नवी दिल्ली : उत्तर भारतात तापमानाचा पारा घसरतच चालला आहे. हाडं गोठवणाऱ्या थंडीचा अनुभव सध्या उत्तर भारतातील लोक घेत आहेत. काल दिल्लीतील तापमानाने 119 वर्षांचा रेकॉर्ड मोडला. 1901 नंतर पहिल्यांदा दिल्लीचं कमाल तापमान 9 अंश सेल्सिअसच्या खाली होतं. थंडी आणि दाट धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.
थंडी आणि धुक्यामुळे रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक तसेच विमान सेवेवरही परिणाम झाला आहे. या मार्गावरुन धावणाऱ्या रेल्वे गाड्या उशीराने धावत आहेत. दिल्ली विमानतळावरील व्हिजिबिलीटी 1200 मीटर आहे. आज दिल्लीतील तापमानात काही अंशी घट झाली आहे. तसेच धुक्याचं प्रमाणही कमी आहे. आज सकाळी दिल्लीत 5.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे दिल्लीकरांना काहीस दिलासा मिळाला आहे.
गेल्या 24 तासात दिल्ली आणि गंगा मैदान परिसरात दाट धुकं पसरलेलं पाहायला मिळालं. पंजाब, हरियाणा, उत्तर राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमधील काही भागात कडाक्याची थंडी आहे. मध्य प्रदेशमधील काही भागात पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. पुढील काही दिवस पंजाब, हरियाणा, उत्तर राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश परिसरात थंडी कायम राहण्याचा अंदाजही हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे.
येत्या काही दिवसात दिलासा मिळण्याची शक्यता
या आठवड्यात वाऱ्याची दिशा बदल्यास हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिल्लीकरांसह उत्तर भारतातील नागरिकांना थंडीपासून थोडासा दिलासा मिळू शकतो. थंडी आणि दाट धुक्यामुळे हवामान विभागाने 29 डिसेंबरपर्यंत दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशात ऑरेंज अलर्ट जारी केला होता. शिमला, जम्मू-काश्मीर परिसरात बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे पर्यटकांनी तेथे गर्दी पाहायला मिळत आहे.