यवतमाळ : नैसर्गिक रत्न म्हणजे मोती आणि याच रत्नाची शेती यवतमाळ जिल्ह्यातील एका महिला बचतगटाने सुरू केली आहे. आर्णी तालुक्यातील लोणी या गावाच्या जय दुर्गा माता महिला बचत गटातील 12 महिलांनी मिळून हा उपक्रम सुरु केला आहे. 'आम्ही साऱ्या करतोय मोती शेती' असं म्हणत एकमेकींच्या साहाय्याने मोत्यांचे संवर्धन सुरू केले आहे. अगदी लहान मुलांप्रमाणे महिला या शिंपल्याची काळजी घेत आहेत. मानव विकास मिशन आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या माध्यमातून ही मोती संवर्धन शेती साधारणपणे 8 महिन्यापूर्वी सुरु झाली असून पुढील सहा महिन्यांनी हे मोती काढायला येतील ..


दुर्गा माता बचत गटातील एका सदस्यांच्या शेतात मुबलक पाणी आहे. तिथे 12 फूट रूंद आणि 15 फूट लांब आणि 4 फूट खोल असे 2 खड्डे तयार करण्यात आले आहेत. त्यात नॉयलॉन दोरीच्या साहाय्याने शिंपल्याना एका जाळीच्या पिशवीत ठेवून पाण्यात लोंबत सोडण्यात आले. तिथे असलेल्या शिंपल्याना समुद्रासारखे वातावरण लाभावे म्हणून महिला दिवसातून तीन वेळा खड्ड्यात मशीनद्वारे पाणी देतात. तसेच या ठिकाणी असलेले शेवाळ आणि मृत शिंपले सुद्धा वेळोवेळी बाजूला काढतात. त्यांना वेळोवेळी अन्न देतात शिवाय नियमित शिंपल्याची तपासणी सुद्धा करतात. या संपूर्ण जागेची निगा या सर्व महिला राखतात. अशा पद्धतीने आळीपाळीने सर्व महिला या मोती शेतीमध्ये झोकून देऊन कार्य करत आहेत.


International Womens Day 2021 | का साजरा केला जातो महिला दिन, जाणून घ्या यामागची कारणं



Women's Day 2021 Gifts Idea: महिला दिनी आपल्या आई, बहिण आणि मैत्रीणीला 'ही' विशेष भेट द्या


सध्या या दोन्ही खड्यात 2500 शिंपले असून एका शिंपल्यात दोन मोती त्याप्रमाणे 5000 मोती मिळतील. त्यात जरी काही शिंपले मृत पावले तरी 4000 शिंपले जिवंत राहतील अशी अपेक्षा आहे. शेतीला नवीन जोड व्यवसाय या दृष्टीने महिला याकडे एक ध्यास म्हणून पाहत आहेत. येथून निघणाऱ्या प्रत्येक मोत्याला 300 ते 900 असा भाव मिळण्याची शक्यता आहे. असा करार महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या माध्यमातून नागपूर येथील सुरजी ट्रेडिंग कंपनीने करार केला आहे. त्यामुळे या महिलांना मोत्याच्या विक्रीची जबाबदारी नाही. जेव्हा उत्पादन मिळेल तेव्हा महिला बचत गट आणि माविम असा त्यात समान वाटा राहणार आहे, असेही माविमच्या प्रकल्प अधिकारी यांनी सांगितले आहे.


शिंपले बीज आणि खाद्य प्रशिक्षण कंपनीने महिलांना उपलब्ध करून दिले आहे. आता महिला मोती शेतीसाठी मेहनत करत असून मोती संवर्धनच्या माध्यमातून महिलांची आर्थिक उन्नतीसाठी हा प्रकल्प महत्वाची भूमिका पार पाडणार आहे.