आदर नसतो, तिथे लेखन ही एक धाडसी, धोकादायक कृती बनते. जगभरातल्या हुकूमशाही राजवटींमध्ये नेहमी असेच घडत आले आहे. तिथे कला ही सरकारी नियंत्रणाखाली ठेवली जाते आणि लेखकांनी जर त्यांच्या लक्ष्मणरेषेच्या बाहेर पाऊल टाकले, तर त्यांना शिक्षा होण्याची किंवा छळ होण्याची भीती असते.
स्टॅलिनच्या सोव्हिएट युनियनमधल्या जोसेफ ब्रॉड्स्कीचे उदाहरण घ्या. ब्रॉड्स्कीला अटक होते आणि त्याची चौकशी करणारा अधिकारी त्याच्या तोंडासमोर कागद फडकवून विचारतो, "तू स्वतःला कवी समजतोस? तू याला कविता म्हणतोस? सोव्हिएट युनियनला कुठलेही ठोस योगदान देणारी नसेल, तर ती कविताच नव्हे." मग तो ब्रॉड्स्कीला तुरुंगात टाकतो. अनेक वर्षांनंतर जोसेफ ब्रॉड्स्कीला साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळते.
आणखी एक प्रसिद्ध रशियन प्रकरण आहे सोल्झेनित्सिन यांचे, ज्यांना सरकारवर टीका केल्यामुळे अनेक वर्षे सायबेरियात सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली गेली होती. त्यांनाही साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळाले. आणि आता कला आणि साहित्याबद्दलचे तेच अज्ञान इथे अवतरले आहे. लेखकांवर अज्ञानमूलक टीकेची आगपाखड आणि त्याहीपेक्षा भयंकर गोष्टी सोसण्याचे प्रसंग येत आहेत.
तीन प्रमुख बुद्धिप्रामाण्यवादी, नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे आणि एम. एम. कलबुर्गी यांना तर्कबुद्धीची कास धरून अंधश्रद्धांना नकार दिल्याबद्दल गोळ्या घालून ठार मारण्यात आले आणि बंगळुरूमध्ये स्वतंत्र विचार आणि हिंदुत्वाला विरोध असल्यामुळे गौरी लंकेशला ठार मारण्यात आले. आणखी काहींना ठार मारण्याच्या धमक्या देऊन लिहिण्यापासून परावृत्त करण्यात आले आहे. आपल्याला सांगितले जाते, 'तुमचे पुस्तक प्रकाशित करू नका, अन्यथा आम्ही ते जाळून टाकू. तुमची चित्रे प्रदर्शित करू नका, अन्यथा आम्ही तुमचे चित्रप्रदर्शन उध्वस्त करू.' चित्रपटकर्त्यांना सांगितले जाते, 'अमुक दृश्यामधले संवाद बदला आणि तमुक दृश्य काढून टाका, अन्यथा आम्ही तुमचा चित्रपट दाखवला जाऊ देणार नाही आणि तरीही तुम्ही तो प्रदर्शित केला, तर आम्ही सिनेमागृहाची तोडफोड करू. आमच्या भावना दुखावतील असे काही करू नका.' निराळ्या शब्दांत, 'आम्ही सांगू तसे करा अन्यथा तुमचे जीवन आणि तुमची कला सुरक्षित राहणार नाही.' पण सर्जनात्मक कल्पनाशक्ती सरकार किंवा जमावाकडून आदेश स्वीकारू शकत नाही.
आणि हे भावना दुखावणे वगैरे अर्थातच निव्वळ निरर्थक आहे. शंभर कोटी लोकांना एकाच पद्धतीने विचार करायला लावणे केवळ अशक्य आहे. प्रत्येक समाजगटाला विविध प्रश्नांवर त्याची स्वतंत्र मते असतात आणि त्याच्या स्वतंत्र संवेदना असतात. पण काय चूक आणि काय बरोबर हे भावनांवर ठरत नाही. काही बाबतीत तर भावनांना धक्का लावणे हे आपले कर्तव्यच असते.
भावना दुखावण्यावर जर बंदी असती, तर आपण आजही विधवा स्त्रियांना जाळत राहिलो असतो आणि कुठल्याही प्रकारची सुधारणा कधीच झाली नसती. संसदेमध्ये हिंदू कोड बिलावर चर्चा सुरू असताना अनेकांच्या भावना दुखावल्या होत्या आणि साधूंनी संसद भवनावर दगडफेक केली होती. पण जर ते विधेयक पास झाले नसते, तर हिंदू स्त्रियांना कुठलेही हक्क मिळाले नसते.
इतिहासाचं पुनर्लेखन हा हिंदुत्ववादी मनांचा उद्योग
आता भारताचा इतिहास सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्यात आल्यावर इतिहासकारांना त्याची धग जाणवू लागली आहे. काही राज्यांमध्ये इतिहासाच्या मोठ्या-मोठ्या भागांची तोडमोड तरी करण्यात आली आहे किंवा ते पूर्णपणे गाळूनच टाकण्यात आले आहेत. आणि हा सगळा खास इतिहासाचे पुनर्लेखन करण्याकरताच निवडलेल्या हिंदुत्ववादी मनांचा उद्योग आहे.
एखादा भारतीय इतिहास लेखक आणि इतिहासाचे पुनर्लेखन करणाऱ्या या लोकांपैकी एक, यांच्यामधल्या संभाषणाची कल्पना करायची झाली, तर तो काहीसा असा असेल - इतिहासकार पुनर्लेखकाला म्हणतो, 'अकबराने हल्दिघाटीची लढाई जिंकली. पण या पुस्तकात तुम्ही म्हणत आहात तो हरला. ते कसे काय?' यावर पुनर्लेखर उत्तर देतो, 'तो हरला, कारण मी ठरवले आहे तो हरला. आम्ही सांगू तोच खरा इतिहास.'
या पुनर्लिखित इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांपैकी काही पुस्तकांमध्ये संपूर्ण मुघल साम्राज्यच पुसून टाकले आहे आणि निव्वळ इतिहास पुसून समाधान न झाल्यामुळे, त्याचे संपूर्ण नामोनिशाणही उध्वस्त करणे चालले आहे. बाबरी मशीद पाडली गेली आणि गावे व रस्त्यांची मुघल व मुस्लिम नावे बदलली जात आहेत. काही पाठ्यपुस्तकांमध्ये, ज्यांच्या सरकारने आधुनिक भारताची पायाभरणी केली त्या नेहरूंच्या सर्व प्रकारच्या उल्लेखांना चाळणी लावण्यात आली आहे.
आणि महात्मा गांधींना तर काय, या प्रवृत्तींनी १९४८ मध्ये त्यांनी आपल्याला दिलेल्या 'ईश्वर अल्ला तेरो नाम, सब को सन्मति दे भगवान' या मंत्राबद्दल ईश्वरनिंदेचे कारण दाखवून ठारच मारले आहे. गांधीजींच्या अहिंसेकडे भारतीयांना नपुंसक करून भ्याड बनवण्याचे प्रतीक म्हणून पाहिले जाते आहे. व्यक्तिशः माझ्या मते निःशस्त्र भारतीयांनी एका साम्राज्याच्या शस्त्रबळाला जे आव्हान दिले, त्यापेक्षा महान शौर्यच नव्हे. लेस्सर ब्रीड्स ही माझी एक कादंबरी म्हणजे त्या अभूतपूर्व कालखंडाला माझी मानवंदना आहे.
अनेक गोष्टी पुसून टाकण्याबरोबरच आपण स्वातंत्र्यापासून जोपासलेले वैज्ञानिक मनही मारले जात आहे. त्याची जागा दंतकथा आणि पुराणकथा, तसेच मध्ययुगीन मानसिकता घेत आहेत.
