Ashadhi Ekadashi Upvas Recipes In Marathi: महाराष्ट्रात विठुरायाचे भक्त आपल्या भक्तिपोटी आषाढी एकादशीला (Ashadhi Ekadashi 2023) उपवास करतात. महाराष्ट्रातील प्रत्येक जण आषाढी एकादशीला उपवास ठेवून उपवासाचे पदार्थ खात असतो. यावेळी काय खास उपवासाचा पदार्थ बनवायचा हा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक खास रेसिपी घेऊन आलो आहोत.
आषाढीसाठी पंढरपुरात जाता आलं नाही तरी सर्व जण घरात राहून विठू माऊलीकडे प्रार्थना करतात. या दिवशी सर्वजण उपवास पकडतात, तुम्हीही घरच्या घरी उपवासाचे पदार्थ बनवून एकादशीचे व्रत पाळू शकता. उपवास म्हटलं की काहीजण फक्त फळं खातात आणि दूध पितात. परंतु उपवासाच्या दिवशी तुम्ही घरच्या घरी काही रुचकर उपवासाचे पदार्थ बनवू शकता. तर आज उपवासासाठीचा भगरीचा डोसा कसा बनवायचा याची रेसिपी आपण पाहणार आहोत. डोसा हा सर्वांनाच आवडतो, पण उपवासाचा डोसा तुम्ही कधी ट्राय केला नसेल. भगरीपासून बनणारा डोसा हा उपवासाला शरीराला ऊर्जा देणारा असतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा डोसा फार आवडेल. तर पाहूया त्यासाठीचे साहित्य आणि कृती...
भगरीचा डोसा बनवण्याचे साहित्य
- भगर - 2 वाट्या
- साबुदाणा - 1 वाटी
- मध्यम आकाराचे बटाटे - 2
- भाजलेल्या शेंगदाण्यांचा बारीक कूट - 2 चमचे
- हिरव्या मिरच्या - 2
- मीठ - आवश्यकतेनुसार
- साखर - अर्धा चमचा
- साजूक तूप - 1 छोटी वाटी
- दही - 1 वाटी
भगरीचा डोसा बनवण्याची कृती
- उपवासाचा डोसा करण्यासाठी प्रथम साबुदाणे भिजवून घ्यावेत, त्यात थोडसं पाणी ठेवून ते तीन ते चार तास भिजवून ठेवावे.
- भगरही धुवून ती अर्धा तास भिजत घालावी.
- यानंतर मिक्सरच्या भांड्यात भिजलेली भगर आणि साबुदाणा टाकून बारीक करुन घ्या.
- मिक्सरमध्ये मिश्रण वाटताना थोडं दही देखील टाकून मिश्रण बारीक करुन घ्या.
- मिश्रण खूपच घट्ट वाटल्यास थोडं पाणी घालावं.
- मिश्रण खूप घट्ट असू नये.
- यानंतर मिश्रणात चवीनुसार मीठ घालावं.
- तुम्ही तुमच्या इच्छेनुसार मिश्रणात थोडी साखर देखील टाकू शकता.
- यानंतर डोसा तवा तापत ठेवा.
- तवा तापला की मग त्यावर थोडे तेल शिंपडून ते ओल्या फडक्याने सर्व बाजूला पसरवा.
- मग डोसा पीठ त्यावर टाकून मस्त कुरकुरीत डोसा बनवा.
- यासाठी गरम तव्यावर साबुदाणा भगरीचं दोन चमचे मिश्रण घालून ते भराभर गोलाकार पसरुन घ्यावं.
- डोसा दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत खरपूस भाजावा.
- डोसा भाजताना थोड्या तेलाचा वापर करावा.
- या डोशासोबत शेंगदाण्याची चटणी बनवावी.
- शेगदाण्याची चटणी बनवण्यासाठी शेंगदाणे, दही आणि 2 मिरच्या मिक्सरमध्ये वाटून घ्या.
- कढईत तेल टाकून त्यात हे बारीक केलेलं मिश्रण परतून घ्या.
- उकडलेल्या बटाट्यांपासून तुम्ही उपवासासाठीची बटाट्याची भाजी देखील तुम्ही बनवू शकता.
- भगरीचा डोसा शेंगदाण्याची चटणी आणि बटाट्याच्या भाजीसोबत सर्व्ह करा.
हेही वाचा