- अर्ध्या देशात गोठवणारी थंडी, दिल्लीसह सहा राज्यांमध्ये रेड अलर्ट जारी
- उत्तर भारतातील थंडीची लाट कायम, दिल्लीकरांना काहीसा दिलासा
राज्यात तापमानाचा पारा घसरला, नाशिक-मुंबईकरांना हुडहुडी, निफाडचे तपमान 2.4 अंशावर
एबीपी माझा वेबटीम | 17 Jan 2020 08:29 AM (IST)
मुंबईकरांना हवीहवी वाटणाऱ्या थंडीची चाहूल लागली असून तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे.
मुंबई : नव्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच मुंबईसह महाराष्ट्रातील किमान तापमानात घट नोंदविण्यात येत असल्याने राज्यातल्या जनतेला चांगलीच हुडहुडी भरली आहे. राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद नाशिकच्या निफाडमध्ये झाली आहे. निफाडमध्ये तापमानाचा पारा 2.4 अंश इतका खाली घसरला आहे. यंदाच्या मोसमातील ही सर्वात निचांकी तापमानाची नोंद आहे. काल निफाडमध्ये तापमान 9.4 अंश सेल्सिअस इतकं होतं. आज तापमानाचा पारा सात अंशानी घसरला आहे. मुंबईकरही गुलाबी थंडीचा अनुभव घेत आहेत. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईचे किमान तापमान 15 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले होते. आज मुंबईचं तापमान 12.3 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं आहे. सध्या किमान तापमानात होत असलेल्या घसरणीमुळे सकाळी आणि सायंकाळी मुंबई शहर आणि उपनगरात गार वारे वाहत असून, मुंबईकरांना थंडी अनुभवता येत आहे. भारतीय हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अशा प्रकारची थंडी मुंबईकरांना अजून दोन दिवस अनुभवता येणार आहे. हिवाळा सुरू होऊनही मुंबईत मात्र त्याचा परिणाम जाणवत नव्हता. अखेर आता मुंबईत हळूहळू गारठा निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र गारठला मुंबईत थंडीची चाहूल सुरू झाली असताना राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मात्र याआधीच थंडी सुरू झाली आहे. मध्य महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी पारा 15 अंशांच्या खाली उतरला आहे. विदर्भात अनेक ठिकाणी किमान तापमान 14 ते 16 अंशांच्या आसपास आहे. हे तापमान सरासरी किमान तापमानापेक्षा कमी असल्याची नोंद अकोला, अमरावती, बुलडाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ येथे झाली. काही दिवसांपूर्वी राज्यात पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने तापमानाचा पारा जास्तच खाली घसरला आहे. रब्बी पिकांसाठी ही थंडी फायदेशीर मानली जाते. त्यामुळे अवकाळी पावसामुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्याला यामुळे थोडा दिलासा मिळाला आहे. राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 10 अंश सेल्सिअच्या खाली गेला आहे. निफाडपाठोपाठ धुळ्यात सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. धुळ्यात काल 5.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. उत्तरेकडून थंड वारे वाहत असल्यानं थंडीच्या प्रमाणात वाढ झाल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. नाशिकमध्ये 10 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. कोकणात निसर्गाचा लहरीपणा; आंबा, काजू महागणार कोकणात सध्या निसर्गाचा लहरीपणा पाहायाला मिळतोय. वातावरण बदलाचा कोकणातील आंबा आणि काजूच्या उत्पादनावर मोठा परिणाम होत आहे. दरवर्षी हापूस आंबा आणि काजूला डिसेंबरमध्ये मोहोर आल्यानंतर फळ यायला सुरूवात होते. परंतु यंदा मात्र फळ आलेली नाहीत. फळं उशिरा आणि दरवर्षीच्या तुलनेत कमी प्रमाणात लागणार असल्याने हापूस आंब्याच्या दरातदेखील वाढ होणार आहे. वातावरणात होत असलेल्या बदलामुळे औषधफवारणीचा खर्च देखील 10 ते 15 टक्के वाढला आहे. संबंधित बातम्या