PM Modi : महाराष्ट्रासह इतर राज्यांतून सुमारे नऊ लाखांहून अधिक वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात (Pandharpur Wari) दाखल झाले आहेत. अवघा महाराष्ट्र (Maharashtra) आज विठ्ठलाच्या भक्तीत न्हाऊन निघाला आहे. राज्यातील विविध विठ्ठल मंदिरात भाविकांनी विठूमाऊलीच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. यातच आषाढी वारीनिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 'जय हरी विठ्ठल' म्हणत विठ्ठल भक्तांना मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत.
"सर्वांना आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi) हार्दिक शुभेच्छा. हा शुभ दिवस आपल्याला वारकरी परंपरेला अनुसरुन भक्ती, नम्रता आणि करुणा हे भाव अंगीकारण्याची प्रेरणा देवो. भगवान विठ्ठलाच्या आशीर्वादाने, सुखी, शांतताप्रिय आणि सर्वसमावेशक समाजाच्या निर्मितीसाठी आपल्याला नेहमी एकत्र काम करता येऊ दे. जय हरी विठ्ठल!" असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान मोदींनी ईदनिमित्तही दिल्या शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईद निमित्तही शुभेच्छा दिल्या आहेत. "Eid-ul-Adha च्या शुभेच्छा. हा दिवस सर्वांना सुख-समृद्धी घेऊन येवो. तसेच आपल्या समाजात एकोप्याची आणि सलोख्याची भावना टिकून राहो. ईद मुबारक!" असं म्हणत पंतप्रधान मोदींनी ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांची सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा
आषाढी वारीनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. आज आषाढी एकादशीनिमित्त संपूर्ण पंढरपूर नगरी टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात दुमदुमून गेली आहे. बळीराजाला चांगले दिवस येऊ देत. चांगला पाऊस पडू दे, राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे, शेतकरी-कष्टकरी, कामगार, वारकरी असा राज्यातील प्रत्येक घटक सुखी समाधानी होऊ देत, त्यांच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ देत, असं साकडं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज आषाढी एकादशीच्या मुख्य शासकीय महापूजेवेळी विठूरायाच्या चरणी घातलं आहे. आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या पत्नी लता शिंदे तसेच मानाचे वारकरी दाम्पत्य भाऊसाहेब मोहिनीराज काळे आणि मंगल भाऊसाहेब काळे यांच्यासोबत विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा केली. यावर्षी मानाचे वारकरी म्हणून अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील वाकडी गावातील भाऊसाहेब मोहनीराज काळे आणि मंगल भाऊसाहेब काळे या शेतकरी दाम्पत्याला पूजेचा मान मिळाला.
हेही वाचा: