Womens Day 2022 : एखाद्या गावाचा गाडा हाकायचा म्हटलं तर ती जबाबदारी खास पुरुषांकडे सोपवली जाते. मग ते सरपंच असो किंवा उपसरपंच, ग्रामसेवक असो वा तलाठी, कृषीसहाय्यक असो अथवा पोलीस पाटील अशी सर्व महत्वाची आणि जबाबदारीची पदं पुरुषांकडे सोपवली जातात. पण महाराष्ट्रात एक गाव असंही आहे जिथे ही सगळी पदं महिलांकडे आहेत. विशेष म्हणजे, ह्या सगळ्या महिला घर सांभाळून गावाचा गाडाही उत्तमरित्या सांभाळत आहे. अमरावती जिल्ह्यातील नया अकोला असं या गावाचं नाव असून या गावात खऱ्या अर्थाने महिला राज पाहायला मिळत आहे.
संपूर्ण जगभरात भारतीय संस्कृती परंपरा, अध्यात्म्य आणि भौगोलिक विविधतेमुळे ओळखला जातो. भारतात महिलांना आदिशक्तीचे रूप मानून पुरातन काळापासून पूजनीय मानले गेले आहे. त्याचवेळी याच भारत देशात महिला घरात आणि समाजात बंधनामध्ये अडकून पडल्या आहेत. त्यांना दुय्यम स्थान दिले जाते. त्यांचे अधिकार आणि विकास यापासून त्यांना पूर्णपणे दूर केले जाते. तरीसुद्धा येथे स्त्री-पुरुष समानतेच्या गोष्टी बोलल्या जातात. मात्र, नया अकोला हे गाव याला अपवाद आहे. याच गावाला स्मार्ट गाव करण्यासाठी या गावात सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी, कृषीसहाय्यक, पोलीस पाटील आणि मुख्याध्यापिका या सगळ्या प्रमुख पदावर असलेल्या महिला सरसावल्या आहेत. आपल्या घरचा गाडा चालवून संपूर्ण गावाचा गाडा ह्या महिला उत्तमरीत्या सांभाळत आहेत. राज्यातलं हे एकमेव गाव आहे ज्याठिकाणी सर्व महिला प्रमुख पदावर आहेत.
महिला चूल मूलंच सांभाळू शकत नाही तर आपलं घर, गाव, जिल्हा, राज्य, आणि देशही सक्षमपणे सांभाळू शकतात हेच नया अकोला येथील या रणरागिणींनी दाखवून दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Womens Day 2022 : ITBP च्या महिला जवान सीमा सुरक्षेच्या तैनात, पाहा महिलांच्या शौर्याचा 'हा' खास व्हिडीओ
- Women's Day 2022 : महिला सक्षमीकरणाचे ताजे उदाहरण म्हणजे 'अहिल्या गॅंग', जाणून घ्या त्यांच्या कार्याविषयी...
- Women's Day 2022 : जागतिक महिला दिनाचा इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha