Weather Update : देशभरासह राज्यातील हवामानाचे बदलते रूप! काही ठिकाणी थंडी गायब, तर 'या' भागात अवकाळी पावसाचा धुमाकूळ, जाणून घ्या
Weather Update : राज्यातील गारवा आता परतीच्या वाटेवर असून 13 फेब्रुवारीपासून राज्यातील थंडी कायमचीच कमी होईल, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तविला आहे.
Weather Update : गेले काही दिवस राज्यातील हवामानात (Maharashtra Rain) सातत्याने बदल होताना दिसत आहे, काही भागात आता थंडी गायब होत असून काही ठिकाणी अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. शक्यतो 13 फेब्रुवारीपासून राज्यातील थंडी कमी होत होईल, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तविला आहे. तर देशातील हवामानाची स्थिती पाहता सध्या उत्तर भारतात सकाळी थंडी जाणवत असली तरी दिवसा कडक सूर्यप्रकाशानंतर ती कमी होते. तर छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. जाणून घ्या देशभरासह राज्यातील हवामानाची स्थिती
विदर्भात आज गडगडाटीसह मध्यम पावसाची शक्यता
एकीकडे राज्यातील गारवा आता परतीच्या वाटेवर असून 13 फेब्रुवारीपासून राज्यातील थंडी कायमचीच कमी होईल, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तविला आहे. तर राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने जोर धरला आहे. पुढील 3 ते 4 दिवस विदर्भाच्या काही भागात, मराठवाड्याच्या लगतच्या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यात 12 फेब्रुवारीपर्यंत तुरळक ठिकाणी गडगडाटीसह मध्यम पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात गारपीट होताना पाहायला मिळाली. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी वर्तविलेल्या अंदाजानुसार, मराठवाड्यावर आणखी आठ दिवस म्हणजेच 20 फेब्रुवारीपर्यंत ढगाळ स्थिती, अवकाळी पावसाचे संकट कायम असेल असं म्हटलंय.
फेब्रुवारी महिन्यातील पहाटेचा गारवा ऊबदार वाटण्याची शक्यता
सध्या राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस सुरू आहे, मात्र पावसाळी वातावरण मावळल्यानंतर साधारण 13 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रातील थंडी गायब होईल, आणि त्याचा परिणाम शेतपिकावर जाणवेल. तर उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पहाटेचे किमान तापमान हे सरासरीपेक्षा अधिक जाणवण्याची शक्यता आहे. असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. दरवर्षीप्रमाणे फेब्रुवारी महिन्यात जाणवणारा पहाटेचा गारवा ऊबदार वाटण्याची शक्यता आहे. अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यात फेब्रुवारीतील पहाटेचे किमान तापमानसरासरी इतकेच जाणवेल. असं मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलंय
राजधानी दिल्लीत हवेचा दर्जा खालवला
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीत हवेचा दर्जा खालवला असून रविवारी सकाळी तो अत्यंत खराब श्रेणीत होता. रविवारी दिल्लीचे किमान तापमान सात अंश सेल्सिअस नोंदवले गेले, तर मंडळाच्या आकडेवारीनुसार, दिल्लीत सकाळी 9 वाजता हवा गुणवत्ता निर्देशांक 325 होता, जो 'अत्यंत खराब' श्रेणीत येतो.
छत्तीसगड, मध्य प्रदेशात गारपिटीचा इशारा
हवामान खात्यानुसार, मध्य भारतात 12 आणि 13 फेब्रुवारीला आणि पूर्व भारतात 13 ते 15 फेब्रुवारीला हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. स्कायमेट हवामानानुसार, आज उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडमध्ये तुरळक पावसाची शक्यता आहे. याशिवाय छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.