सरकारी संस्थांची स्वायत्तता धोक्यात
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण उभ्या केलेल्या महत्त्वाच्या संस्थांचा आपल्याला रास्त अभिमान वाटत होता, पण त्यासुध्दा सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्यात आल्या आहेत. मग त्या कला आणि साहित्याशी संबंधित असोत, वा इतिहासाशी, वा तंत्रज्ञान, विज्ञान, माहिती, शिक्षण वा संस्कृतीशी संबंधित असोत. सार्वजनिक विद्यापीठे, संग्रहालये आणि अकादम्या आता स्वायत्त उरलेले नाहीत. दिल्लीतले नेहरू मेमेरियल म्युझियम आणि ग्रंथालय, हे आपल्या संस्था कशा बिघडवल्या जात आहेत, याचे अगदी सुरूवातीचे उदाहरण आहे. आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठ हिंदुत्ववाद्यांच्या द्वेषाचे नित्यनैमित्तिक लक्ष्य आहे. एक हिंदू आणि सनातन धर्म नावाच्या महान, ज्ञानप्रकाशी वारश्यावर श्रद्धा असलेली व्यक्ती म्हणून मी हिंदुत्व स्वीकारू शकत नाही.
विविधता, मतभेद आणि वादविवाद यांच्याविरूद्ध पुकारण्यात आलेल्या या युद्धामध्ये, ज्यांना स्वातंत्र्याची चाड आहे असे लोक गप्प बसलेले नाहीत. आपल्या मूलभूत हक्कांच्या पायमल्लीच्या विरोधात पदयात्रा आणि मेळावे घेतले जात आहे. सेवानिवृत्त सनदी अधिकारी, विद्यार्थी आणि शिक्षणक्षेत्रातले लोक, वकील, इतिहासकार आणि वैज्ञानिक, दलित आणि आदिवासी, आणि शेतकरी प्रचंड निषेध करत आहेत.
डॉ. आंबेडकरांचे नाव असलेली भीम आर्मी आपला आवाज बुलंद करते आहे. १९२० च्या दशकात आंबेडकर व ई. व्ही. रामस्वामी पेरियार यांनी, जातिव्यवस्थेमध्ये दलितांकरता अपमानास्पद आणि आक्षेपार्ह नियम घालण्याद्वारे त्यांना हीन लेखल्याबद्दल मनुस्मृतीची जाहीर होळी केल्याच्या नाट्यपूर्ण बंडखोर कृतीचा वारसा तिला लाभला असल्याची आठवण आपल्याला करून देते आहे.
आपला वैयक्तिक निषेध जोरकस रीतीने मांडणाऱ्या लोकांमध्ये गायक टी. एम. कृष्णा आणि इतिहासतज्ज्ञ रामचंद्र गुहा आहेत. कृष्णा यांचा कार्यक्रम रद्द करण्यात आला, तर गुहा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. नुकतेच, महान अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी इस्लामच्या विरोधातील युद्धाविरुद्ध वक्तव्य केले आणि त्यांच्या मुलांच्या संबंधात त्यांना कशी भीती वाटते हे सांगितले.
साहित्यिकांची भूमिका महत्त्वाची
आपण साहित्यिक अशा परिस्थितीमध्ये काय करू शकतो? या प्रश्नाचे उत्तर आहे - आपण लिहू शकतो. सशक्त काल्पनिक वाङमय त्याच्या लेखकांनी विवादामध्ये उडी घेऊन कुठली तरी बाजू उचलून धरण्यातून निर्माण होत आले आहे. पण त्यात वितंडवाद किंवा प्रचारकीपणा नव्हता. त्यांची नाटके, कविता आणि कादंबऱ्या लोकांबद्दल होत्या विचारांबद्दल नव्हे आणि या गोष्टी अशा लेखकांनी लिहिलेल्या आहेत जे त्यांच्या-त्यांच्या काळाशी अगदी समरस झालेले होते आणि आहेत.
लेखक हस्तिदंती मनोऱ्यामध्ये राहात नसतात. त्यांच्या लिखाणातून सुष्ट आणि दुष्ट, उचित आणि अनुचित यांच्या द्वंद्वामध्ये ते ठामपणे एक बाजू घेत असतात. जगभरातील अनेक देशांमधील लेखकांनी लिहिलेले महान साहित्य हेच कार्य करत आलेले आहे आणि हेच साहित्य पिढ्यानपिढ्या लोकांच्या हृदयाला स्पर्श करत आलेले आहे. तेच अजूनही जिवंत आहे. आपण कुठे उभे आहोत हे आपण निवडत असलेल्या विषयांमधून, आपण लिहित असलेल्या कथांमधून आणि आपण त्या ज्या पद्धतीने लिहितो त्यातून, आपण दाखवून देत असतो.
