International Womens Day 2021 महिला दिन साजरा करण्यासाठी कोणा एका दिवसाची आवश्यकता नाही. कारण, दरदिवशी महिलांचं महत्त्वं हे कायम तितकंच असतं. पण, हे जग एक उत्तम स्थान बनवण्यासाठी महिलांचं योगदान पाहता याच योगदानाप्रतीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जागतिक स्तरावर 8 मार्च हा दिवस महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो.


प्रत्येकाच्याच जीवनात असणाऱ्या महिलांच्या योगदानाला आणि स्त्रीत्वाला साजरा करण्याच्या अनुशंगानं या दिवसाचं महत्त्वं अधिक आहे. स्त्रीशक्ती आणि त्यांच्या कर्तृत्त्वाची प्रशंसा या दिवशी आवर्जून केली जाते.


Women's Day 2021 Gifts Idea: महिला दिनी आपल्या आई, बहिण आणि मैत्रीणीला 'ही' विशेष भेट द्या


महिलांनाही समाजात समान हक्क मिळावेत यासाठी झालेल्या संघर्षालाही या दिवशी सलाम करण्यात येतो. जगभरात या दिवसाच्या निमित्तानं बहुविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. पण, यंदा मात्र इतर सर्वच कार्यक्रमांप्रमाणं महिला दिनावरही कोरोनाचं सावट असणार आहे.


काय आहे महिला दिनाचा इतिहास?


International Women's Day (IWD) जागतिक महिला दिन हा 1900 च्या काळापासून प्रकाशझोतात आला. ज्यावेळी महिलांच्या सामाजिक अस्तित्त्वाबाबत बदलांचे वारे वाहू लागले होते. 1908 मध्ये 15000 महिलांनी कामाचे कमी तास, चांगलं वेतन आणि मतदानाच्या हक्कांसाठी न्यू यॉर्क शहराच्या दिशेनं कूच केली होती. ही पहिली महिला चळवळ ठरली. काही महिन्यांच्या आंदोलनानंतर पहिला राष्ट्रीय महिला दिवस युनायटेड स्टेट्स येथे 28 फेब्रुवारी या दिवशी पाळला गेला.


PICS | लग्नसराईमध्ये फॉलो करा जान्हवी कपूरचे 'हे' ट्रेंडी लूक


International Women’s Day 2021 ची थीम


कोविड 19 नं लढणाऱ्या विश्वात महिला नेतृत्त्वाला अधोरेखित करण्याचा यंदाच्या जागतिक महिला दिनाचा मुख्य हेतू असणार आहे. कोरोनाच्या संकटांतून सावरणाऱ्या कित्येक राष्ट्रांमध्ये महिलांच्या निर्णय़ांचीही महत्त्वाची भूमिका असून, यामध्ये त्यांचा मोलाचा हातभार लागणार असल्याची बाब यंदाच्या महिला दिनाच्या निमित्तानं जगापुढं मांडली जाणार आहे.


महिला दिनी ठराविक रंगांचं महत्त्वं


महिला दिनाच्या दिवशी काही महत्त्वाच्या रंगांनाही विशेष प्राधान्य दिलं जातं. यामध्ये जांभळा, हिरवा आणि पांढरा अशा रंगांचा समावेश आहे. जांभळा रंग न्याय आणि प्रतिष्ठा अधोरेखित करतो, हिरवा रंग आशेसाठी तर पांढरा रंग शुद्धतेच्या प्रतीकासाठी वापरात आणला जातो.