महाराष्ट्रातील लेकीसुनांच्या सुरक्षेबाबत मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार का? केशव उपाध्ये यांचा सवाल
हाथरस येथील घटनेविरोधात आंदोलन करण्याचा अधिकार महाविकास आघाडीला आहे. परंतु त्या अगोदर सरकारने गेल्या सहा महिन्यांत महाराष्ट्रात महिलांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराविरोधात काय केले आहे, हे ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विचारण्याचे धाडस दाखवावे.
मुंबई : महाराष्ट्रात हाथरस प्रकरणाच्या निमित्ताने काँग्रेस पक्ष आंदोलन करतोय तर शिवसेनेने आंदोलन केले आहे. सुप्रिया पवार सुळे यांनीही प्रतिक्रीया व्यक्त केली. युपी सरकारवर टीका करण्याचे अधिकार जरूर आहेत पण महाराष्ट्रातील लेकीसुनांच्या सुरक्षिततेसाठी मुख्यमंत्र्याच्या समोर कधी प्रश्न उपस्थित करणार ? गेल्या सहा महिन्यांत महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांचे काय ? असा प्रश्न भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उपस्थित केला आहे.
हाथरस प्रकरण दुर्दैवीच आहे आणि त्याची दखल घेत तेथील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांवर कारवाई करत प्रकरण सीबीआयकडे दिले पण इथे गेल्या सहा महिन्यांत ज्या घटना घडल्या त्यांवर किती कारवाई झाली? इतर ठिकाणची उठाठेव जरूर करा पण आपल्या अंगणात काय सुरू आहे हे कधी पहाणार? असेही उपाध्ये पुढे म्हणाले.
प्रसिद्धीपत्रकात उपाध्ये यांनी म्हटले आहे की, हाथरस येथील घटनेविरोधात आंदोलन करण्याचा काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनाला अधिकार आहे. मात्र त्याच बरोबर हे तिन्ही पक्ष महाराष्ट्रातील सरकारमध्ये सहभागी आहेत, त्या सरकारने गेल्या सहा महिन्यांत महाराष्ट्रात महिला, तरुणी, अल्पवयीन मुली, बालिकांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराविरोधात काय केले आहे, हे ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विचारण्याचे धाडस दाखवावे. महाराष्ट्रात कोरोनावर उपचारासाठी दाखल झालेल्या महिला रूग्णांवर बलात्कार, विनयभंगासारख्या संतापजनक घटना घडलेल्या आहेत. पनवेल, पुणे, इचलकरंजी, नंदुरबार, चंद्रपूर येथे विलगीकरण केंद्रात महिला, तरुणींवर अत्याचार , विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत.
अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथे शासकीय लॅबमधील टेक्निशियनने कोरोना चाचणीच्या नावाखाली युवतीच्या गुप्तांगाचा स्वॅब घेतल्याची घटना घडली आहे. फेब्रुवारीमध्ये मध्ये 7 वेगवेगळ्या घटनांमध्ये महिलांना जिवंत जाळले गेले. हिंगणघाट, सिल्लोड, पनवेल, मिरारोड, लातूर, नागपूर, लासलगाव या ठिकाणी या घटना घडल्या. यातील चौघींना जीवाला मुकावे लागले. या घटनांचे गांभीर्य बाळासाहेब थोरात किंवा त्यांच्या काँग्रेस तसेच राष्ट्रवादी व शिवसेनाला समजलेले नाही, असे म्हणायचे कां ? असेही उपाध्ये यांनी पत्रकात नमूद केले आहे.