Agriculture News : सध्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसानं (Rain) हजेरी लावली आहे. काही भागात जोरदार पाऊस सुरु आहे. तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. या पावसामुळं राज्यातील शेतकऱ्यांमध्ये (Farmers) आनंदाचे वातावरण आहे. राज्यात पावसाला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणी (Sowing) कधी करावी? पेरणीसाठी योग्य पाऊस झाला आहे का? याबाबत एबीपी माझाने (ABP Majha) काही कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी संपर्क साधला. यावेळी त्यांनी सविस्तर माहिती दिली.
जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच शेतकरी पावसाची वाट बघत होते. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिकासाठी पाण्याची गरज होती. तर काही ठिकाणी पावसाअभावी शेतकऱ्यांची शेतीकामं खोळंबली होती. मात्र, यावर्षी राज्यात दरवर्षीपेक्षा उशीरा मान्सून दाखल झाला. पावसानंतर शेती कामांना वेग येत असल्याचं चित्र दिसत आहे. मात्र, पेरणीसाठी किती पावसाची आवश्यकता आहे, यासंदर्भात कृषी विद्यापीठातील कृषी तज्ज्ञांनी माहिती दिलीय.
पेरणीसाठी 75 ते 100 मिलीमीटर पावसाची आवश्यकता : कृषी तज्ज्ञ डॉ. अरविंद तुपे
याबाबत एबीपी माझाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोल्यातील कृषी तज्ज्ञ डॉ. अरविंद तुपे म्हणाले की, सध्या राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. पण शेतकऱ्यांना पेरणीची घाई करु नये. जोपर्यंत पेरणीयोग्य पाऊस पडत नाही तोपर्यंत पेरणी करु नये. पेरणीसाठी 75 ते 100 मिलीमीटर पावसाची आवश्यकता असते. त्यामुळं शेतकऱ्यांनी 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नये असा सल्ला कृषी तज्ज्ञ डॉ. अरविंद तुपे यांनी दिला आहे. शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी केली आहे. विदर्भात मोठ्या प्रमाणात कापूस आणि सोयाबीनची लागवड केली जाते. 15 जुलैपर्यंत शेतकरी सोयाबीनची लागवड करु शकतात असेही तुपे म्हणाले.
जमिनीत योग्य प्रकारे ओलावा निर्माण होणं गरजेचं : मृदा शास्त्रज्ञ डॉ. आदिनाथ ताकटे
सध्या राज्यातील अनेक भागात पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. त्यामुळं शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये असा सल्ला राहुरी कृषी विद्यापीठाचे मृदा शास्त्रज्ञ डॉ. आदिनाथ ताकटे यांनी दिला आहे. जमीनी खूप तापल्या आहेत. त्यामुळं पेरणीसाठी जमिनीत योग्य प्रकारे ओलावा निर्माण होणं गरजेचं आहे. पेरणीसाठी 75 ते 100 मिलीमिटर पावसाची गरज आहे. 100 मिलीमिटर पाऊस झाल्यावरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी असा सल्ला डॉ. अदिनाथ ताकटे यांनी दिला आहे. याचबरोबर शेतकऱ्यांनी योग्य वेळी, योग्य प्रमाणात, योग्य खतांचा वापर करावा असेही ताकटे म्हणाले.
मूग आणि उडीदाचे उत्पादन घटण्याची शक्यता
राज्यात यावर्षी पावसाला उशीरा सुरुवात झाली आहे. याचा परिणाम मूग आणि उडीद पिकावर होण्याची शक्यता आहे. पेरण्या उशीरा झाल्यास उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे डॉ. आदिनाथ ताकटे म्हणाले. कारण दरवर्षी शेतकरी साधारणत: 15 ते 30 जूनपर्यंत उडीद आणि मुगाची पेरणी करत असतात. मात्र, यावर्षी उशीरा पाऊस दाखल झाल्यानं अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या नाहीत. त्यामुळं मूग आणि उडदाचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाणी आहे अशा शेतकऱ्यांनी कापसाची लागवड करायला हरकत नसल्याचे मत डॉ. आदिनाथ ताकटे यांनी व्यक्त केले.
सात जुलैपर्यंत राज्यात चांगला पाऊस होईल: कृषी अभ्यासक उदय देवळाणकर
राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. काही भागात चांगला पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी अद्याप चांगला पाऊस झाला नाही. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला असल्याची माहिती कृषी आणि हवामानाचे अभ्यासक उदय देवळाणकर यांनी दिली. शेतकऱ्यांनी 70 ते 80 मिलीमिटर पावसाची नोंद झाल्याशिवाय पेरणी करुन नये असा सल्ला देवळाणकर यांनी दिला आहे. यावर्षी विदर्भासह कोकणात पावसाचे प्रमाण चांगले राहील. सात जुलैपर्यंत राज्यात चांगला पाऊस होईल असे उदय देवळाणकर म्हणाले.
शेतकऱ्यांना योग्य प्रकारे पिकांची निवड करावी, चाऱ्याची व्यवस्थाही करावी
यंदा एल निनोचे वर्ष आहे. त्यामुळं काही प्रमाणात पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता नातकारता येत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांना योग्य प्रकारे पिकांची निवड करावी असा सल्ला देवळाणकर यांनी दिला. जास्त पाणी लागणारी पिकं शेतकऱ्यांनी घेऊ नेयेत. तसेच जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था शेतकऱ्यांनी आधी करावी असा सल्लाही देवळाणकर यांनी दिला.
महत्त्वाच्या बातम्या:
Monsoon News : मान्सून संदर्भातील बातम्यांसाठी IMD चे अंदाज अधिक विश्वासार्ह, पाहा काय म्हणतायेत तज्ज्ञ