Ashadhi Ekadashi : एकादशी दुप्पट खाशी असं म्हटलं जात असलं तरी विठूरायावर असलेल्या श्रद्धेपोटी आषाढी एकादशीचा (Ashadhi Ekadashi) उपवास आपल्याकडे आवर्जून केला जातो. इतकंच नाही तर रोज चपाती-भाजी खाऊन कंटाळा येतो आणि उपवासानिमित्त वेगळे पदार्थ खायला मिळतील, म्हणून हा उपवास करणारेही अनेक जण आहेत. पण उपवासाचे पदार्थ काही प्रमाणात वातूळ असल्याने ते प्रत्येकाला पचतातच असं नाही. काही जण भक्तीपोटी निर्जल किंवा फलाहार करुन कडक उपवास करतात. पण हा उपवास सोडतात कधी? तर, हा उपवास आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजेच द्वादशीला सोडतात. 


एकादशीला उपवास करण्याचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत, त्याला स्मार्त आणि भागवत असं म्हटलं जातं. बहुतांशी वारकरी मंडळी भागवत पद्धती मानतात, तर स्मृतींना मानणारे स्मार्त एकादशीचे व्रत करतात. वारकऱ्यांमध्ये आषाढी आणि कार्तिकी एकादशीचं फार महत्त्व आहे, या दोन्ही दिवशी पंढरपूरला वारकऱ्यांची गर्दी होते. एकादशीच्या दिवशी विठुरायाचं आणि रुक्मिणी मातेचं दर्शन घेणं फार पुण्याचं मानलं जाते. त्यामुळे आषाढीला लाखो वारकरी उपवास करुन देवाचं दर्शन घेतात.


एकादशीचा उपवास का करतात?


एकादशीचं व्रत का करावं यासाठी काही कथा सांगितल्या जातात, त्यातील देव आणि दानव यांच्यातील युद्धाची कथा प्रमुख आहे. कुंभ नावाच्या राक्षसाचा मुलगा मृदुमान्य याने तप करुन शंकराकडून अमरपद मिळवलं आणि त्यामुळे तो ब्रह्मदेव, विष्णु, शिव अशा सर्व देवांपेक्षा ताकदवान झाला. त्याच्या भयाने सर्व देव त्रिकूट पर्वतावर एका गुहेत लपून बसले आणि त्या दिवशी एकादशी होती, त्यांनी या आषाढी एकादशीचा उपवास केला आणि या उपवासामुळे त्यांना शक्ती मिळाली. त्यानंतर सर्व देवांनी गुहेच्या दाराजवळ बसलेल्या मृदुमान्य राक्षसाला ठार मारलं, ही शक्ती म्हणजेच एकादशी असं सांगण्यात येतं. एकूण एकादशी व्रतामागे अनेक कथा असल्या तरी त्यामागचा उद्देश हा सर्वांचं कल्याण असाच आहे. एकादशीचे व्रत न करणाऱ्याची अधोगती होते, अशी भावना वारकरी सांप्रदायात आहे.


एकादशीचा उपवास द्वादशीला का सोडतात?


एकादशीचा उपवास बहुतांशी दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला सोडला जातो. परंतु द्वादशीच्या सूर्योदयानंतर द्वादशीचा चौथा भाग (तिथीनुसार) येत असेल तर त्या काळात उपवास सोडू नये, असं शास्त्रात सांगितलं जातं. हा तिथीवासराचा काळ संपल्यानंतरच उपवास सोडतात. हा काळ पंचांगात दिलेला असतो.


द्वादशीला वारकरी संप्रदायात खूप मोठं महत्व असतं, याच दिवशी भगवंत प्रकट झाल्याची मान्यता असून बार्शी येथील भगवंत मंदिरात शेकडो वर्षांपासून भगवंत प्रकट उत्सव साजरा होत असतो. एकादशीचा उपवास केल्यानंतर वारकरी द्वादशीच्या परण्याला म्हणजे उपवास सोडायला बार्शी येथील भगवंताच्या दर्शनाला जातात आणि उपवास सोडतात. वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ परंपरा असणारे बोधले घराणे गेल्या 11 पिढ्यांपासून भगवंत मंदिरात द्वादशीचा प्रकट कीर्तन सोहळा पहाटे चार ते सहा या वेळेत करतात. 


याचीही एक रंजक कथा धर्मशास्त्रात सांगण्यात आली आहे. अंबरीश ऋषी हे एकादशीचे निर्जल व्रत करत असे. संपूर्ण दिवस पाण्याचा थेंबही न घेता द्वादशीला सूर्योदयाला भोजन करुन उपवास ते सोडत असत. एकदा द्वादशीला दुर्वास ऋषी हे अंबरीश ऋषींच्या आश्रमात आल्यावर दुर्वास ऋषींना त्यांनी द्वादशीच्या भोजनास थांबण्याची विनंती केली. दुर्वास ऋषींनी याला मान्यता देऊन ते नदीवर गेले, मात्र सूर्यास्त होऊ लागला तरीही ते परत न आल्याने अंबरीश ऋषींसमोर यक्ष प्रश्न उभा राहिला. अखेर त्यांनी द्वादशी संपण्यापूर्वी थेंबभर जलाचे प्राशन करुन उपवास सोडला आणि यजमानाच्या पूर्वी भोजन न घेता त्यांचाही मान ठेवला. मात्र दुर्वास ऋषींना ही गोष्ट समजल्यावर त्यांनी अंबरीश ऋषींना 10 जन्म घ्यावे लागतील असा शाप दिला. यानंतर भगवंतांनी आपल्या भक्ताला दिलेला शाप स्वतःवर घेतला आणि दहा अवतार घेतल्याची मान्यताही वारकरी संप्रदायात आहे. यामुळेच वारकरी संप्रदायात एकादशीला अनन्यसाधारण महत्व असून हे व्रत प्रत्येक वारकरी मनोभावे करत असतो. एकादशीला उपवास करुन दुसऱ्या दिवशी द्वादशीला उपवास सोडला जातो.


हेही वाचा:


Ashadhi Ekadashi 2023: आषाढी एकादशीला नक्की ट्राय करा उपवासाची 'ही' रेसिपी; लहानांपासून मोठे खातील आवडीने