गेल्या वर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने बडोदेत साहित्य दिंडी काढण्यात आली.
आपण आपल्या आजीच्या स्वयंपाकाबद्दल लिहित असू वा छतावर पडणाऱ्या पावसाबद्दल वा आपल्या प्रिय व्यक्तीच्या शरीराचे वर्णन करत असू, आपण लिहित असलेला प्रत्येक शब्द आपण कुठे उभे आहोत हे स्पष्ट करतो. कुठल्याही सृजनात्मक कलाप्रकाराप्रमाणेच लेखन हादेखील राजकीय कृतीशीलतेचा एक सशक्त प्रकार आहे. आणि ते विद्रोहाचे एक साधन आहे. म्हणूनच हुकूमशहा त्याला भितात आणि त्याच्यावर अंकुश ठेवण्याकरता पावले उचलतात.
लेखकांचा निषेध तीन वर्षांपूर्वी पुरस्कार वापसी चळवळीच्या रूपात सुरू झाला. आम्ही सुमारे शंभर जणांनी, पुरस्कार विजेते लेखक डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या निषेधार्थ आमचे साहित्य अकादमी पुरस्कार परत केले. अकादमीने याची काहीही दखल घेतली नाही. पण दिल्लीजवळच्या दादरी गावातील एक गरीब लोहार मोहंमद अखलाक याची जमावाने हत्या केल्यानंतर आमची ही चळवळ वाढली आहे आणि लोकशाही व मानवी हक्कांवरील हल्ल्यांशी संबंधित अन्य घटनांपर्यंत तिची व्याप्ती वाढली आहे.
माझ्यावर आपली छाप सोडलेल्या परदेशी लेखकांच्या लेखनाविषयी मी उल्लेख केला, कारण मी त्यातले काही लेखन भाषांतराद्वारे वाचू शकले. आपल्या अनेकानेक भाषांमधल्या भारतीय लेखनाचे काय? भाषांतराच्या अभावी आपण एकमेकांना वाचू शकत नाही ही शोकांतिका आहे. आपले संगीत, आपली नाटके आणि आपले चित्रपट आपल्याला एकत्र आणत असले, तरी आपले साहित्य आपल्याला एकमेकांपासून दूरच ठेवते आणि जोवर आपण एकमेकांना वाचू शकत नाही, तोवर आपण एकमेकांना जाणून घेऊ शकत नाही. प्रकाशक मंडळी ही दरी दूर करतील आणि भारतीय भाषांमधले साहित्य आपल्यालाच नव्हे, तर संपूर्ण जगात उपलब्ध होईल, अशी मी फक्त आशा व्यक्त करू शकते.
मला विशेषतः मराठी स्त्री लेखिकांना सलाम करायला हवा, कारण स्त्रियांना आपले जीवनानुभव शब्दांमध्ये कागदावर उतरवण्याकरता कितीतरी भयंकर अडथळे पार करावे लागतात. आपला पती, आपले कुटुंब आणि समाजाला दुखावण्याचा धोका त्यांना पत्करावा लागत असतो. त्यांची सृजन उर्जा उत्तरोत्तर वृद्धिंगत होवो.
आपला देश एका दुविधेत सापडला आहे. आपण कुठला मार्ग निवडावा - स्वातंत्र्याकडे की स्वातंत्र्यापासून दूर - ही गोष्ट इतर अनेक गोष्टींबरोबरच आपण काय लिहितो यावर आणि आपल्याला गप्प राहण्यास भाग पाडणाऱ्यांपुढे मान तुकवण्याचे नाकारण्यावर अवलंबून असेल. ज्यांच्या हत्या झाल्या आहेत त्यांचे स्मरण करून, वेगळे मत मांडण्याच्या हक्काकरता उभे राहणाऱ्यांना पाठिंबा देऊन आणि भय व अनिश्चिततेच्या छायेत जगणाऱ्या, पण तरीही आपले मत व्यक्त करणाऱ्या, विरोधी मत असलेल्या सर्वांकरता, आपण स्वातंत्र्याचा मार्ग निवडूया.
संबंधित बातम्या :
नयनतारा सहगल यांच्या अपमानाचे साहित्य विश्वात पडसाद
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement